मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी 'धारावी पुनर्विकास प्रकल्प हा एकमेव असा प्रकल्प आहे ज्यामध्ये सर्व पात्र आणि अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. प्रत्येक धारावीकराला घराच्या बदल्यात घरच देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही या प्रकल्पात बेघर होणार नाही. इतकेच नाहीतर कोणालाही संक्रमण शिबिरात जाण्याची वेळ येऊ नये अशी खबरदारी घेण्यात येईल', अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना श्रीनिवास यांनी सांगितले,"धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींसाठी बांधकाम सुरू झाले आहे. धारावीत सर्व्हेक्षणाला गती आहे. एकीकडे सर्व्हेक्षण आणि बांधकाम तर दुसरीकडे पुनर्वसनासाठी आवश्यक इमारती बांधण्यासाठी जमिनीचा शोध अशारितीने चौफेर कामांना गती आहे. रेल्वे जमिनीवर बांधकामांना सुरुवात झाली आहे. ५२००० रचनांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. तर ८४ हजार घरांवर नंबर टाकून झाले आहे. जे लोक या सर्व्हेक्षणात अद्याप सहभागी झाले नाही त्यांना आता शेवटची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व्हेक्षण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्या नागरिकांची असेल. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे सर्व्हेक्षण बाकी आहे त्यांनी सर्व्हेक्षणात सहभागी होत आपला डेटा सादर करावा", असे आवाहन श्रीनिवास यांनी धारावीकरांना केले आहे.
धार्मिक जागांचे वेगळे सर्व्हेक्षण
धारावीतील पुनर्विकास प्रकल्पामध्ये विविध धर्मियांची धार्मिक स्थळे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळांचाहीसमावेश आहे. ही अनधिकृत स्थळे निष्कासित करणे, स्थलांतरित करणे किंवा नियमित करणे यांविषयी निर्णय घेण्यासाठी राज्यशासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. न्यायाधीश भोसले यांच्याव्यतिरिक्त, समितीचे इतर सदस्य जीएम अकबर अली (मद्रास उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश), मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विशेष कार्यकारी अधिकारी, मुंबई, नगरविकास आणि कायदा आणि न्याय विभागांचे उपसचिव, पोलिस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), उपविभागीय अधिकारी, दहिसर (सदस्य सचिव) आहेत. त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी समिती स्थापन करण्यात आली आहे. ता समितीच्या आजतागायत २ बैठक झाल्या आहेत. ही समिती पुढील २-३ महिन्यात आपला अहवाल सादर करेल. धार्मिक स्थळांचे वेगळे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. अंदाजे २०० धार्मिक संरचना असण्याचा अंदाज श्रीनिवास यांनी व्यक्त केला. त्यापैकी ८०-९० संरचनाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन महिनाभरात
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टरप्लॅन येत्या महिनाभरात पूर्ण होईल. या मास्टरप्लॅनचा पहिला कच्चा मसुदा डीआरपीला सादर करण्यात आला होता. हा मसुदा बदलांसह पुन्हा तयार करून अंतिम करण्याचे काम सुरु आहे. येत्या महिनाभरात हा मसुदा पूर्ण करून धारवीकरांसमोर सादर केला जाईल, अशी माहितीही सीईओ श्रीनिवास यांनी यावेळी दिली.