स्वयंपुनर्विकास नव्हे हे तर आत्मनिर्भर हाऊसिंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वयंपुनर्विकसित इमारतीचे कौतुक

    26-Feb-2025
Total Views | 34
 
Self-sufficient housing is not self-redevelopment Devendra Fadanvis
 
 मुंबई: (Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्‍या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साहाय्याने चारकोप ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन आणि चावीवाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते तथा मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘म्हाडा’ अधिकार्‍यांचेही कान टोचले. मुख्यमंत्री म्हणाले की, “मला ‘म्हाडा’ मुंबई गृहनिर्माणला सांगायचे आहे. तुम्ही मागच्या काळात चांगले काम केले आहे. आपण सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली. या सिंगल विंडो सिस्टीममध्ये ४५ प्रस्ताव तुमच्याकडे प्राप्त झाले. त्यापैकी ४२ प्रस्तावांना तुम्ही मान्यता दिली, पण मी या गतीने समाधानी नाही. कारण, आमच्याकडे 1 हजार, 600 प्रस्ताव आहेत आणि तुमच्याकडे ४२-४५ प्रस्ताव का आले? हे सगळे १ हजार, ६०० प्रस्ताव तुमच्याकडे का आले नाहीत? याचा अर्थ असा आहे की, आपण ही जी सिंगल विंडो सुरू केलेली आहे, याच्यामध्ये अद्यापही लोकांना अडचणी आहेत. मी आजच सांगतो स्वयंपुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही,” असा इशाराच फडणवीस यांनी दिला.
 
 
स्वयंपुनर्विकासात प्रीमियमवर तीन वर्षे व्याज नाही
 
“स्वयंपूर्ण विकासाच्या संदर्भात सुरुवातीला प्रीमियम भरावा लागतो आणि काम सुरू व्हायला दोन ते तीन वर्षे लागतात आणि मग त्याचा बोजा तिथल्या नागरिकांवर पडतो. स्वयंपूर्ण विकासामध्ये आधीचे पैसे कुठून भरायचे, हा प्रश्न होता. आपण मागच्या काळामध्ये त्याच्याकरिता मुभा दिली. आपण सांगितले की, हे पैसे तीन वर्षांत भरता येतील. त्याच्यामध्ये आपण एक रायडर टाकला तीन वर्षांत भरा, पण त्याच्यावर साडेआठ टक्के व्याज आपण घेतो. यावेळी सोसायटीवर बँकेचे व्याज आणि प्रीमियमचे व्याज म्हणजे दुप्पट व्याज त्याला भरावे लागते. म्हणून आज मी घोषणा करतो की, स्वयंपूर्ण विकासाच्या बाबतीत हे व्याज रद्द केले जाईल, त्याला व्याज लागणार नाही. हे व्याज केवळ तीन वर्षांपर्यंत माफ होईल. मार्च २०२६ पर्यंत स्वयंपूर्ण विकासाचे जेवढे प्रपोजल येतील, त्या सगळ्या प्रपोजल करता ही व्याज माफी लागू असेल,” अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
 
 
आमदार प्रविण दरेकरांच्या नेतृत्वात समितीची घोषणा
 
 “मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकरांच्या नेतृत्वात एक समिती यावेळी नेमण्यात आली. या समितीने स्वयंपूर्ण विकास आणि क्लस्टर स्वयंपूर्ण विकास यांच्यामध्ये काय काय अडचणी आहेत, त्या अडचणींचा आढावा घ्यावा. राज्यातील सर्व आमदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या भागामध्ये काय अडचणी आहेत, त्या त्यांच्याकडून समजून घ्याव्यात, समग्र रिपोर्ट हा जर सरकारला सादर करावा. या सूचनांचा नवीन हाऊसिंग पॉलिसीमध्ये विचार करून स्वयंपूर्ण विकासमध्ये त्याचा समावेश करता येईल. हा स्वयंपूर्ण विकास नाही, हा आत्मनिर्भर विकास आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. चारकोप येथील ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाजूलाच सेक्टर-1मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी राजे मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास आ. स्नेहा दुबे, आ. अतुल भातखळकर, विधान परिषदेच्या आ. चित्रा वाघ, आ. निरंजन डावखरे, माजी खा. गोपाळ शेट्टी, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे संचालक आ. प्रसाद लाड, शिवाजी नलावडे, नंदकुमार काटकर, ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर तसेच ‘म्हाडा’ मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या १५ नाही, तर १  हजार, ५०० सोसायटी तयार होतील. या पुनर्विकासासाठी जी काही मदत लागेल, ती सर्व मदत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केली जाईल. कोस्टल रोडचे काम वर्सोवापासून पुढे उत्तर मुंबईपर्यंत येईल. यामुळे अर्ध्या तासात विधान भवन गाठणे शक्य होईल. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आजचा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल. आगामी महानगरपालिका निवडणुकीत १३८ हून अधिक नगरसेवक आम्ही पालिकेत पाठवू, हा विश्वास मी देऊ इच्छितो. मुंबई पालिका निवडणुकीत ट्रिपल इंजिन सरकार नागरिकांच्या सेवेत येईल.
 
- पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री
 
 
मुंबईतील मराठी माणूस आता मुंबई बाहेर जाणार नाही. आज इथे चहुबाजूंना सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या इमारती विकसित होत आहेत. लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, महाराष्ट्र सरकार स्वयंपूर्ण विकासाला त्या ठिकाणी चालना देत आहे आणि त्याच्यामुळे मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. सेल्फ रिडेव्हलपमेंटचे शिल्पकार हे देवेंद्र फडणवीस आहेत. हाऊसिंग सेक्टरमध्ये मुंबई आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही. बिल्डरशाही आपल्याला नष्ट करायची आहे. आमच्याकडे स्वयंपुनर्विकासासाठी १ हजार, ६०० प्रस्ताव आले आहेत. 
 
- प्रविण दरेकर, अध्यक्ष, मुंबई जिल्हा बँक
 
 
हा केवळ चावीवाटपाचा कार्यक्रम नाही, तर स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून एक एक व्यक्ती ज्यांना आज चावी देणार आहोत, त्या व्यक्तीचे नाव करोडपतीच्या यादीमध्ये सामील होणार आहे. ४५० चौ. फुटांमध्ये राहणारा व्यक्ती १ हजार, १००  चौ. फुटांच्या घरात राहायला जात आहे.
 
- योगेश सागर, आमदार
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121