छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणातील ‘योध्दा’

    26-Feb-2025   
Total Views | 43

review of atul save
 
अतुल सावे म्हणजे मराठवाड्यातील भाजपचा आश्वासक आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्व दिसून येते. यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य अखंड-अविरत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आज दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा.
 
बाबरी मशीद पाडण्यासाठी महाराष्ट्रातून रवाना झालेल्या शिवसैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व होते, तेव्हाच्या औरंगाबादचे खासदार मोरेश्वर सावे आणि ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्याकडे. बाबरीपतनाच्या नियोजनात मोरेश्वर सावे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चंबळ खोर्‍यात त्यासाठी बैठका झाल्या. बाबरीचा ढाचा पडला आणि या प्रकरणात मोरेश्वर सावे यांना प्रमुख आरोपी करण्यात आले. त्याचे फलित म्हणून शिवसेनेत त्यांना प्रचंड सन्मान मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांच्या पदरी उपेक्षा आली. अयोध्येवरून परतल्यानंतर मोरेश्वर सावे यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली, ती शिवसेना नेत्यांना पटली नाही. दोनवेळा खासदार राहिलेल्या मोरेश्वर सावेंचे तिकीट कापण्यात आले. त्याही पुढे जात जनतेने सावे यांना दिलेली ‘धर्मवीर’ ही पदवी नाकारण्यात आली. त्यामुळे ते नाराज झाले असले, तरी त्यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडली नाही. मोरेश्वर सावे यांना चार अपत्ये. अनिल, अजित, अतुल आणि अंजली. आपला राजकीय वारसा त्यांनी पुत्र अतुल यांच्याकडे सोपवला आणि त्यांनी तो वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले.
 
दि. २६ फेब्रुवारी १९६२ रोजी अतुल सावे यांचा जन्म झाला. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य अखंड-अविरत सुरू आहे. नागरिकांचे प्रश्न आणि समस्यांकडे त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असते. प्रत्येकाच्या फोनला ते स्वतः उत्तर देतात. प्रश्न समजून घेऊन नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांच्यासाठी सतत उपलब्ध असणे, हे त्यांचे वैशिष्ट्य. प्रत्येक कामाचा नियोजनबद्ध आराखडा ते तयार करतात आणि त्यासाठी योग्य व्यक्तींची नेमणूक करून स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कार्य ते पूर्ण करतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्ये केली आहेत. तीर्थरूप मोरेश्वर सावे यांचा समाजकारणाचा वारसा अत्यंत निष्ठेने सांभाळताना त्यांनी कधी तत्त्वांना तडा जाऊ दिला नाही. नेत्याचा मुलगा म्हणून सहज आमदारकी मिळवता आली असती, पण अतुल सावे त्याला अपवाद ठरले. त्यांनी आधी २० वर्षे पक्षासाठी सातत्याने काम केले, मग आमदारकीसाठी प्रयत्न केला. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्त्व दिसून येते. उद्योजकता, समाजकारण आणि राजकारण यांचा खर्‍या अर्थाने माणुसकीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारे ते एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत.
 
छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक विकासकार्यात अतुल सावे यांचे मोठे योगदान आहे. रस्ते, वीज, उद्योगधंदे, पर्यावरण, युवा सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य इत्यादी विकासकामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजातील युवकांचे एकीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून दहीहंडीचा मोठा उत्सव दरवर्षी ते आयोजित करतात. यानिमित्ताने शहरातील हजारो युवक एकत्र येतात. त्याचप्रमाणे, अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये विविध देखावे, प्रबोधनाचे कार्यक्रम यामार्फत सामाजिक जागृतीचे कार्यही मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१८ मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद (उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्याक विकास आणि ‘वक्फ’) तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. २०२२ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर बढती मिळाली. त्यांच्याकडे गृहनिर्माण आणि सहकार अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. २०२४ मध्ये भाजप महायुती विक्रमी बहुमताने निवडून आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाले. सध्या त्यांच्याकडे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास आणि अपारंपरिक ऊर्जा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत धोरणात्मक पातळीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वसामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी, ‘म्हाडा’ची घरे आणखी स्वस्त करण्याच्या निर्णयाची त्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवली. शिवाय, वर्षभरात ‘म्हाडा’च्या माध्यमातून एक लाख घरे बांधण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यातील अनेक घरांचे बांधकाम पूर्ण होऊन सोडतदेखील काढण्यात आली आहे. त्यांच्या सूचनेनुसार ‘सिडको’ प्रशासनाने ‘पंतप्रधान आवास योजने’तील घरांच्या किमती नऊ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. गिरणी कामगारांचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला घरांचा प्रश्नही त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागला.
 
सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. भूविकास बँकेचे कर्जदार असलेल्या ३४ हजार, ७८८ शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी अर्थात सुमारे ९६४ कोटी, १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्री सावे यांनी घेतला. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६९ हजार हेक्टर शेतजमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा भार कमी झाला. नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही सावे यांच्या कारकीर्दीत घेण्यात आला.
 
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत त्यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी राबविण्यात येणारी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ ही त्यांचीच संकल्पना. या योजनेंतर्गत ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंतची मदत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. त्याव्यतिरिक्त महाज्योतीमार्फत स्पर्धा-परीक्षा प्रशिक्षण आणि ‘अर्थसाहाय्य योजना’, ‘कौशल्य विकास प्रशिक्षण योजना’, परदेशात उच्च शिक्षणासाठी ‘शिष्यवृत्ती योजना’, ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना’, ‘मोदी आवास योजना’, ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना’, ‘संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना’, इतर मागास वर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ‘मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना’, ‘महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना’, ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना’, केंद्र शासनाच्या ‘स्टॅण्डअप इंडिया योजनें’तर्गत महिलांकरिता ‘मार्जिन मनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना’ अशा योजना ’पायलट मोड’वर राबविण्याचे कामही अतुल सावे करीत आहेत.
 
गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंत्री अतुल सावे यांनी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार या परिसराचा आठ टप्प्यांत विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये दुर्मीळ प्राणी, वन्यजीव व वनस्पतींचा शोध घेणे सोपे होईल. अत्याधुनिक गोशाळा उभारणे, बोटिंग, बगीचा, कलादालन आदी उभारण्यात येत आहे. हे करत असताना पर्यावरण संवर्धनास प्राधान्य दिले जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराबाबत त्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हे २०३० पर्यंत अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून ५० टक्के विजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास त्यांना आहे. एकूणात, ‘व्हिजनरी’ व्यक्तीच्या हातात नेतृत्व गेले की, बदलाचे वारे वाहू लागतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘व्हिजनरी’ नेतृत्वात मंत्री सावे हेदेखील ‘अतुल’नीय काम करीत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर बहरत जावो; त्यांना दीर्घायुष्य लाभो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने शुभेच्छा!

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121