त्या महिलेने, मुस्लीम महिलेच्या हिजाबनेच तिचा गळा आवळला. नंतर दुसर्या मुस्लीम महिलेलाही मारहाण केली. दोन मुस्लीम महिलांना मारहाण केली, म्हणून आता पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्या मुस्लीम महिलांचे म्हणणे होते की, आम्ही शॉपिंग सेंटरमध्ये हिजाब घालून आलो, म्हणून त्या महिलेने आमच्यावर हल्ला केला. ही घटना आहे ऑस्ट्रेलियाची. यावर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानानी म्हटले की, असा धार्मिक भेदभाव ऑस्ट्रेलियामध्ये खपवून घेतला जाणार नाही. पण, तरीही ऑस्ट्रेलियातील मुस्लीम संघटनांनी एकजूट होत, ऑस्टे्रलियन शासन प्रशासनाला जाब विचारला आहे.
‘ऑस्ट्रेलियन फेडरेशन ऑफ इस्लामिक काऊन्सिल’चा अध्यक्ष, रातेब जेनीड यांनी, देशातील मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली, तर ऑस्ट्रेलियातील प्रमुख पदावर असलेल्या सर्वच मुस्लिमांनी म्हटले की, ऑस्टे्रलियन सरकार प्रशासन मुस्लिमांवर होणार्या हल्ल्याचा गांभीर्याने विचार करत नाही. हल्ला झाला की, केवळ शोक व्यक्त करतात आणि मग त्या घटनेला न्याय मिळत नाही. अर्थात ही झाली ऑस्ट्रेलियातील मुस्लिमांची मतं. पण, ऑस्ट्रेलियातील 43 टक्के लोकसंख्या असलेल्या, ख्रिश्चन समाजाचे मत वेगळेच आहे. त्यांचे मत आहे की, मुस्लीम समाज दिवसेंदिवस कट्टरपंथी बनत चालला आहे. देश आमचा असूनही, त्यांची संस्कृती ते देशावर लादू पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया येणारच.
याच ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिश्चन धर्मीय असूनही, आपण कोणत्याच धर्माला मानत नाहीत, आपण निधर्मी आहोत, असे मानणार्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 38 टक्के आहे. यांनी धर्माला नाकारले आहे. जन्माने खिश्चन धर्मीय असूनही कोणत्याच धर्माची बांधिलकी नसल्याने, या 38 टक्के वाल्यांना धर्मांतरित करण्याचे मनसुबे कट्टर मुस्लीमपंथी रचत असतात. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी, 30 ऑस्ट्रेलियन महिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. अगदी मशिदीमध्ये जाऊन त्यांनी, इस्लाम कबुल केला. कारण काय सांगितले, तर पॅलेस्टाईन इस्रायल युद्धात, इस्रायलची सरशी होत आहे. पराभवाच्या विनाशातही पॅलेस्टाईनचे लोक इस्लामसाठी मरेपर्यंत लढतात. त्यामुळे आम्हांला इस्लाम धर्माचे आकर्षण वाटून, इस्लाम स्वीकारत आहोत.
या घटनेने जगभरचे मुस्लीम खूश झाले होते. अर्थात आता या 30 महिला कुठे आहेत, याचा काही संदर्भ लागत नाही. ‘द केरला फाईल’ भारतताच घडत नसावी, तर ‘ऑस्ट्रेलिया फाईल’ही आहे, असे म्हणायला वाव आहे. असो. थोडक्यात ऑस्ट्रेलियामध्ये लोकांना आता ’मुस्लीमफोबिया’ने घेरले आहे. हिजाब घातलेल्या महिला. मिशी नसून दाढी राखलेले, जाळीदार टोपी घातलेले पुरुष यांना पाहिले की, लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. अर्थात सगळेच काही दहशतवादी हल्ला करणारे नसतात. पण, लोकांच्या मनात ती भीती झाली आहे. अर्थात याला कारण, जगभरात मुस्लीम शरणार्थी आणि मुस्लीम नागरिकांची कृत्ये. त्यातही ‘हमास’चा इस्रायलवरचा क्रूर हल्ला. आफ्रिका खंडातील मुस्लीम देशामधले गृहयुद्ध, किड्यामुंगींसारखी मारली जाणारी माणसे आणि नरकासारखे जिणे जगणार्या मुस्लीम स्त्रिया. या सगळ्यांमुळे जगभरात मुस्लिमांबद्दल, काही समज गैरसमज रूजले आहेत. त्याचेच पडसाद ऑस्ट्रेलियासह पाश्चात्य देशात उमटत आहेत.
पण, हे पडसाद अनाठायी आहेत का? याचा मागोवा घेताना, ती घटना आठवली. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील दोन परिचारिका महिलांचे ऑनलाईन चॅट उघड झाले. त्यात एक परिचारिका म्हणते की, “इस्पितळामध्ये उपचार करण्यासाठी आलेल्या, कितीतरी इस्रायली ज्यू व्यक्तींचा मी जीव घेतला आहे.” दुसरीही तिच्या म्हणण्याला दुजारा देते. तसेच, या परिचारिकेने इस्रायली रूग्णांवर उपचार करायलाही नकार दिला. याबाबतची त्यांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर, या दोन परिचारिकांना निलंबित करण्यात आले. ऑस्ट्रेलियात राहणार, खाणार आणि मरणारसुद्धा ऑस्ट्रेलियात. मात्र, काळजी वाहणार पॅलेस्टाईन गाझाची. त्यामुळे या घटनेने ऑस्ट्रेलियाचे वातावरण तापले होते. त्यातच ऑस्ट्रेलियामधील मुस्लीम संघटना या परिचारिकांच्या पाठी उभ्या राहिल्या. ‘हिजबुल-उत-तहरीर’ या अतिरेकी संघटनेने, तर या महिलांचे अभिनंदन केले. हे असे सगळे घडल्यावर ऑस्ट्रेलियामध्ये मुस्लीमफोबिया वाढला असेल, तर त्यात नवल काय? हं जीव जाईपर्यंत भाईचारा जपण्याचे हिंदूचे कौशल्य, ऑस्ट्रेलियामध्ये अजनूही पोहोचले नाही म्हणायचे!
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.