नवी दिल्ली: ( Narendra Modi ) महाकुंभ हा युगपरिवर्तनाचा संकेत असून त्याने भारताच्या विकास प्रवासात एका नवीन अध्यायाचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकता का महाकुंभ युग परिवर्तन की आहट या विशेष ब्लॉगमध्ये केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्याबद्दल एक ब्लॉग लिहिला आहे. पंतप्रधानांनी या भव्य कार्यक्रमाचे वर्णन ‘युगपरिवर्तनाची चाहूल’ असे केले. ते म्हणाले की, “या कार्यक्रमाने भारताच्या विकास प्रवासात एका नवीन अध्यायाचा संदेश दिला आहे आणि हा संदेश विकसित भारताचा आहे.” या कार्यक्रमाचे वर्णन ‘एकतेचा महाकुंभ’ असे करत त्यांनी सांगितले की, “या महाकुंभात समाजाच्या प्रत्येक वर्गातील आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले.” “ज्याप्रमाणे एकतेच्या महाकुंभात, प्रत्येक भक्त, मग तो गरीब असो वा श्रीमंत, बालक असो वा वृद्ध, स्वदेशी असो वा परदेशी, ग्रामीण भागातील असो वा शहरवासीय, पूर्व असो वा पश्चिम, उत्तरेकडून असो वा दक्षिणेकडून, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही विचारसरणीचा असो, सर्वजण एकाच महायज्ञासाठी एकतेच्या महाकुंभात एकत्र आले. ‘एक भारत, महान भारता’चे हे अविस्मरणीय दृश्य कोट्यवधी देशवासीयांमध्ये दिसत होते. आत्मविश्वासाचा एक भव्य उत्सव बनला. आता अशाप्रकारे आपल्याला विकसित भारताच्या महान कार्यासाठी एकत्र यावे लागेल,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.