पंचमवेद : तरुणाईच्या वर्तमानाचा वेध

    22-Feb-2025   
Total Views |
 
panchamveda is an exploration of the present of youth
 
नाटक हे समाजाचे प्रतिबिंब. रंगमंचावर साकार होणारा अविष्कार आपल्या रोजच्या जगण्याचे संदर्भच मांडत असतो. परंतु, त्या मांडणीमध्ये असलेली कलात्मकता तिला आकर्षक बनवते. मराठी रंगभूमीवर कलाकारांनी माणसाच्या जगण्याचे असंख्य निरनिराळे पैलू हाताळले. मराठी रंगभूमीचा अवकाश या सादरीकरणामुळेच समृद्ध झाला. अलीकडच्या काळात मराठी नाटकांचा हा वारसा ‘राज्य हौशी नाट्यस्पर्धा’ पुढे चालवत आहे. या स्पर्धेतील नाटकांची विविधता थक्क करणारी आहे. नाटकांच्या याच वेगळेपणामुळे मराठी रंगभूमीचे चित्र आशादायी आहे, असेच म्हणावे लागेल. ६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सुरुवात झाली ती ‘पंचमवेद’ या नाटकाने. अहिल्यानगरच्या ‘सप्तरंग थिएटर्स’ या चमूने हे नाटक सादर केले.
 
‘कलाकार आणि नाटक’ हा या नाटकाचा मध्यवर्ती विषय. नाटकवाल्या माणसांचं जगणं लोकांसमोर मांडणार्‍या कलाकृती तशा कमीच असल्यामुळे हे नाटक विशेष महत्त्वाचे ठरावे. अनेक तरुणांसाठी महाविद्यालय म्हणजे नाटक जगण्याचा काळ. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सादरीकरणासाठी घेतलेली मेहनत, दिवसरात्र जीव तोडून केलेली तालीम यांमुळे कलाकार आणि नाटक दोन्ही घडत असतात. पण, या घडण्याच्या वाटचालीत, नाटकातल्या कलाकारांचे नेमके काय होते? यांची पुढची दिशा काय ठरते? हाच कसदार विषय घेऊन ‘पंचमवेद’ हे नाटक आपल्यासमोर नवनवीन गोष्टी उलगडत जाते. कलाकारांच्या जगण्यातली व्यथा आणि कथा मांडताना हे नाटक पारंपरिक चौकटींमध्ये अडकून पडत नाही. कलाकारांचा खरा जीवनप्रवास दाखवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून केला गेला आहे.
 
महाविद्यालयीन जीवनात नाटकाची पारितोषिके जिंकणारी मुलेमुली हा या नाटकाचा आरंभबिंदू. नाटकाची सुरुवात काहीशी संथ असली, तरी आशयसंपृक्त आहे. गावखेड्यात राहणार्‍या आईवडिलांना जेव्हा त्यांचा मुलगा नाटकात काम करण्याची इच्छा सांगतो, तेव्हा संघर्षाला सुरुवात होते. पण, हा संघर्ष प्रत्येक कलाकारासाठी वेगवेगळा असतो. हे वेगळेपण दाखवताना, दिग्दर्शकाने अत्यंत खुबीने बारिक गोष्टी टिपल्या आहेत. सामाजिकदृष्ट्या भिन्न स्तरांतून आलेल्या व्यक्तींचे चित्रण अगदी साजेसे केलेले आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारे तरुण आणि तरुणी, त्यांच्या नात्यातील ताणेबाणे, मांडताना कुठल्याही पारंपरिक चौकटीमध्ये न अडकता आजच्या मुलामुलींच्या जगण्यातले प्रश्न लेखकाने मांडले आहेत.
 
या नाटकाचा आशय केवळ समस्या मांडण्यापुरताच मर्यादित नसून या समस्यांकडे युवा पिढी कशा पद्धतीने बघते, त्यांच्या उत्तरांचा शोध कसा घेते, हे दाखवणे आहे. नाटक करणारी मुले ज्यावेळेस मुंबईच्या मायानगरीत आपली स्वप्ने घेऊन येतात, त्यावेळेस जीवनाच्या कटू वास्तवाशी त्यांची गाठ पडते. हे वास्तव प्रत्येक पात्राला छेदत त्याला आमूलाग्र बदलते. त्यांच्यात घडणारा हा बदल नाटकाची पुढची दिशा ठरवतो. संघर्षामुळे मुलांच्या आयुष्यात आलेली निराशा, प्रसंगी एका पात्राने उचललेले आत्महत्येचे टोकाचे पाऊल, या सगळ्या गोष्टी मंचावर बघताना आपण त्या पात्रांच्या वेदनांशी समरस होतो. नाटकात काम करता करता बर्‍याचदा होतकरू कलाकारांचा ओढा टीव्ही, मालिका, चित्रपट यांच्याकडे असतो. बदलत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे आकर्षण कलाकारांमध्येसुद्धा वाढले आहे. या सार्‍या गदारोळात आपले नेमके स्थान काय, हा विचार नाटक करणार्‍या मुलांच्या समोर उभा राहतो. नेमकी निवड कशाची करायची, हा प्रश्न त्यांना शेवटपर्यंत सतावत राहतो. रंगभूमीशी एकनिष्ठ राहून या पात्रांनी नाटकाची केलेली निवड सकारात्मक असली, तरी प्रभावी वाटत नाही.
 
नाटकाची संहिता उत्तम असली, तरी सादरीकरणाच्या दृष्टीने सुधारणा करण्यासाठी अनेक ठिकाणी वाव आहे, असे लक्षात येते. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या परिस्थितीचे चित्रण करताना, प्रभावीपणे साकारता येणारी प्रकाशयोजना. नाटकातील संवाद उत्तम असले तरीसुद्धा, त्यातून म्हणावा तसा परिणाम साध्य होत नाही. नाटकातील कलाकारांनी एकत्र मिळून यासाठी काम केले, तर प्रयोग अधिक यशस्वी होण्याची शक्यता आहे. राज्य हौशी नाट्यस्पर्धा म्हणजे कायमच व्यावसायिक रंगभूमीचा पाया राहिला आहे. वेगवेगळ्या प्रयोगांचे दालन इथे प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. या प्रयोगांच्या माध्यमातूनच भविष्यात व्यावसायिक रंगभूमीवर अत्यंत सकस आणि दर्जेदार नाट्यकृती आपल्याला अनुभवायला मिळते. मराठी रंगभूमीच्या भविष्याबाबत आशेनिराशेची किती चिंता केली, तरी ‘पंचमवेद’सारख्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीचे चित्र आश्वासक आहे, असेच म्हणावे लागेल.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.