फोटोग्राफीची किमया साधणारा ‘अद्वैत’

    23-Feb-2025   
Total Views | 10
 
Adwaita
 
सध्याच्या जमान्यात फोटो, व्हिडिओ आणि रील यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामधून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्या संधीचे सोने करणार्‍या डोंबिवलीकर अद्वैत ओकविषयी...
 
अद्वैतचा जन्म डोंबिवलीमध्ये झाला. अद्वैतचे शालेय शिक्षण टिळकनगर शाळेतून झाले आहे. त्यांची आई प्राजक्ता ओक या कीर्तनकार, तर वडील प्रकाश ओक निवृत्त सरकारी कर्मचारी. सरकारी सेवेसोबतच, आध्यात्मिक वातावरण त्याच्या घरात होते. त्याच्या आईने अद्वैतला लहानपणापासूनच वक्तृत्व, कथाकथन आणि बालनाट्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. यात आईचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असल्याने, आपसूकच त्याच्यामध्ये कलेविषयीची आवड उत्तरोत्तर दृढ होत गेली. त्याला चित्रकला आणि फोटोग्राफीची आवड असल्याने फ्रेम, कॅमेरा आणि व्हिडिओ याचे धडेही तो लहानपणापासूनच गिरवू लागला. पेंढारकरमधल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच अद्वैतने फोटोग्राफीला सुरुवात केली. अद्वैतचा भाऊ संकेत यांनी, ‘वेध अ‍ॅक्टिंग अ‍ॅकेडमी’ची स्थापना केली. या ‘वेध अ‍ॅकेडमी’तर्फे ‘वेध भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात, ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आले होते. बेर्डे यांचा फोटो काढण्याची संधी अद्वैतला मिळाली. हा अद्वैतचा पहिला फोटो होता. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींचे फोटो काढण्याची संधी, त्याला चालून आली. दरम्यानच्या काळात, अद्वैतचे शिक्षणही सुरू होते. त्याने बँकिंग इन्शुरन्समध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर पुढे एम कॉमपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. पण, त्याने आपल्या कलेचेच व्यवसायात रूपांतर करायचे ठरविले. म्हणून अद्वैतने स्वत:चा फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. त्यातच त्याने, स्वत:चे एक एक कौशल्य विकसित करत, स्वत:ची ‘इव्हेन्ट फोटोग्राफर’ म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. लग्न, मुंज, प्रॉडक्ट, निसर्ग असा सगळ्यांचा अनुभव घेता घेता अद्वैतला सूर गवसला, तो इव्हेन्ट फोटोग्राफीमध्ये. फोटोग्राफी हे क्षेत्र इतके मोठे आहे की, त्यात करू तेवढ्या गोष्टी कमी आहेत. इव्हेन्ट या क्षेत्राचेही तसेच म्हणावे लागेल. या क्षेत्रात अनेक संधी आहेत आणि त्यात डोंबिवलीसारखे सांस्कृतिक शहर असेल, तर तिथे संधीही मिळतेच. अद्वैतने एक डीएसएलआर कॅमेरा घेऊन, अशीच फोटोग्राफीला सुरुवात केली.
 
अचानकपणे त्याला, आदित्य बिवलकर यांच्या एका कार्यक्रमाचे फोटो काढण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात अद्वैतने काढलेल्या फोटोचे, सर्वत्र खूप कौतुक झाले. तिथेच अद्वैतचा हुरूप वाढला. पुढे अद्वैतने, कार्यक्रमाची फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली. इव्हेन्ट फोटोशूट करताना, आयोजकांची व कलाकरांच्या फोटोंची विशेष मागणी असते. कारण, ते त्यांचे ’शो रील’ असते. तेच लक्षात घेऊनच, तसे फोटो काढण्याचे काम अद्वैतने केले. मुलाखतीचे कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, स्पर्धा, पुरस्कार समारंभ असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेन्ट अद्वैतने आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. आतापर्यंत त्याने, 400हून अधिक कार्यक्रमाचे फोटोशूट केले आहे. अद्वैतच्या मते, पारंपरिक कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमात मिळणारा अनुभव फार सुंदर असतो. बर्‍याच मोठ्या लोकांना ऐकण्याची संधी मिळते. मागील 13 वर्षांपासून अद्वैत या क्षेत्रात काम करत आहे. वेगवेगळे सांगीतिक कार्यक्रमात त्याने काम केले आहेत. याशिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यक्रम, रोटरी क्लब, पुस्तक आदान प्रदान, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक पुरस्कार सोहळा अशा अनेक कार्यक्रमातून, त्याने आपल्या फोटोग्राफीची चुणूक दाखवून दिली. ठाणे, डोंबिवली येथे काम करता करता त्याला, इतर अनेक ठिकाणांहून मोठ्या पातळीवरही फोटोग्राफीसाठी संधी चालून आली. एका मोठ्या वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्याच्या फोटोग्राफीचे, कामही त्याने केले आहे. त्यातूनच पुढे त्याला विविध वाहिन्यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी, काम करण्याची संधी चालून आली. “इतक्या मोठ्या बॅनरसाठी काम करतानाचा अनुभव वेगळा होता. तांत्रिकदृष्ट्या अजून नवीन गोष्टी मला आजमावता आल्या,” असे अद्वैताने सांगितले.
 
कोरोना काळात अद्वैतने सांगितिक आणि मुलाखतीच्या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले. त्यावेळेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आम्ही होतो, त्यामुळे त्याचे थोडे दडपण होते. पण, ते करताना मजा आली. या सगळ्या काळात, अद्वैत ‘वेध अ‍ॅक्टिंग अ‍ॅकेडमी’ बरोबर काम करतच होता. त्याच्याकडे मुलांचे ऑडिशनकरिता फोटो काढण्याची जबाबदारी दिली होती. “मुलांचे फोटो काढणे ही एक मोठी जबाबदारी असते. कारण, त्यांच्या चेहर्‍यावरचे हसू कुठेही खोटे वाटू न देता, हे फोटो काढायचे असतात,” असे अद्वैत सांगतो.
 
अद्वैत सध्या ‘वेध अ‍ॅकेडमी’च्या मुलांना व स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांना, कॅमेर्‍याचे प्रशिक्षण देत आहे. आता नुकताच ‘वेध थिएटर’ हा प्रमोशनचा, नवीन उपक्रमही त्याने सुरू केला आहे. ज्याअंतर्गत रील, व्हिडिओ, एडिटिंग ही जबाबदारी तो पार पाडतो. अशा या हरहुन्नरी फोटोग्राफरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी, दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121