आठवलेंना का घ्यावा लागला ठाकरे-गांधींचा खरपूस समाचार?
28-Feb-2025
Total Views | 37
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Athawale comment on Thackeray & Gandhi) प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभाची महाशिवरात्रीला अधिकृतपणे सांगता झाली. पौष पौर्णिमेपासून सुरु झालेल्या या अध्यात्मिक उत्सवात देश-विदेशातून कोट्यवधी भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली. तब्बल ६६ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती आहे. परंतु लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे महाकुंभात न गेल्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोघांचा खरपूस समाचार घेतला. ते दोघेही हिंदू नाहीत; हिंदू असते तर त्यांनी महाकुंभात जायला हवं होतं.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, हा कुंभ पंतप्रधान मोदींचा किंवा योगीजींचा नव्हता. हा कुंभ हिंदू धर्माच्या लोकांचा होता. १४४ वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभास त्यांनी हजेरी लावणं अपेक्षित होतं, परंतु ते गेले नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे. आगामी निवडणुकीतही हिंदू धर्माच्या लोकांनी त्यांना मतदान करू नये. अशाने राजकारणात त्यांची अवस्था बिकट होईल आणि महाकुंभला न जाण्याचा पश्चाताप होईल.
महाकुंभ संपला, पण उत्सव सुरुच राहणार
महाकुंभाची अधिकृतपणे सांगता झाली असली तरी मोठ्या संख्येने भाविक येण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यादृष्टीने व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात्रेकरूंच्या फायद्यासाठी सर्व व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले.