नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात वाढ होणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
25-Feb-2025
Total Views | 56
नागपूर : राज्य सरकारने सुरु केलेल्या 'नमो शेतकरी सन्मान योजने'अंतर्गत शेतकऱ्यांना मिळत असलेल्या वार्षिक ६ हजार रुपयांच्या अनुदानात आणखी ३ हजार रुपयांची वाढ होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १९व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वनामती, नागपूर येथून उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेला अनुसरून राज्य सरकारने सुरु केलेल्या 'नमो शेतकरी सन्मान योजने'अंतर्गत शेतकरी बांधवाना मिळत असलेल्या वार्षिक ६ हजार रुपयांच्या अनुदानामध्ये आणखी ३ हजार रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वार्षिक १५ हजार रुपये जमा होतील. या अर्थसहाय्यामुळे विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होणार आहे."
शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय!
ते पुढे म्हणाले की, "यापूर्वीच्या कार्यकाळात बळीराजा संवर्धन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत सुमारे २५ हजार कोटींचे ८९ प्रकल्प विदर्भात पूर्ण केले. तसेच 'स्व. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने'च्या माध्यमातून राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भात पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींची जलसंवर्धनासह इतर विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत. तर आणखी ६ हजार कोटींची विकासकामे सुरु आहेत. शासनाने
राज्यात जलसंधारणाच्या सुमारे १५० योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय आहे," असे ते म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिक स्पर्धेतील सहभागी शेतकरी तसेच प्रगतीशील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.