मराठवाडा विद्यापीठातील डॉ.पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केली नाराजी
23-Feb-2025
Total Views | 88
नवी दिल्ली : " ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या की मराठी साहित्यात सध्या चांगले लिखाण होत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो " असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केले. ' अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत ' या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिसंवादाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार, सहभागी वक्ते डॉ.पृथ्वीराज तौर, अनुवादिका सुनिता डागा, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक, व लेखक अनुवादक दिपक बोरगावे उपस्थित होते. पृथ्वीराज तौर यांनी ज्यावेळेस प्रेक्षकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले की अनुवादामुळेच भाषा खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर संमेलन अध्यक्ष ताराबाई भवाळकर यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ देत ते म्हणाले की " ताराबाईंना ज्यावेळेस विचारण्यात आलं की मराठी साहित्याचा अनुवाद मोठ्या प्रमाणात इतर भाषांमध्ये होत नाही याचे कारण काय, त्यावेळेस ताराबाई म्हणाल्या की मराठी भाषेत सध्या चांगले लिखाण होत नाही. आता मराठी भाषेत जर चांगले लिखाण होत नसेल तर ताराबाई भवाळकर संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या तरी का असा प्रश्न पडतो. ताराबाईंचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून मी त्याचा निषेध करतो. "
' मराठीतून इतर भाषांमध्ये होणारा अनुवाद व इतर भाषांमधील साहित्याचा मराठीत होणारा अनुवाद' या विषयावर ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात बोलताना दीपक बोरगावे म्हणाले की भाषांतर ही संस्कृती संक्रमणाची प्रक्रिया आहे त्यामुळे या प्रक्रियेला कुणीही कमी लेखता कामा नये. भाषांतर प्रक्रियेतील वेगळेपण तसेच सर्जक चिन्हांतरण या विषयावर त्यांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी आपल्या पत्रकारितेतील कारकिर्दीमध्ये चुकीच्या अनुवादामुळे घडलेले गमतीजमती सांगितल्या. मराठी पुस्तकांचे भाषांतर हिंदी साहित्यात करणाऱ्या सुनिता डागा यांनी सर्वसमावेशक साहित्याचे महत्त्व अधोरेखित केलं. परिसंवादाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांनी भाषांतरित साहित्याला योग्य तो न्याय मिळावा म्हणून अनुवाद अकादमीची स्थापना करण्यात यावी असा विचार मांडला.