प्रभू राम हीच भारताची खरी ओळख. कारण, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत समस्त भारतीयांना एकत्र आणणारा दुवा हा रामच आहे, हे गतवर्षी अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून दिसून आले. पण, गेल्या दहा वर्षांत आपला प्राचीन वैभवशाली आत्मा पुन्हा प्राप्त करणार्या भारताबद्दल या विकृत आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित लिब्रांडूंना म्हणूनच भीती वाटतेे. त्यापैकीच एक म्हणजे खरा भारत आणि या भारताचे मर्म न समजलेल्या इंदिरा जयसिंह!
गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना न्याय देण्यास प्राधान्य देण्यापेक्षा गुन्हेगारांच्या हक्कांबाबत अधिक सहानुभूती बाळगणारे महाभाग भारतात भरपूर आहेत. त्यात प्रामुख्याने डॉक्टर, वकील, प्राध्यापक वगैरे उच्चशिक्षित बुद्धिजीवींचा भरणा अधिक. गुन्ह्याला बळी पडलेल्यांपेक्षा गुन्हेगारांसाठी ज्यांच्या मनात जास्त कणव आहे, अशा विकृत वकिलांमध्ये इंदिरा जयसिंह या अग्रगण्य. नुकत्याच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. “अनेकांना (प्रभू) राम ही भारताची संकल्पना वाटते, पण मला तशी ती वाटत नाही. माझ्या दृष्टीने भारताची राज्यघटना हीच माझी भारतासंबंधीची संकल्पना आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच “सेक्युलर राज्यघटना अस्तित्वात असताना भारत हे कधीच हिंदूराष्ट्र बनू शकत नाही,” असेही तारे त्यांनी तोडले आहेत.
सध्याचा काळ हा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा आहे. काहीही वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची आणि समाजमाध्यमांमध्ये झळकत राहायचे हा काहीजणांचा आवडता उद्योग. रणवीर अलाहाबादिया हे अलीकडचे उदाहरण असून, त्यात आता इंदिरा जयसिंह यांचाही कदाचित समावेश करावा लागेल. एक तर त्यांच्या वक्तव्यांमध्ये ना तर्कशुद्धता आहे आणि कोणत्याही गोष्टीचा संबंध कोणत्या तरी भलत्याच गोष्टीशी जोडण्याचा त्यांचा हा अजब स्वभाव.
ज्या सेक्युलर राज्यघटनेची ग्वाही त्या देतात, त्याच राज्यघटनेच्या पहिल्या छापील आवृत्तीत प्रभू राम, कृष्ण, भगवान बुद्ध वगैरे महान देवतांची आणि रामायण-महाभारत यांसारख्या आर्ष महाकाव्यांतील घटनांची चित्रे छापली होती, ही गोष्ट या वकीलबाईंना ठावूक नसावी. घटनाकारांनी अनेक कायदे करताना रामायण-महाभारत, तसेच भगवद्गीता वगैरे प्राचीन महाकाव्यांतील तत्त्वज्ञानाचा आधार घेतला आहे. ही गोष्ट घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच मान्य केलेली आहे.
काही वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील नृशंस गुन्हेगारांना निर्भयाच्या मातापित्यांनी माफ करावे, असे मत याच जयसिंहबाईंनी व्यक्त केले होते. बाकी काही नाही, पण एक महिला या नात्याने जरी इंदिराबाईंनी या घटनेकडे पाहिले असते, तरी त्यांच्या मनात असे विकृत विचार आलेच नसते. बलात्कार हा असा एक गुन्हा आहे की, त्यातील गुन्हेगाराला केवळ टोकाची शिक्षा देणे, हाच किमान सामान्य न्याय होऊ शकतो. भारतासारख्या देशात सध्या कोणत्याही गुन्हेगाराला न्यायालयाकडून शिक्षा होणे हीच एक नवलाईची बाब बनली असताना, अशा भीषण गुन्ह्यातील गुन्हेगारांना मोकळे सोडणे हा समाजाचा उपमर्द मानला पाहिजे. पण, आपल्या विकृत तत्त्वज्ञानाला कवटाळून बसणार्यांकडून इतक्या संवेदनशीलतेची अपेक्षा करणेच चुकीचे.
अर्थात, या इंदिराबाईंच्या निवडक सवंगपणाची ही एकच घटना नव्हे. मुंबईतील भीषण साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याला फाशी देऊ नये, अशी मागणी करणार्या अतिशहाण्यांमध्ये या इंदिराबाईंचा समावेश होतो. त्यांनीच फाशीला केवळ काही तास शिल्लक असताना, याकूबला वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पहाटे सुनावणी घेतली होती. यावरून त्यांची भारतासंबंधीची संकल्पना काय आहे, ते पुरेसे स्पष्ट होते. म्हणूनच अफझल गुरूच्या फाशीलाही त्यांनी विरोध केला होता, त्यात नवल नाही. रावणासारख्या प्रकांड ज्ञानी व्यक्तीलाही त्याने मर्यादा सोडून केलेल्या वर्तनाबद्दल देहान्त शिक्षा देणे, हाच न्याय होता, हेच रामाने दाखवून दिले. हाच तमाम भारतीयांचा विश्वास आहे. तो इंदिराबाईंसारख्या विकृत आणि सवंगतेला स्वीकारणार्यांच्या कल्पनेपलीकडचा आहे. त्यांनी मोदी सरकारने नुकतेच लागू केलेल्या तीन दंडविधान कायद्यांनाही विरोध केला आहे. कारण, त्यात ‘दंडा’पेक्षा ‘न्याय’ देण्यावर भर दिला आहे. ही गोष्ट जयसिंहसारख्यांना पटणारी नाही.
भारत हा सेक्युलर देश आहे, याचे कारण त्यात हिंदू हे बहुसंख्य आहेत. ही गोष्ट आजवर अनेक परदेशी नामवंत व्यक्तींनीही मान्य केली आहे. ज्या इंदिरा जयसिंह सेक्युलॅरिझमची इतकी ग्वाही देतात, त्यांनी अशा एका तरी इस्लामी देशाचे नाव सांगावे, जेथे सेक्युलॅरिझम अस्तित्त्वात आहे. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर ‘गॉड ब्लेस अमेरिका’ असे शब्द उच्चारतात, ते कोणाला आक्षेपार्ह वाटत नाही. पण, भारतात कोणी ‘जय श्रीराम’ म्हटले, तर त्यात मात्र त्यांना धार्मिकता दिसते. हा विकृत राजकीय मनोवृत्तीचा भाग म्हणावा लागेल. मुळात ‘हिंदू’ आणि ‘सेक्युलॅरिझम’ हे समानार्थी शब्दच. म्हणूनच घटनाकारांनी राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाचा वापर केलेला नव्हता. तो राजकीय कारणास्तव बेकायदेशीरपणे त्यात नंतर घुसडण्यात आला होता. कारण, ‘हिंदूराष्ट्र’ ही धार्मिक कट्टरवादी संकल्पना नाही.
एक तर भारतात आजही हिंदू बहुसंख्य असल्याने एका अर्थाने हे हिंदूराष्ट्रच आहे. पण, या शब्दाकडे केवळ धार्मिक अंगाने पाहणार्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे. याचे कारण हिंदू धर्म सोडल्यास अन्य धर्मांमध्ये, म्हणजे अब्राहमिक धर्मांमध्ये, अन्य धर्मीयांबद्दल सहिष्णुतेचा पूर्ण अभाव आहे. म्हणूनच या वर्गाकडून हिंदूराष्ट्र म्हणजे अन्य धर्मीयांना दुय्यम नागरिकत्व अशी समजूत हेतूत: करून दिली जाते. इंदिरा जयसिंह यांच्यासारख्यांना ना भारतीय तत्त्वज्ञानाचे मर्म कळले आहे, ना भारतीय इतिहासातून त्या काही शिकल्या आहेत. त्यामुळे त्या सवंग आणि एकतर्फी वक्तव्ये दडपून करतात.
आजच्या काळात हिंदू समाजाचा सामूहिक आत्मा त्याच्या सेक्युलॅरिझमच्या ग्लानीतून बाहेर पडत असल्याने इंदिराबाईंसारख्या अनेक दिवट्या लोकांची मन:स्थिती सैरभैर होऊ लागली आहे. कुंभमेळ्याला लोटलेल्या कोटीच्या कोटी लोकांच्या गर्दीने जयसिंहसारख्यांचे तकलादू आणि निवडक तत्त्वज्ञान पाचोळ्यासारखे भिरकावून दिले आहे. स्वातंत्र्यानंतर निवडक सेक्युलॅरिझमची गुटी पाजून निपचित पाडलेल्या हिंदू समाजमनाला त्यातून बाहेर काढण्याचे महत्कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारत पुन्हा एकदा आपल्या मूळ ‘स्व’ची ओळख शोधत आहे. ही ओळख आहे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची, ‘सर्वे सन्तु निरामया:’ची तसेच ‘विनाशाय च दुष्कृताम्’चीही! हीच गोष्ट या लिब्राडूंना सहन होत नाहीये, कारण ती त्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडची आहे!