मुंबई : संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. भाजप नेते सुरेश धस हे सातत्याने या प्रकरणावर आवाज उठवत असून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.
दुसरीकडे, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या मागण्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणे हीदेखील मागणी होती. त्यानंतर आता या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे लवकरच या हत्या प्रकरणातील धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.