गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी आली आणि समस्त मराठी जनता सुखावून गेली. तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच ही गोष्ट साजरी केली. मात्र, अभिजात दर्जा मिळल्यानंतर नेमकी कोणती गोष्ट घडणार आहे, याचा विचार फार कमी तरुणांनी केला असेल, असे आपल्या आसपासचे वातावरण पाहिल्यावर लक्षात येते.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे, त्या भाषेच्या संवर्धनासाठी आता आर्थिक पाठबळ मिळणे शक्य झाले आहे, हेच बहुतांश तरुणांना माहीत नसते. हा अनुभव मी स्वतः विद्यापीठात शिक्षण घेत असताना घेतलेला आहे. निश्चितच, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या निधीचा वापर करून भाषेसंबंधी विविध प्रकल्प राबवणे आणि त्यासाठी तरुण उत्साही मनुष्यबळ उपलब्ध होणे, ही अतिशय महत्त्वाची गरज आहे, तरच खर्या अर्थाने मराठी भाषासंवर्धन साध्य होऊ शकेल.
मराठी भाषा ही अभिजात आहे, ती राजभाषाही आहे. पण, ती ज्ञानभाषा मात्र होऊ शकलेली नाही. इंग्रजी भाषेच्या प्रभावात मराठी शाळांची होणारी परवड पाहून हळहळ व्यक्त केली जाते. पण, तरीही मराठी तरुण आपल्या मुलांना शाळेत घालताना इंग्रजी माध्यमाची निवड करतात. मातृभाषेतून होणार्या शिक्षणाने मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास उत्तमप्रकारे होतो, हे तरुण पिढी लक्षात घेत नाही. केवळ शालेय शिक्षणच नाही, तर उच्चशिक्षणातही हीच उदासीनता आपल्याला दिसते. आजही विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम मराठीतून शिकता येत नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रम तर दूरची गोष्ट, पण साधे शास्त्र शाखेतले अभ्यासविषयही अजून मराठीत पूर्णतः उपलब्ध झालेले नाहीत.
मराठीला ‘ज्ञानभाषा’ करण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्षेत्रात अनेक प्रकारची कामे होणे आवश्यक आहे. बंद होणार्या मराठी शाळा रोखण्यासाठी सेमी इंग्रजीतून शिक्षण किंवा इंग्रजी बोलण्याचे विशेष प्रशिक्षण, असे काही नवे पर्याय मराठी शाळांनाच आत्मसात करावे लागतील. शालेय शिक्षणसोबतच मराठीतून विविध अभ्यासशाखांतील ज्ञाननिर्मितीला प्रोत्साहन मिळणेदेखील गरजेचे आहे. इंग्रजी भाषा न येण्याने आणि त्याचा न्यूनगंड बाळगल्याकारणाने एखाद्या विशिष्ट अभ्यासशाखेचे शिक्षण घेण्यापासूनच विद्यार्थी वंचित राहतात. हे तरुण विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान आहे. हे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने तरुणांनीच प्रयत्नशील राहायला हवे. मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करायला हवी.
आजच्या तरुणांच्या मराठी भाषेवरही अनेकदा भाष्य केले जाते. आजच्या तरुणांचे मराठी हे मराठी नाहीच, अशी अतिशयोक्तीही केली जाते. मात्र, या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे भाषा हे संदेशनाचे माध्यम आहे. काळ बदलतो तशी भाषाही बदलते. संतांच्या काळातील मराठी आज आपण बोलताना वापरत नाही. काळाच्या ओघात त्यात अनेक बदल होतात. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ‘जागतिक भाषा’ म्हणून महत्त्व मिळालेल्या इंग्रजी भाषेतही जगभरातल्या अनेक भाषांमधील शब्द आढळतात. त्यामुळे आजच्या तरुणांच्या बदललेल्या भाषेकडे काटेकोर भूमिकेतून पाहता येणार नाही. पण, त्याचबरोबर मराठी बोलताना जाणीवपूर्वक केलेल्या सरमिसळीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तरुणांनी आपली भाषा घडवताना आणि भाषा हे माध्यम वापरताना विचार करण्याची गरज आहे.
भाषेचा जसा माध्यम म्हणून विचार केला जातो, तसा त्या भाषेतील साहित्याचाही विचार महत्त्वाचा ठरतो. आपल्या भाषेतील साहित्याविषयी तरुण किती सजग आहेत, हे आजच्या ग्रंथालयांच्या स्थितीवरून लक्षात येईल. नवमाध्यमांच्या प्रसारामुळे तरुण पिढी कमी वाचन करत असेलही, पण आपल्या समृद्ध साहित्यातील आशयावर काही नवनवीन प्रयोग करणारे तरुणही आपण पाहतो. प्रत्येक पिढीच्या अभिरुचीची घडण वेगवेगळी असते. आज संतांच्या साहित्यावर होणारे नवे प्रयोगशील कार्यक्रम हेसुद्धा त्याचेच प्रतिबिंब आहे. थोडक्यात, तरुणांना मराठीविषयी प्रेम जरुर आहे, पण या प्रेमाला कृतिशीलतेची जोड मिळणे आवश्यक आहे.
वनश्री
(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत)