पहिल्याच दिवशी दहावीच्या परीक्षेला गालबोट! जालन्यात मराठीचा पेपर फुटला
21-Feb-2025
Total Views | 16
जालना : (Jalna ) राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. एकीकडे कॅापीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कॅापीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत या पेपरच्या प्रती झेरॅाक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमके काय झालं?
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे. आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. आणि मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी सकाळी ११ वाजता पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. परीक्षा केंद्राजवळ असलेल्या एका झेराँक्स सेंटरमध्ये मराठीच्या पेपरच्या थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रिंट विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी भरारीपथके, व्हिडिओ चित्रण, सीसीटीव्ही अश्या पद्धतीची चोख व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. असे असतानाही प्रश्नपत्रिका १५ मिनिटांमध्ये बाहेर कशी आली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.