तुम्ही तुरूंगात असताना, तुमच्या पादुका ठेवून आम्ही सभा घेतल्या. दुधाची तहान ताकावर तसे त्यावेळी, तुमच्या शिवराळ भाषणाची तहान आम्ही अंधारे ताईसाहेबांच्या भाषणाने भागवली आणि तुम्ही असा द्रोह केलात? रेड्याची शिंग पुरून मुख्यमंत्री होता येतं हे तुम्हांला माहीत असून, आम्हाला सांगितले नाही. आम्हाला ती शिंगे हवी आहेत! आम्हाला मुख्यमंत्री बनायचं आहे. काय म्हणालात? तुम्ही उगीच आरोप केलेत. नाही! आम्हाला माहीत नाही. आणा पाहू ती शिंगे. तुम्हीच तर म्हणालात ना, काळ्या जादूला घाबरून मुख्यमंत्री ‘वर्षा’वर राहायला येत नाहीत. इतकी बित्तंबातमी होती तुमच्याकडे? तुम्हाला एकदाही नाही वाटले की, आम्हाला सांगावी. आम्ही तुमच्यावर राजद्रोह का ठोठावू नये? कारण आम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, आता नाही. मुख्यमंत्री बनण्याचा इतका सोपा उपाय तुम्हाला माहीत असताना, तुम्ही आम्हाला सांगितला नाही.
स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट पुरवलेच पाहिजेत, समजले का? इथे तीनही हट्ट आहेत. ती शिंगे पाहिजेतच. आम्हाला मुख्यमंत्री बनायचेच आहे. बघा, बाळराजे हट्ट करत आहेत. म्हणत आहेत, “हो हो बाबा. यांना माहीत आहेत, ती शिंगे. मला पण हवी आहेत. मागा यांच्याकडून!” काय म्हणता, तुम्हाला माहीत नाही? असे कसे? एकनाथ मुख्यमंत्री झाला, तेव्हापण तुम्ही कामाख्या देवीची पूजा आणि काळी जादू काय काय बोललात. दिल्लीच्या निवडणुकीबद्दल बोलतानाही तुम्ही म्हणालात, अरविंद केजरीवाल यांनी खूप काम केले, ते जिंकले पाहिजेत. पण भाजपकडे काय जादू आहे माहीत नाही. आम्ही इतके काम करून पण, महाराष्ट्रात भाजप जिंकली. नंतर काल-परवा म्हणालात की, त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर रेड्याची शिंग पुरली. इतक्या सगळ्या घटनांमध्ये, काळी जादू आहे, असे तुम्ही म्हणालात. म्हणजे तुम्ही माहितीगारच असाल. अरे आता कोण म्हणाले की, खरे जादूगार तर राऊतच आहेत? कारण फक्त भूवया उडवून, अर्वाच्च बोलून ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांची ती जादू कशी विसरणार? ‘लिलावती’मध्ये हदयावर उपचार झाले. मात्र दुसर्याच दिवशी रुग्णालयाच्या बेडवर बसून, लेख लिहायला कुणालातरी जमेल का? जादूगर कसा माणूस गायब करतो, तसेच यांनी दररोज सकाळी फक्त माईक वापरून, उबाठांचे आमदार-खासदार शिंदेकडे गायब केले. आहे ना जादू! जादूगर ओ जादूगर
यमुना नाही, हे नेते विषारी
हरियाणामधून यमुना नदी दिल्लीत येते. ती दिल्लीत येत असतानाच हरियाणाच्या भाजप सरकारने त्या नदीत विष टाकले, जेणेकरून दिल्लीतले लोक ते विष पिऊन मरतील. त्याचे खापर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीवर फुटेल. मग दिल्लीचे लोक आम आदमी पार्टीला मतदान करणार नाहीत. अशा अर्थाची विधाने अरविंद केजरीवाल यांनी केली. आरोप करायचे, सतत करत राहायचे. लोक समाज माध्यमातून ते आरोप ऐकतात, वाचतात, पाहतात, ते खरे की खोटे याबाबत काहीच लोक मीमांसा करतात. पण ते खोटे आरोप, एव्हाना भोळ्या जनतेसाठी सत्य झालेेले असतात, असेच काही लोकांना वाटते. त्यामुळेच ते काहीही बिनबुडाचे आरोप करत राहतात. लाखो करोडो रुपयांच्या गाद्यागिर्द्या आणि घरासाठीचे कडीकोयंडे घेणारे, दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवालही त्यापेकी एक आहेत, हे नक्की.
दारू घोटाळ्यात त्यांचे अर्धेअधिक मंत्रिमंडळ तुरूंगात होते. इतकेच काय, ते स्वतःही तुरूंगातून जामिनावर सुटले. पण भाषा मात्र त्यांच्यासारखा नीतीवान कुणीच नाही अशी. यमुनेमध्ये भाजपवाल्यांनी विष मिसळवलंय हा त्यांचा आरोप. या आरोपावर हसावे की रडावे? कारण दिल्लीत जाणार्या यमुनेमध्ये मिसळलेले पाणी, याचा थोडातरी अंश हरियाणात वाहणार्या यमुना नदीमध्ये आला नसता का? बरं दिल्लीसह संपूर्ण देशावर भाजपची सत्ता आहे. दिल्लीत यमुनेचे विषारी पाणी पिऊन लोक मृत्युमुखी पडली असती, तर भाजपच्या केंद्र सरकारवर त्याचा ठपका आलाच नसता का? केंद्रात सत्तेत असताना, राज्यातील लोकांना विष देऊन मारण्याइतका मूर्खपणा कोणीतरी सत्ताधारी पक्ष करेल का? पण केजरीवाल, भाजपद्वेषामध्ये बुद्धिहीन आणि तर्कहीन झाले आहेत. नशीब दिल्लीमधे हवा प्रदुषित आहे. कारण, भाजपवालेच दिल्लीची हवा मुद्दाम प्रदुषित करतात, असे ते अजून म्हणाले नाहीत. पंजाब आणि दिल्लीमध्ये, आम आदमी पार्टीच्या सत्ताकाळात राज्यात स्थिरता नाही. भ्रष्टाचार आणि दारूकांडामध्ये गुन्हेगारी करूनही, स्वतःच्या गुन्हेगारीचे समर्थन अरविंद केजरीवालसह आम आदमी पार्टीचे नेते करत आहेत. यावर असे वाटते की, यमुनेचे पाणी विषारी नाही, तर या भ्रष्ट नीतीहीन नेत्यांची मानसिकता विषारी आहे!