सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
सेमीकंडक्टर अर्थात सध्याच्या प्रगत औद्योगिक व्यवस्थेवर मोठा परिणाम करणारे, क्रांतिकारी परिणाम करणारे तंत्र! याच कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, ‘सेमीकंडक्टर : प्रयोग आणि उपयोग’ या विषयावरील विशेष चर्चासत्राचे आयोजन २०२४ साली भारतात केले गेले. या विशेष आयोजनातूनच भारताने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’च्या माध्यमातून, जागतिक औद्योगिक क्षेत्रातील सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचा अवलंब करून जी परिणामकारक कामगिरी केली, ती कित्येकांसाठी अनेकार्थांनी आश्चर्यकारक ठरली आहे.
जागतिक पातळीवर सेमीकंडक्टरच्या उपयोग संदर्भात शास्त्रीय पद्धतीने विचारविमर्श करणारा, भारत आठवा देश ठरला आहे, हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. सद्यस्थितीमध्ये भारताने तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक विकास व आर्थिक प्रगती या क्षेत्रात घेतलेल्या आघाडीला, आता भारताची सेमीकंडक्टर क्षेत्रात घेतलेली आघाडीही पूरक आणि प्रेरक ठरणार आहे, हे निश्चित. याशिवाय सेमीकंडक्टर विषयक ज्ञान-तंत्रज्ञान संदर्भात सांगायचे झाल्यास, आज जगभरातील उपलब्ध असणार्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञानापैकी २० टक्के माहिती तंत्रज्ञान व त्याची रचना भारतीयांकडे उपलब्ध असून, त्याची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. यामध्ये अर्थातच, भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाचाही समावेश आहे. यातूनच आज आपल्याकडील अनुभवी तंत्रज्ञ व नवागत अभियंत्यांसाठी, मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधी प्रामुख्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, धातूशास्त्र, प्रगत तंत्रज्ञान इत्यादीचा समावेश करता येईल.
यासंदर्भातील मूलभूत व महत्त्वाची बाब म्हणजे, सेमीकंडक्टर तंत्रज्ञानात अभियांत्रिकीच्या विभिन्न क्षेत्रांचा समावेश अपरिहार्यपणे झाला आहे. त्यामुळे त्याचे ज्ञान आणि अवलंब जसा तुलनेने निश्चितपणे कठीण वाटतो आहे. असे असले तरीही, हे तंत्रज्ञान आत्मसात केल्याने त्याचा लाभ व्यावसायिक, व्यावहारिक अवलंब करणार्यांना मोठ्या प्रमाणात याच संधींद्वारे उपलब्ध होणार आहे. सेमीकंडक्टरचे व्यापक क्षेत्र व वाढते महत्त्व लक्षात घेता, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध विभागातील तज्ज्ञ, यामध्ये खालीलप्रमाणे आपले योगदान देऊ शकतात-
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग : इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला सेमीकंडक्टर क्षेत्राचा मूलभूत पाया समजला जातो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, सेमीकंडक्टर क्षेत्राशी प्रामुख्याने निगडित आलेखन, विकास व तंत्रज्ञानाच्या समुचित प्रयोगाद्वारे ट्रान्झिस्टर्स, इंटिग्रेटेड सर्किटस् यांची घडण करून, त्याद्वारे सेमीकंडक्टर्स यंत्रणेसाठी आवश्यक असे महत्त्वाचे सुटेभाग व मूलभूत उपकरणांची निर्मिती केली जाते.
या मूलभूत व महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचे काम फार महत्त्वपूर्ण असते. यामध्ये सेमीकंडक्टर प्रक्रियेसाठी आवश्यक ओतकाम, जोडणी करून त्याद्वारे उपयुक्त चिप्सची निर्मिती करणे मोठे आव्हानपर काम असते. त्यामुळेच सेमीकंडक्टरच्या माध्यमातून, विशिष्ट प्रक्रियेसाठी आवश्यक अशी ऊर्जा क्षमता, उत्पादकता, गतिमानता इत्यादीद्वारे गुणवत्तापूर्ण उत्पादन करण्याचे लक्ष्य साध्य केले जाऊ शकते. याशिवाय चिप निर्मिती व त्यांचा उपयोग, यामध्ये अभ्यास व संशोधनासह सुधारणा करण्याचे महत्त्वाचे कामही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगद्वारा केले जाते.
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग : सेमीकंडक्टरच्या कार्यप्रणालीला वेगवान अचूक व अद्ययावत बनविण्यासाठी, विशेष विकसित तंत्रज्ञानाची नितांत गरज असते. ही गरज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगद्वारा पूर्ण केली जाते.
अशाप्रकारे अचूक कार्यशैलीद्वारा, सेमीकंडक्टरचे अधिकाधिक दर्जेदार उत्पादन करण्याच्या कामकाजात, अपेक्षित सुधारणा होत असते. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमुळे सेमीकंडक्टर्सचे डिझाईन, आकारमान सुनिश्चित केले जाते. याशिवाय सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या कार्यप्रणालीला, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची प्रभावी व परिणामकारक जोड लाभली आहे, हे विशेष.
संगणकशास्त्र : सेमीकंडक्टर तंत्रज्ञानामध्ये संगणकशास्त्र व संगणक तज्ज्ञांची विशेष भूमिका असते. यामध्ये, सेमीकंडक्टर चिपशी निगडित बाबी महत्त्वाच्या असतात. या कार्यप्रणालीसाठीच हे विशेष तंत्रज्ञान समजले जाते.
सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी संगणकतज्ज्ञ कार्यप्रणाली, कार्यपद्धती व प्रत्यक्ष कामकाज ही कामे प्रामुख्याने करतात. या कार्यपद्धतीत, संगणक क्षेत्रातील हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्हीचा समावेश असतो. आता तर आपले संगणकशास्त्रज्ञ, देशांतर्गत प्रगत स्वरूपात सेमीकंडक्टर चिप्स बनविण्यासाठी संशोधनपर प्रयत्न करीत असून, त्याद्वारे या क्षेत्रात क्रांतिकारक बदल अपेक्षित आहेत.
मटेरियल सायन्स व इंजिनिअरिंग : सेमीकंडक्टर व्यवस्थेमध्ये विविध कच्चामाल व त्याच्या उपयोगाचे महत्त्व फार असते. यामध्ये अणु क्षेत्रातील कच्च्या मालापासून, सिलिकॉन-इलेक्ट्रिकल लहान उपकरणांचाही समावेश असतो. यामध्ये थर्मलसह अन्य ऊर्जा स्त्रोतांचाही वापर समाविष्ट आहे.
या क्षेत्रातील कच्च्या मालामध्ये बदलत्या व प्रचलित पद्धतीनुसार, मोठे व महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यामध्ये लवचिक व विविधोपयोगी इलेक्ट्रॉनिक सुटे भाग व त्याच्या परिणामकारक उपयोगावर भर दिला जात आहे.
केमिकल इंजिनिअरिंग : सेमीकंडक्टरच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये, केमिकल इंजिनिअरिंगचे पाठबळ आवश्यक असते. केमिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सेमीकंडक्टर प्रक्रिया प्रगत आणि अद्ययावत करण्याबरोबरच, पर्यावरणपूरक कार्यपद्धती विकसित करण्यावरही लक्ष दिले जात आहे.
ऑप्टिकल इंजिनिअरिंग : ऑप्टिकल इंजिनिअरिंगच्या द्वारा, सेमीकंडक्टर प्रक्रियेतील विविध भागांची जोडणी व जुळणी केली जाते. यामध्ये, प्रकल्प व्यवस्था व संदेशवहन प्रक्रिया अद्ययावत केली जाते. सेमीकंडक्टर वापरासाठी ही प्रक्रिया जटिल व महत्त्वाची समजली जाते.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग : सेमीकंडक्टर्सचे आरेखन आणि प्रारूप तयार करून, विविध उपकरणांसाठी त्याला अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे काम, मेकॅनिकल इंजिनिअर्स करीत असतात. त्यांच्यामुळे सेमीकंडक्टर्सची निर्मिती अपेक्षित स्वरूपात व सुरक्षितपणे होत असते, हे उल्लेखनीय आहे.
ऑटोमेशन अॅण्ड रोबोटिक इंजिनिअरिंग : प्रगत, अद्ययावत व स्वयंचलित पद्धतीवर आधारित सेमीकंडक्टर पद्धती व प्रक्रियेला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी, ऑटोमेशनसह रोबोटिक इंजिनिअरिंगवर आता भर दिला जात असून, या पद्धतीमुळे काळानुरूप व क्रांतिकारक बदल घडून आले आहेत.
अशा प्रकारे सेमीकंडक्टर या नव्या व वेगाने विकसित होणार्या क्षेत्रात, प्रामुख्याने तंत्रज्ञानावर आधारित असणार्या कार्यपद्धतीसाठी तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विज्ञान, संशोधन या क्षेत्रात नव्याने पात्रताधारक व अनुभवी व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम, विविध ठिकाणच्या ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’, ’नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’, ’बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ इत्यादीद्वारे केले जात आहे. यामुळेच जागतिक स्तरावर भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे हब होण्याच्या लक्ष्याला मूर्त रूप येणे, ही बाब सद्यस्थितीत विशेष महत्त्वाची ठरते.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६