सावध हरिणी सावध गं!

    06-Feb-2025   
Total Views | 39

WHATSAPP
 
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे वृत्त झळकले. “माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरुन कुणालाही काही संदेश येईल, तर प्रतिसाद देऊ नये,” असे आवाहन कोकाटेंना करावे लागले. व्हॉट्सॲपवरच्या ठगांनी नेमका कसला धुडगूस घातला आहे? अशा ऑनलाईन दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी उपाययोजना काय? त्याचे हे आकलन...
 
तुम्हाला एखाद्या लग्नाचे किंवा कार्यक्रमाचे निमंत्रण व्हॉट्सॲपवर मिळते. त्यावर तुम्ही क्लिक करता. त्यानंतर तुमच्या खात्यातून, मोठी रक्कम वळती झाल्याचा मेसेज अचानक धडकतो. काय झाले हे कळण्यापूर्वी, तुम्हाला व्हॉट्सॲपवरच्या ठगांनी गंडा घातलेला असतो. आता हे कसे घडते? हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडे असते. त्यामुळे अशा ठगांपासून वेळीच सावध राहाणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुम्हाला एका तुमच्याच परिचितांकडून, एखाद्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा संदेश येतो. ज्यात तुम्हाला वाटेल की, समोरच्याने ‘पीडीएफ’ पाठविलेली आहे. तुम्ही उत्सुकतेपोटी ती उघडता आणि इथेच घात होतो. कारण समोरच्याने निमंत्रणाच्या आडून, एक ‘एपीके’ फाईल किंवा अॅप पाठविले जाते. असे अनधिकृत अॅप तुमच्या मोबाईल फोनमध्ये, क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होऊ लागतात. त्यानंतर तुमचा सर्व डेटा हॅकरकडे उपलब्ध होतो. ज्यामुळे आपोआप तुमच्या मोबाईलवरुन, ‘ओटीपी’ वगैरेची फेरफार केली जाऊ शकते. याचा फायदा घेत, संबंधिताचे बँक खाते रिकामे केले जाते.
 
कृषिमंत्री कोकाटे यांच्या व्हॉट्सॲपद्वारे ‘पंतप्रधान पीक विमा योजने’साठी, अकाऊंट उघडण्याचे आवाहन करणारे एक ‘एपीके’ फाईल व्हायरल करण्यात येत होती. ज्यामुळे मोठी फसवणूक घडण्याची शक्यता होती. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यानंतर, कृषिमंत्र्यांनी तातडीने याबद्दल घोषणा करून, पोलिसांत तक्रार दाखल केली.असाच एक प्रकार बंगळुरुतील हरि किशनसोबत घडला. “तुम्ही वाहतूक नियम मोडला आहे, तुम्हाला दंड भरावाच लागेल, त्यासाठी ‘वाहन परिवाहन’ नावाचे एक अॅप डाऊनलोड करा आणि पैसे भरा,” असे त्याला सांगण्यात आले. अॅप डाऊनलोड करताना, ते धोकादायक असल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर झळकला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन त्याने, अॅप डाऊनलोड केले. काही काळानंतर त्या व्यक्तीच्या फोनवर सातत्याने ओटीपी येऊ लागले. काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने, त्याने तपास केला. तेव्हा त्याच्या क्रेडिट कार्डद्वारे ७० हजार काढून घेतल्याचे लक्षात आले. या व्यवहारांमुळे त्याचा फोन सातत्याने खणाणत होता. सुदैवाने त्यांना बँक खात्यात हस्तक्षेप करता आला नाही. पोलिसांत तक्रार झाल्याने, हा प्रकार उजेडात आला.
 
उत्तर प्रदेशात गौतम बुद्ध नगरात, अभिनव शर्मा या तरुणालाही असाच गंडा घालण्यात आला. दररोज दोन ते आठ हजार रुपये मिळवून देतो, असे सांगत चोरट्यांनी ५१ लाखांहून अधिक रक्कम लुबाडली. अभिनवला व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकवरुन मेसेज आला. त्याचे नाव पल्लवी असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तिने अभिनवला टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. या काळात तिने ट्रेनिंग दरम्यान, आभासी चलनातून पैसे कसे कमवायचे, याचे प्रशिक्षण अभिनवला दिले. यानंतर अभिनवला तिने, एकूण ५१ लाख, ६३ हजार, २७७ रुपये एका खात्यात वळते करण्यास सांगितले. दि. १८ ते दि. २२ जानेवारी दरम्यान ३२ वेळा व्यवहार करत, अभिनवने एकूण रक्कम वळती केली. पल्लवीने अभिनवला एक लिंक पाठवली, ज्यात त्याने वळते केलेल्या रक्कमेच्या एकूण सहा लाख नफा दाखविला जात होता. यानंतर जेव्हा अभिनवने नफ्यासहित रक्कम परत मागितली, तेव्हा पल्लवीने अभिनवकडून आणखी काही रक्कम मागवण्यास सुरुवात केली. ज्यात ‘व्हीव्हीआयपी चॅनल फीज्’, इतर कर आणि दंड, अशी रक्कम ती आकारत होती. आपली फसवणूक होत आहे, हे लक्षात आल्यानंतर त्याने केंद्र सरकारच्या ‘एनसीआर पोर्टल’वर तक्रार केली.
 
असाच आणखी प्रकार व्हॉट्सॲप हॅकिंगसंदर्भात केला जातो. तुमच्या नावाने काही पार्सल आले आहे, जे पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉय तुम्हाला, एक नंबर डायल करायला सांगू शकतो. ज्याची सुरुवात * आणि शेवट ने केली जाऊ शकते. असे करण्यास कुणी सांगत असेल, तर तिथेच थांबायला हवे. कारण तुम्ही आपल्याकडील कॉल्स, एसएमएस हे समोरच्या व्यक्तीला फॉरवर्ड करत आहात. ज्यामुळे तुम्हाला येणारे संदेश, ‘ओटीपी’ थेट समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाठविले जाऊ शकतात. याला स्मार्टफोनच्या भाषेत कॉल-एसएमएस फॉरवर्डिंग म्हटले जाते. एकदा का तुमचा एसएमएस पुढील व्यक्तीला मिळाला की, तुमचे बँक खाते रिकामी झाले म्हणूनच समजा. हा व्यक्ती सर्वात आधी तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करतो. त्यानंतर तुमच्या संपर्कातील इतर व्यक्तींकडे उसने पैसे मागतो. बरेचजण यात फसतात आणि कधीही भरुन न निघणारे नुकसान होते. 
 
अशा प्रकरणांपासून सावध राहण्यासाठी काय करायला हवे? तर सर्वात आधी, तुमच्या कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना याबद्दल जागरुक आणि सुशिक्षित बनवा. अशा अनोळखी व्यक्तींकडून सांगण्यात आलेल्या कुठल्याही निर्देशांचे पालन करू नका. कॉल फॉरवर्ड होतील, असे आकडे डायल करू नका. आपले फोन कॉल्स फॉरवर्ड होत नाहीत ना, हे वारंवार तपासत रहा. बाजारात उघड होणार्या नवनव्या सायबर फसवणुकीच्या घोटाळ्यांबद्दल जागरूक राहिले पाहिजे. फसवणूक करणार्यांचे कॉल्स घेणे टाळा, त्यांच्या जाळ्यात अडकू नका, सरकार असो वा अन्य तज्ञ मंडळी असो, त्यांच्याकडून वारंवार अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल जनजागृती केली जाते. आपण मोबाईलद्वारे फोन केला, तरीही आपल्याला विविध घोषणा ऐकू येतात. पण आपण त्या किती गांभीर्याने ऐकतो? अनोळखी ई-मेल्स, फोन्सपासून सावध रहा, याबद्दल माहिती असतानाही, बर्याचदा जाळ्यात अडकले जातो.
 
आपल्याकडे व्हॉट्सॲपवर आलेली माहिती कित्येकदा तथ्य न तपासता, तशीच फॉरवर्ड केली जाते. यामुळे कुणीतरी गोत्यात येण्याची शक्यता असते. अशा अनेक चुका जाणते-अजाणतेपणी, आपल्याकडूनच होत असतात. त्या टाळल्या पाहिजेत. आपल्या हाती स्मार्टफोन्स आल्यानंतर आपणही तो स्मार्टपणेच हाताळला पाहिजे, अन्यथा होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही! पूर्वी चोरीमारी करणे हे अडाणी-अशिक्षितांचा पेशा होता. मात्र, आता त्यात ‘व्हाईट कॉलर क्राईम’ बोकाळला. ज्यात अनेक निष्पापांना ठरवून फसवले जाते. अशी कित्येक प्रकरणे, पोलीस दफ्तरी आधीच प्रलंबित असतील. त्यात तुमचा प्राधान्यक्रम केव्हा लागणार? बर्याचदा अशा चोरांचा तपास लागणेच कठीण असते. त्यामुळे सावध तुम्हालाच राहावे लागेल. कुठल्याही प्रकारचे व्हॉट्सॲपवरील निमंत्रण, अनोळखी व्यक्तीकडून आलेला मेसेज, बनावट या सगळ्यात सावधगिरी बाळगणे आणि इतरांना याबद्दल जागृत करणे, हाच पर्याय आहे.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121