रक्तदानात शोध भगवंताचा...

    22-Feb-2025   
Total Views | 25

bhagwanta zipra raut
 
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्यांनी रक्तदानालाही तितकेच महत्त्व दिले. रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि सेवाकार्य मानणार्‍या नाशिकच्या भगवंता झिपरा राऊत यांच्याविषयी...
 
रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. दानामध्ये रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व. ते महत्त्व जाणले आहे, नाशिकच्या भगवंता झिपरा राऊत यांनी. त्यांचा जन्म दिंडोरी तालुक्यातील खोरीपाड्याचा. आईवडिलांचा शेती हा व्यवसाय. दुर्गम भाग असल्याने, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पांडाणे आश्रमशाळेत झाले. १९७९ ते १९८९ या दहा वर्षांत त्यांना, शिक्षणासोबत जीवन जगण्याचेही अनेक धडे मिळाले. स्वतःची कामे स्वतः करणे, खेळांची आवड, काटेकोर अभ्यास, शिस्त अशा अनेक गोष्टी भगवंतांना अनुभवता आल्या. इयत्ता सहावीनंतर त्यांनी खोखो, कबड्डी खेळाचा सरावही सुरू केला. खोखोमध्ये तर त्यांनी, थेट राज्यस्तरापर्यंत धडक मारली होती. बैलपोळा आणि दीपावलीच्या दिवसांमध्ये आश्रमशाळेला सुट्टी असायची, तेव्हाच घरी जाणे व्हायचे. भगवंता यांचा इयत्ता दहावीपर्यंत तुकडीमध्ये पहिला-दुसरा क्रमांक ठरलेलाच होता. इयत्ता दहावीत असतानाच त्यांनी, पुढे शिक्षक होण्याचे निश्चित केले. नांदगाव येथे त्यांनी डीएड शिक्षण पूर्ण केले. १९९२ साली लोणावळा येथे, व्हिपीएस हायस्कूलमध्ये त्यांनी सहा महिने नोकरी केली. नंतर जिल्हा परिषद शाळेत, तीन वर्षे नोकरी केली. यादरम्यान पंचवटी महाविद्यालयातून बीए आणि एमए पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर बीएड आणि एमएडही ते, उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. सध्या ते महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत आहेत. तिथे पालक मेळावे, स्नेहसंमेलन, विविध सण-उत्सव, सहली असे अनेक उपक्रम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतात.
 
१९९७ साली भगवंता यांच्या मावस भाच्याला न्यूमोनिया झाल्याने, रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे वय जेमतेम दोन-अडीच महिने. यावेळी अवघ्या १५० मिलीलीटर रक्ताची त्याला गरज होती. त्यावेळी रक्तदानाबाबत म्हणावी तितकी जनजागृती झालेली नव्हती. बाळाचा जीव वाचविण्यासाठी, मग ‘जनकल्याण रक्तकेंद्रा’मध्ये चौकशी केली. त्यावेळी रक्ताची एक पिशवी ५०० मिलीची असायची. मात्र, बाळाला फक्त १५० मिली रक्ताची आवश्यकता असल्याने जर पिशवी दिली, तर उर्वरित रक्त वाया जाणार होते. त्यामुळे भगवंता यांना रक्तदाता शोधण्यास सांगितले गेले. त्यावेळी भगवंता यांनी, स्वतः रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. भगवंता यांच्यामुळे बाळाचा जीव वाचला. परंतु, त्यानंतर त्यांना रक्तदानाचे महत्त्व समजले. स्वतःचा, मुलाचा, पत्नीचा वाढदिवस रक्तदान उपक्रम, शिबीर, गणेशोत्सव अशा औचित्याच्या वेळी ते आवर्जून रक्तदान करतात. ‘जनकल्याण रक्तकेंद्रा’त तर दर महिन्याला ते रक्तदान करू लागले. एका शिक्षकाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात, त्यांना खास शिक्षकांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी बोलावण्यात आले होते. कोरोना काळातही त्यांनी रक्तदान केले. प्लेटलेट रक्तदानासह त्यांनी, आतापर्यंत तब्बल १३० वेळा रक्तदान केले आहे. प्रारंभी आईवडील, मित्रवर्ग यांनी चिंता व्यक्त केली मात्र, नंतर तीही दूर झाली.
 
भगवंता यांना सायकलिंगसह धावण्याची आवड आहे. अनेक मॅरेथॉनमध्ये त्यांचा सहभाग असतो. दररोज सकाळी सात किमी अंतर ते धावतात. त्यानंतर शाळेत अध्यापन आणि सायंकाळी पोहणे, असा त्यांना दिनक्रम आहे. विविध मॅरेथॉन आणि धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी, विजेतेपदही मिळवले आहे. रक्तदान करता यावे, यासाठी तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी, व्यायाम करणे आवश्यक असल्याने ते दररोज धावतात. तसेच, दर रविवारी ट्रेकिंगची आवडही जोपासतात.
एकदा अशोक स्तंभ परिसरात, दुचाकी दुरुस्तीसाठी भगवंता गॅरेजमध्ये गेले. यावेळी तिथे दोघांमध्ये, रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्याबाबत चर्चा सुरू होती. ती ऐकताच भगवंता यांनी, रक्तदान करण्याची तयारी दर्शविली. रात्री, अपरात्री प्लेटलेट वा रक्ताची गरज भासल्यास, भगवंता ती पूर्ण करण्यासाठी तयार होतात. त्यांच्या मुलानेही आतापर्यंत, १२हून अधिक वेळा रक्तदान केले. ज्यामुळे त्याचे मित्रही प्रेरित होऊन, तेही आता रक्तदान करू लागले आहे. भगवंता यांच्यापासून त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय प्रेरणा घेऊन, रक्तदान करू लागले आहेत. भगवंता यांना ‘जनकल्याण रक्तकेंद्रा’चे विशेष सहकार्य लाभते.
 
’रक्तदानामुळे एखादा जीव वाचतो. त्यामुळे आपल्याला आपली कार्यक्षमतादेखील ओळखता येते. अवयवदानाचा संकल्पही मी केला आहे. शहरासह ग्रामीण भागातून कुणालाही गरज भासल्यास, मला संपर्क केला जातो. रक्तदानाबाबत पसरवले जाणारे गैरसमज खोडून काढण्यासाठी, मी प्रयत्न करत असतो. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, प्रत्येकाने रक्तदान नक्की करावे’, असे आवाहन भगवंता राऊत करतात. जोपर्यंत शक्य होईल, तोपर्यंत रक्तदान करत राहणार असल्याचा विश्वासही भगवंता व्यक्त करतात. रक्तदान हेच सेवाकार्य मानून, रक्तदानातून समाजसेवा करणार्‍या भगवंता राऊत यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अगदी मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121