खेतवाडीच्या मारुतीसाठी रामभक्त सरसावले

"राजकीय रंग देण्याचा प्रयत्न" म्हणत मंदिर विश्वस्तांनी आरोप फेटाळले

    06-Feb-2025
Total Views |

Khetwadi Maruti Mandir

मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Pitale Maruti Mandir Khetwadi)
ग्रँट रोड येथील आठव्या खेतवाडी लेन परिसरात 'श्री पितळे मारुती मंदिर' आहे. जे साधारण २०० वर्ष पुरातन असून याची मालकी पांडुरंग बालाजी ट्रस्टकडे आहे. अशी माहिती आहे की, हे मंदिर पितळे परिवाराच्याच मालकीचे आहे. सध्या मंदिर परिसरातील जुनी इमारत पुनर्विकासासाठी गेली असता इमारतीच्या जागी नवीन टॉवर बांधला जात आहे. बांधकामावेळी बिल्डरने (Earth Graphics) मंदिर मूळ जागेवरून विस्थापित करून ते मोकळ्या जागेत हलवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती स्थानिकांच्या कानी पडली होती. त्यामुळे मंदिर विश्वस्त केवळ आर्थिक फायद्यासाठी मंदिराचे मूळ स्वरूप बिघडवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो आहे. 

हे वाचलंत का? : 'खेलंदाजी'कार द्वारकानाथ संझगिरींचं वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मंदिराची ४२० चौरस फूट मूळ जागा सुमारे १५० ते २०० फूट मर्यादित ठेवली जाणार असून मंदिराचा गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग पाडण्यात येणार आहे. यामुळे स्थानिकांनी एकत्र येत यास तीव्र विरोध दर्शविला. बिल्डरने सध्या विश्वस्तांच्या संमतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही शुक्रवार, दि. ०७ फेब्रुवारी पूर्वी मंदिराची जागा हलवून नवीन वास्तू विधिवत प्राणप्रतिष्ठा करून उभारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मंदिर विश्वस्त आणि बिल्डरने स्थानिकांना विश्वासात न घेता हे पाऊल उचलल्याने स्थानिकांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 

Khetwadi Maruti Mandir

'राजकीय रंग देण्याचा प्रयत्न'
पितळे मारुती मंदिराचे विश्वस्त सुरेश पितळे यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना अशी माहिती दिली की, "प्रशासनाने यापूर्वीच पुनर्विकासाच्या नियोजित आराखड्यास मंजुरी दिली आहे. मंदिराची जागा खासगी मालमत्ता असून पितळे परिवाराने मंदिर स्वतःसाठी बांधले होते. पूर्वी मंदिर परिसरातच पितळे परिवाराचे घर होते. आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने घरालगतच मारुतीचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिर खासगी असले तरी, लोकांना मंदिरात दर्शन घेण्यास कधीच मनाई नव्हती. उलट हनुमान जन्मोत्सव सर्व हिंदू समाज एकत्र येऊन साजरा करत होता. फक्त मंदिरातील पुजारी पगारी व्यवस्थेनुसार असल्याने भाविकांना मंदिरात दक्षिणा वगैरे देण्यास मनाई होती. आज परिवाराने मंदिर परिसरातील काही मालमत्तेचा भाग बिल्डरला विकला असला तरी मंदिराचा ताबा परिवाराकडेच आहे. गाभाऱ्याच्या जागेवरून मुख्य रस्ता जात असल्याचे जेव्हा विकास आराखड्यातून माहित झाले, तेव्हा प्रथम सभामंडपाची जागा कमी करण्याचे ठरवले व गाभारा आहे त्याच मोजमापात सरकवण्याचे निश्चित केले. नवीन मंदिर सुद्धा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा या सर्व गोष्टी तज्ज्ञांना बोलवून, पुजारींच्या मार्गदर्शनानेच होणार आहेत. लोकं विनाकारण यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वीचे बांधकाम तेव्हाच्या परिस्थितीला धरून होते, आज स्थानिक परिस्थिती बदलली आहे. अग्निशामन दलाच्या गाड्यांना परिसारत येणे-जाणे सोयिस्कर व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे."