
दै.‘मुंबई तरुण भारत’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराधारित दैनिक आहे. आतापर्यंतच्या संचालकांनी संघाच्या विचाराने समाजात समरसता निर्माण करण्याचे काम दक्षतेने केले आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे, निरनिराळ्या ज्ञातींच्या माध्यमातून बनलेल्या हिंदू समाजाचा सर्वांगीण विकास साधणे. ज्ञाती ही संस्कृती, अस्मिता आणि समाजाची ओळख असते. आपल्या सर्व सांस्कृतिक परंपरांचे पालन आपण आपल्या ज्ञातींच्या माध्यमातून पाठपुरावा करून करीत आलेले आहोत. हिंदू धर्माने आपल्याला शिकवलेल्या ज्या परंपरा आहेत, त्यांचे पालन आपण ज्ञातींच्या विविध परंपरागत कार्यक्रमांतून करतो. मग ते परंपरागत चालत आलेले लग्न, बारसे सोहळा किंवा अन्य कार्यक्रम असतील. त्यामुळे ज्ञाती हा त्याच्या भेदाभेदाचा भाग सोडला, तर ज्ञाती ही समाजबांधवांना एकत्र आणणारी, एकमेकांना साहाय्य करण्यासाठी स्वयंचलित उभारलेली रचना आहे. समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, समाजातील युवा-युवतींच्या लग्नकार्याविषयी पुढाकार घेणे, त्यांच्या सांसारिक गोष्टींबाबत काही विषय असल्यास ज्ञाती संस्था या मध्यस्थी करून समंजस मध्यमार्ग काढण्याची भूमिका घेतात. समाजातील गरजूंना आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता ज्ञाती संस्था करत असतात. त्या ज्ञातींच्या माध्यमातून आपण समाजप्रबोधनाच्या महाजागरणांचा विषय जर मांडू शकलो, तर त्याला चांगले यश येते. प्रबोधनाच्या विषयाचे गांभीर्य दै. ‘मुंबई तरुण भारत’ ओळखते. त्यामुळे ज्या ज्ञातींचे राजकीय संघटन सक्रिय नाही, अशा ज्ञातींना निरनिराळ्या प्रकारच्या शासकीय योजना असतील, निरनिराळ्या क्षेत्रांत यशप्राप्ती केलेल्या लोकांचे अनुभवकथन असतील, हे सर्व अनुभव अथवा माहिती स्वरूपात आपण समाजातील लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, तर त्याचा लाभ नक्की प्राप्त होईल. समाजात सन्मानाने वावरायचे असेल तर व्यक्तीला एका विशिष्ट गरजांची पूर्तता करून निधी जमवण्याइतक्या सन्मानजन्य रोजगारांची गरज आहे. याकरिता बारा बलुतेदार आणि अठरापगड ज्ञातींतील सर्वसामान्य जनांनी पुढाकार घेणे व सांघिक संधी निर्माण करणे आवश्यक आहे. (ECOSYSTEM) एकमेकांशी समन्वय साधून जर आपण आर्थिक उन्नती साधू शकलो, सामाजिक न्याय ही जबाबदारी समजून एक वेगळी ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण करू शकलो, तर आपण सामाजिक कार्याची जबाबदारी पार पडत आहोत, असे समजू. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने उभारण्यात आलेल्या समाजिक न्याय विभागाची ही सर्व प्राथमिक जबाबदारी आहे. याकरिता या विभागाच्या वरिष्ठ प्रतिनिधी योगिता साळवी आणि सहप्रतिनिधी सागर देवरे हे समाजातील सर्व मान्यवर, सनदी अधिकारी, उद्योजक, संस्थाने, तळागाळापर्यंत सक्रिय असलेले कार्यकर्ते व समाजासाठी कार्यरत असलेले राजकारणी यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या कार्य आणि विचारांना व्यासपीठ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. यानिमित्ताने दै.‘मुंबई तरुण भारत’ या सर्व संकल्पनांमध्ये इच्छुक असलेल्या सगळ्यांचे स्वागत...
- किरण शेलार, संपादक