हिंगोली : शरद पवार हे मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी नांदेड-हिंगोली दौरा करणार होते. परंतू, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी सर्व दौरे रद्द केले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
मंगळवारी सकाळी शरद पवार नांदेड येथील नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार होते. त्यानंतर दुपारी हिंगोली येथे स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी गौरव सोहळ्याला ते उपस्थित राहणार होते. परंतू, सोमवारी संध्याकाळी त्यांचा खोकल्याचा त्रास वाढल्याने त्यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे त्यांनी दौरा रद्द केला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.