बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा वारसा तसा मोठा आहे. पण, बरेचदा या चित्रपटांमध्ये इतिहासाचे एकांगी चित्रणदेखील पाहायला मिळाले. विशेषतः मुघल साम्राज्याचे उद्दातीकरण ते स्थानिक योद्ध्यांच्या पराक्रमाला तुलनेने कमी लेखण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्नही झाले. पण, २०१४ नंतर हा प्रवाह बदललेला दिसतो. मराठा इतिहासावर आधारित ‘तान्हाजी’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. याच पार्श्वभूमीवर ‘छावा’ या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपटांचा नवा अध्याय सुरू केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांवर गारूड केले असून, बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘छावा’च्या यशानंतर बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट निर्मितीकडे सिनेसृष्टीचा कल दिसून येतो. त्यानिमित्ताने...
ल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निमित्ताने एका नव्या प्रवाहाची सुरुवात झालेली दिसते. हिंदू राजांच्या शौर्यगाथा मोठ्या प्रमाणावर चित्रपटांतून मांडल्या जाऊ लागल्या. ’पद्मावत’ २०१८ रोजी आणि ’तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला. यांसारख्या चित्रपटांनी काहीशा विस्मृतीत गेलेल्या ऐतिहासिक कथानकांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ’पद्मावत’मध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. मलिक मोहम्मद जायसी यांच्या ’पद्मावत’ या महाकाव्यावर आधारित या चित्रपटाने ५७२ कोटी रुपयांची जागतिक कमाई केली. ’तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने ३६८ कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली होती.
मराठी चित्रपटसृष्टीतही ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा समृद्ध आहे. दि. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा मांडली आहे. सुबोध भावे आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत २५ कोटी रुपयांची जागतिक कमाई केली. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ’पावनखिंड’ हा चित्रपट दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी आणि अजय पुरकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय यश मिळवले.
‘छावा’ चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीनंतर बॉलिवूड, टॉलिवूड आणि कॉलिवूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची लाट निर्माण झालेली दिसते. ’छावा’मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंडाना आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. हा चित्रपट दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर सध्या विक्रमी कमाई करत आहे. ’छावा’ हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा मूळ इतिहास दाखवला असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरला. अवघ्या सहा दिवसांतच या चित्रपटाने २०३.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे तो २०२५ मधील पहिला आणि सर्वांत वेगाने २०० कोटींचा टप्पा गाठणारा चित्रपट ठरला आहे.
’छावा’च्या यशानंतर, रितेश देशमुख आणि रिषभ शेट्टी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे. रितेश देशमुख यांच्या आगामी चित्रपटात ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे, शिवजयंतीच्या पवित्र दिवशी ‘द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाच्या टीमने महान मराठा सम्राटाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करून शिवजयंतीच्या निमित्ताने या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला लुकही प्रदर्शित केला आहे. ‘कांतारा’ फेम रिषभ शेट्टी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांसमोर आले आहे.
बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा दीर्घकाळापासून जरी चालत असली, तरी अनेकदा या चित्रपटांमध्ये मुघल शासकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उद्दातीकरण केले गेले. ’मुगल-ए-आजम’सारख्या चित्रपटांमध्ये मुघलांच्या वैभवशाली जीवनशैलीचे आणि प्रेमकथांचे चित्रण करण्यात आले आहे. मात्र, ’छावा’सारख्या चित्रपटांनी मराठा योद्ध्यांच्या शौर्य आणि बलिदानाची कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये एक नव्या प्रवाहाला सुरुवात झाली आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
’छावा’च्या यशानंतर बॉलिवूडमध्ये अशा आक्रमकांच्या संस्कृतीचे उदात्तीकरण करणार्या एकांगी संकल्पनांना लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. ’उर्दूवूड’च्या प्रभावाखाली राहिलेल्या बॉलिवूडमध्ये अखेर ऐतिहासिक वास्तव मांडण्याची संधी अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे. या नव्या बदलांमुळे भारताच्या संपन्न आणि वैभवशाली इतिहासात विस्मृतीत गेलेले अनेक वीरयोद्धे, महापुरुष यांच्या जीवनगाथा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला, येतील अशी आशा.
अनिरुद्ध गांधी