मुंबई,दि.६: विशेष प्रतिनिधी भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पश्चिम रेल्वेचे दोन आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील २ रेल्वे रुळांवरून मार्गस्थ होतो. अशावेळी या मार्गांवर एलिव्हेटेड मार्गासाठी २ स्पॅन आहेत. हे स्पॅन १०० मीटर आणि ६० मीटर लांबीचे आहेत. हे दुहेरी लाईन स्टँडर्ड गेज रेल्वे ट्रॅकची सुविधा देईल. दि.२८ जानेवारी २०२५ ते ५ फेब्रुवारी २०२५या कालावधीत पश्चिम रेल्वे आणि डीएफसी ट्रॅकवर १०० मीटरचा स्पॅन बसविण्यात आला तर याच मार्गात ६० मीटरचा दुसरा स्पॅन बांधकामाच्या ठिकाणी ट्रॅकजवळ असलेल्या सिंचन कालव्यावर उभारण्यात येईल.
१०० वर्षे टिकतील असे डिझाइन
पश्चिम रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या ट्रॅकवर १४३२ मेट्रिक टन वजनाच्या १०० मीटर लांबीच्या स्टील ब्रिजच्या बांधकामासाठी, अंदाजे ५२५ मेट्रिक टन वजनाचा ८४ मीटर लांबीचा लॉन्चिंग नोज वापरण्यात आला. हा गर्डर गुजरात राज्यातील भुज येथील आरडीएसओ मान्यताप्राप्त कार्यशाळेत तयार करण्यात आला आहे आणि स्थापनेसाठी रस्त्यामार्गे साइटवर आणण्यात आला. हा १०० मीटर स्पॅन जमिनीपासून १४.५ मीटर उंचीवर अहमदाबादच्या सीमेवर तात्पुरत्या संरचनेवर एकत्र करून ५० मिमी खोलीवर उचलण्यात आला. प्रत्येकी २५० टन क्षमतेच्या दोन अर्ध-स्वयंचलित जॅकच्या स्वयंचलित यंत्रणेने तो खेचण्यात आला. या बांधकाम स्थळावर घाटाची उंची १२ मीटर आहे. हे गर्डर १०० वर्षे टिकतील असे डिझाइन केलेले असतात. पुलाचे २ स्पॅन C5 सिस्टीम पेंटिंगने रंगवलेले आहेत. या दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक ब्लॉक घेऊन हे लॉंचिंग पूर्ण झाले. नियमित रेल्वे आणि मालवाहतूक सेवेतील व्यत्यय कमी ही कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आली. पुलाच्या लॉंचिंगवेळी सुरक्षितता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी हे ट्रॅफिक ब्लॉक आवश्यक होते. सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक राखत हा प्रकल्प काटेकोरपणे राबविला जात आहे.
गुजरातमधील १७ स्टील पुलांपैकी हा सहावा स्टील पूल
गुजरात भागातील नियोजित १७ स्टील पुलांपैकी हा सहावा स्टील पूल आहे. सुरत, आणंद, वडोदरा (मुंबई एक्स्प्रेस वे), सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली) आणि वडोदरा येथे अनुक्रमे 70 मीटर, 100 मीटर, 230 मीटर (100+ 130 मीटर), 100 मीटर आणि 60 मीटर लांबीचे पाच स्टील पूल यापूर्वीच पूर्ण झाले आहेत.