प्रत्येक कोकणी माणसाच्या घराच्या बांधावर असणारा आंबा म्हणजे रायवळ. हापूस आंब्याच्या झगमगाटात दुर्लक्षित राहिलेला रायवळ आंबा टिकवणे म्हणजे आपल्या इतिहासाला, संस्कृतीला आणि चवीला अभिवादन करणे होय. त्याविषयी आढावा घेणारा हा लेख...
रायवळ आंबा म्हणजे केवळ फळ नाही, तर एक कथा आहे. आपल्या जमिनीची, आपल्याला जोडणार्या परंपरांची आणि त्या साध्या, गोड सुखाची जी देशी गावरान सुगंधात मिसळलेली आहे. रायवळ आंब्याचे संवर्धन म्हणजे केवळ फळांचे उत्पादन नव्हे, तर एक संपूर्ण परंपरेचे पुनरुज्जीवन. या सुवर्णफळाच्या अस्तित्वासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. रायवळ आंबा टिकवणे म्हणजे आपल्या इतिहासाला, संस्कृतीला आणि चवीला अभिवादन करणे होय.
रायवळ आंब्याची चव म्हणजे अमृताची अनुभूती. त्याचे आरोग्यदायी गुण खर्या अर्थाने सोन्याहून पिवळे म्हणावे लागतील. अॅण्टिऑक्सिडंट्सने भरलेला हा आंबा पचन सुधारतो, शरीराला ऊर्जा देतो आणि त्वचेला तेजस्वी ठेवतो. देशी रायवळ आंबा किती जुना आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे, पण काही नोंदीप्रमाणे रायवळ आंबा हा भारतीय शेतकर्यांच्या बांधावर अनेक पिढ्यांपासून आहे. वेद-उपनिषदांमधे फळांचा राजा म्हणून त्याला गौरव देण्यात आला आहे. रायवळ आंबा आपल्याला भारतीय संस्कृतीच्या गाभ्याशी जोडतो. तो जुन्या मंदिरांच्या पायथ्याशी, आश्रमांमध्ये आणि आपल्या पिढीजात बागांमध्ये प्रथा आणि परंपरांचे जतन करत आजतागत उभा आहे.
हायब्रीड आंब्यांच्या झगमगाटात आपण आपल्या पारंपरिक, गावरान देशी रायवळ आंब्याला विसरत आहोत. हायब्रीड आंबे मोठे, रसाळ आणि दीर्घकाळ टिकणारे असले, तरी त्यात आपल्या रायवळच्या नैसर्गिक स्वादाचा, सुगंधाचा आणि पाचक गुणधर्मांचा अभाव आहे. हा देशी आंबा फक्त खाण्यासाठी नव्हे, तर आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक आहे. रायवळ आंबा टिकला पाहिजे, कारण तो नष्ट होणे म्हणजे आपल्या परंपरेशी जोडलेली नाळ तोडणे होय.
रायवळ आंब्याचे महत्त्व व संवर्धनाची गरज - मोठ्या प्रमाणावर व्यापारी आंब्यांच्या (हापूस, केशर, तोतापुरी) लागवडीमुळे रायवळ आंब्याचा प्रसार कमी होत आहे. मात्र, हा आंबा स्थानिक परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो कोणत्याही विशेष खताशिवाय नैसर्गिकरित्या वाढतो आणि स्थानिक कीटक आणि पक्ष्यांसाठी तो उत्तम अन्नस्रोत आहे. तसेच पर्यावरणपूरक शेतीसाठी पारंपरिक रायवळ हा उत्तम पर्याय ठरू शकेल. जैविक आणि औषधी गुणधर्म - चरक संहितेत ही आंब्याचा उल्लेख त्रिदोष शामक (वात, पित्त, कफ संतुलित करणारे) फळ म्हणून केला आहे.
पचनसंस्थेसाठी लाभदायक - नैसर्गिक एन्झाइम्स पचन सुधारते.
रक्तशुद्धी करणारे गुणधर्म - ‘क’ जीवनसत्त्व आणि अॅण्टिऑक्सिडंट्स रक्तातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात.
त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक - रायवळ आंब्यातील पोषक तत्त्वे त्वचेला तजेलदार ठेवतात आणि वृद्धत्व लवकर येऊ देत नाहीत.
संवर्धनासाठी काय उपाययोजना करायला हव्यात?
जंगलांमध्ये व पारंपरिक बागांमध्ये असलेल्या रायवळ आंब्याच्या झाडांचे नोंदणीकरण करणे.
उत्तम प्रतीच्या रायवळ आंब्याच्या फळांमधील बिया गोळा करून त्यापासून रोपटी तयार करावीत.
जैविक पद्धतीने रायवळ आंब्याचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक शेतकर्यांना मार्गदर्शन करणे.
पारंपरिक वाणांचे फायदे व त्यांचे संवर्धन कसे करावे, याबाबत कार्यशाळा आयोजित करणे.
स्थानिक बाजारपेठेत तसेच निर्यातीसाठी रायवळ आंब्याचा प्रचार करणे.
रायवळ आंब्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये यांविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
वरील उपाययोजना राबविल्यास देशी रायवळ आंब्याचे संवर्धन आणि जतन प्रभावीपणे करता येईल. यासाठी ठोस पाऊले उचलल्यास स्थानिक जातींच्या संवर्धनामुळे पर्यावरण आणि शेतकरी दोघांचेही भले होईल.
पर्यावरणीय फायदे
स्थानिक झाडांची मुळे जमिनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी देशी रायवळ वृक्ष उपयुक्त आहेत.
रायवळ आंब्याच्या झाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने भूजल पातळी संतुलित राहते. शिवाय, मोठी झाडे हवेत आर्द्रता निर्माण करून स्थानिक पर्जन्यमानावर सकारात्मक परिणाम करतात.
बदलत्या हवामानाशी लढा देण्यासाठी रायवळ आंब्यासारख्या स्थानिक जाती अतिशय उपयुक्त ठरतील.
सतीश दिवेकर