बंगाली नववर्षाला शेकडो गायींची कत्तल करण्याची धमकी
कट्टरपंथींचा उन्माद सुरूच; युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत
26-Feb-2025
Total Views | 39
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Cows slaughter in Bangladesh) बांगलादेशात मोहम्मद युनूस सरकार आल्यापासून इस्लामिक कट्टरपंथींचा उन्माद प्रचंड प्रमाणात वाढलाय. गंभीर म्हणजे बंगाली नववर्षाचे इस्लामिक सणात रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही कट्टरपंथींनी दि. १४ एप्रिल रोजी पोहेळा बैशाखच्या मुहूर्तावर शेकडो गायींची कत्तल करण्याची धमकी दिल्याचे निदर्शनास आले आहे. अवघ्या दोन महिन्यांवर हा सण येऊन ठेपला असून कट्टरपंथींच्या या धमक्यांमुळे हिंदू समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
ढाक्याच्या रामना पार्कमध्ये रामना बटमुल वटवृक्षाखाली दरवर्षी पोहेला बैशाखच्या निमित्ताने मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम १९६१ मध्ये स्थापन झालेल्या छायानट म्युझिक स्कूलद्वारे चालवला जातो, जो बंगाली संस्कृती आणि संगीताचा प्रचार करतो. मात्र पोहेळा बैशाखच्या मुहूर्तावर शेकडो गायींची कत्तल करण्याबाबतच्या धमक्या सोशल मीडियावर उघडपणे दिल्या जात आहेत. मात्र युनूस सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सल्लागार मोस्तफा सरवर यांनी सदर प्रकरण हलक्यात घेतल्याचे पाहायला मिळतंय.
मोस्तफा सरवर यांच्या म्हणण्यानुसार, लोक सोशल मीडियावर खूप काही बोलतात, आम्ही प्रत्येक गोष्टीचे उत्तर देऊ शकत नाही. पोहेला बैशाख हा मोठा सण आहे. तो नेहमीप्रमाणे साजरा केला जाईल. मी एवढेच सांगू शकतो." यावरून युनूस सरकार इस्लामिक कट्टरपंथीयांना एकाअर्थी प्रोत्साहन देत असल्याचेच स्पष्ट होते आहे.
रामना पार्कमध्ये दोन बॉम्बस्फोट
रमणा पार्कमधील शेकडो गायींची कत्तल करण्याच्या धमकीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. याआधीही १४ एप्रिल २००१ रोजी इस्लामिक दहशतवादी संघटना 'हरकत-उल-जिहाद-अल-इस्लाजी'ने रामना पार्कमध्ये दोन बॉम्बस्फोट घडवून आणले होते, ज्यात ९ जण ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले होते. त्या हल्ल्यातील ८ दहशतवादी आरोपींना २०१४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
बंगाली नववर्षाचा पहिला दिवस
पोहेळा बैशाख हा बंगाली नववर्षाचा पहिला दिवस असून हा सण बंगाली समुदायासाठी खूप महत्त्वाचा आहे. पोहेळा बैशाखला 'नोबोशो' म्हणूनही ओळखले जाते. बंगाली समुदायांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बांगलादेशमध्ये पोहेळा बैशाख १४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारतात पोहेळा बैशाख १५ एप्रिल रोजी साजरा केला जातो.