स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

    06-Feb-2025
Total Views | 175

Pranit More
 
सोलापूर : (Pranit More Assault Case) स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला सोलापूरात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सोलापूरात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर विनोद केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटाने कार्यक्रम संपल्यावर त्याच्यावर हल्ला करत मारहाण केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टद्वारे देण्यात आली होती. अशातच आता याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
 
पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना याप्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात १० ते १२ जणांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू, बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष्य करून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याने सोलापूरातील एका कार्यक्रमात विनोद केला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक गट नाराज झाला. त्यातून हा मारहाणीचा सगळा प्रकार घडला.
 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
वीर पहाडियाचे स्पष्टीकरण
 
बॉलिवूड अभिनेता वीर पहाडियाने यासंदर्भात केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कॉमेडियन प्रणित मोरेबरोबर जे काही घडलं, ते वाचून मला खरंच धक्का बसला आहे. सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही. उलट मी ट्रोलिंगला सहजतेने स्वीकारुन त्यावर हसणारा आहे आणि माझ्या टीकाकारांशीसुद्धा नेहमीच प्रेमाने वागतो. त्यामुळे कधीही कोणाचेही वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याचं समर्थनदेखील करणार नाही”.
 
पुढे तो असेही म्हणाला की, “माझ्याप्रमाणे सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या एका सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचे तर मी अजिबातच समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन की, या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण, कोणतीही व्यक्ती अश्या गोष्टींसाठी पात्र नाही. या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन.” असे म्हणत त्याने पुन्हा एकदा माफी मागितली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121