भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी दररोज १५ मिनिटे वृत्तपत्र वाचा! कडोंमपाच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांचा सल्ला

    26-Feb-2025
Total Views |
 
Indu Rani Jakhad
 
डोंबिवली : मुलांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर दररोज १५ मिनिटे वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे. त्यातून नवीन शब्द समजतात, असा सल्ला कडोंमपाच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 
भारत विकास परिषद, हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या शाळांकरिता गुरूवंदन-छात्र अभिनंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभाग उपायुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, प्रकल्पप्रमुख खुशबू चौधरी, संस्थेच्या अध्यक्षा वृंदा कुळकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  मस्साजोग प्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
 
याप्रसंगी बोलताना आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड म्हणाल्या की, "उच्च शिक्षण घेताना इंग्रजी भाषा येणे गरजेचे असून मुले भाषा ही ऐकून शिकत असतात. भाषा शिकण्यासाठी सुरूवातीपासूनच त्यावर लक्ष केंद्रीत करावे. मुलांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर दररोज १५ मिनिटे वृत्तपत्राचे वाचन केले पाहिजे. यातून नवीन शब्द आणि कसे बोलावे हे समजते. त्यामुळे दररोज वाचन करा," असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 
तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही!
 
"सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले काही गोष्टी लवकर शिकतात. पण तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेसुद्धा आहेत. तंत्रज्ञानामुळे मुलांना लहान वयात शिकण्यासाठी ज्या गोष्टी योग्य नाहीत त्यादेखील त्यांना लवकर समजत आहेत. यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून शिक्षकांनी मुलांमध्ये जागृरूकता निर्माण केली पाहिजे. मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होण्यासाठी गुरूंनी त्यांना चांगल्या गोष्टी करायला लावणे आणि वाईट गोष्टीपासून परावृत्त केले पाहिजे," असेही त्यांनी सांगितले.