नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नवीन सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सर्व नोकरदार तसेच स्वयंरोजगारित व्यक्तींनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या संदर्भात काम करत आहे. यातून सध्या कार्यरत असलेला नोकरदार वर्गच नव्हे तर असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
भारतात या घडीला संघटित क्षेत्रातील कामगारांपेक्षाही, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, घरकाम करणारे मजूर, सामानाची ने – आण करणारे म्हणजेच गिग क्षेत्रात काम करणारे मजूर यांना सरकारकडून मिळणाऱ्या कुठल्याही आर्थिक संरक्षणाचा लाभ घेता येत नाही. तसेच जे स्वयंरोजगारित आहेत अशा व्यक्तींनाही अशा कुठल्याही योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या सर्व क्षेत्रातील श्रमबळास सरकारी लाभाच्या कार्यकक्षेत आणण्यासाठीचे केंद्र सरकारचे हे प्रयत्न आहेत.
या नव्या सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याचे मूळ हे देशातील देशातील सध्याच्या पेन्शन योजनेची व्याप्ती वाढवून त्यात सध्या सुरु असलेल्या पेन्शन योजनांचाही अंतर्भाव करण्याचा प्रयत्न यात आहे. याबाबत सध्या या योजनेचे एकूण स्वरुप काय असेल याबद्दल चर्चा सुरु असून त्यातून भागधारकांशी चर्चा करुन मगच या योजनेला अंतिम स्वरुप दिले जाईल. अशी प्रतिक्रिया मंत्रालयाकडून या अहवालात मांडली आहे.
या योजनेत सध्या सुरु असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना तसेच राष्ट्रीय स्वयंरोजगारित आणि व्यापारी पेन्शन योजना या दोघांचा अंतर्भाव केला जाणार आहे. या सध्याच्या योजनांमध्ये अनुक्रमे मासिक ५५ रुपये ते २०० रुपये हप्त्यांमध्ये रुपये ३००० पर्यंत पेन्शन दिले जाते. या दोन्ही योजनांचा या नव्या योजनेत अंतर्भाव केला जाणार आहे.