डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बुकावूमध्ये ‘एम २३’ गटाच्या बंडखोरांनी घुसखोरी केली असून, त्यांनी बुकावूच्या उत्तरेकडील विमानतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांनी गोमा शहरही आपल्या ताब्यात घेतले. गोमा येथे भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे एकूण ८० सैनिक आणि अधिकारी सध्या उपस्थित आहेत. हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून काम करतात. या बंडखोरांनी शांतीसेनेच्या लेव्हल थ्री फील्ड हॉस्पिटल असलेल्या कॅम्पला वेढा घातला. त्यामुळे हे ‘एम २३’ प्रकरण पुन्हा सक्रिय झाले असून, त्याची गंभीरता लक्षात घेणे गरजेचे आहे. या गटाच्या बंडखोरांनी नुकताच जो काँगोमध्ये धुडगूस घातला, तो निश्चितच विनाशकारी असून, यावर बर्याच ठिकाणी चर्चा सुरू आहेत.
‘एम २३’ला ‘मार्च २३ मूव्हमेंट’ म्हणूनही ओळखले जाते. हा पूर्व काँगोमधील एक सशस्त्र गट आहे, जो काँगोच्या सैन्याविरुद्ध लढतो. रवांडा आणि युगांडाच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर किवू प्रांतात हा गट अधिक सक्रिय आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, ‘एम २३’मध्ये आठ हजारांपेक्षा अधिक बंडखोरांचा समूह आहे. ‘एम २३’ हे नाव २००९ साली तुत्सी-नेतृत्वाखालील बंडखोर गट ‘नॅशनल काँग्रेस फॉर द डिफेन्स ऑफ द पीपल (सीएनडीपी)’ आणि काँगो सरकार यांनी पूर्व काँगोमधील तुत्सी लोकांच्या नेतृत्वाखालील बंडखोरी संपवण्यासाठी केलेल्या करारावरून घेतले आहे. ‘एम २३’ला शेजारी असलेल्या रवांडाच्या सैनिकांनी पाठिंबा दिल्याने हा गट आणखी मजबूत झाला. जेव्हा माजी ‘सीएनडीपी’ सैनिकांनी काँगो सरकारच्या विरोधात बंड केले, तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश काँगोच्या तुत्सी आणि इतर अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करणे तसेच, हुतू बंडखोर गटांपासून त्यांचे संरक्षण करणे हा होता. ‘एम २३’ने गोमा आणि रुबाया शहरे ताब्यात घेण्यासह पूर्व काँगोमध्ये महत्त्वपूर्ण प्रादेशिक लाभ मिळवले आहेत.
काँगोमध्ये अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. १२०हून अधिक सशस्त्र गट या प्रदेशातील संघर्षात सामील आहेत. त्यापैकी बहुतेक जमीन आणि मौल्यवान खनिज खाणींच्या नियंत्रणासाठी लढत आहेत, तर काही त्यांच्या समुदायाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्व डीआरसीमधील हिंसाचारामुळे देशाच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ६० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. दक्षिण किवू आणि उत्तर किवू प्रांतात ४.६ दशलक्षांहून अधिक लोक अंतर्गतरित्या विस्थापित झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लढाईदरम्यान फाशी, लैंगिक हिंसा आणि इतर अत्याचारांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
‘एम २३’च्या बंडखोरांनी गेल्या मंगळवारी पूर्व काँगोमधील मुख्य शहर बुटेम्बो येथील काँगो सैन्याच्या स्थानांवर हल्ला केला. सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे आणि अतिरेकी संघटना झपाट्याने आपले स्थान मजबूत करत आहेत. जेव्हा या बंडखोरांनी दहशतवादी संघटनांशी मिळून गोमा शहर ताब्यात घेतले, तेव्हा झालेल्या युद्धात सुमारे तीन हजार लोक मारले गेले. काँगोमध्ये राजकीय सत्ता मिळवायच्या उद्देशाने केलेला हा हल्ला होता. मोठी गोष्ट म्हणजे, दोन दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या शहरावर बंडखोरांनी केवळ दोन दिवसांच्या लढाईत नियंत्रण मजबूत केले. बुटेम्बो आणि गोमामधील अंतर सुमारे २१० किमी आहे. अशा स्थितीत अतिरेकी संघटनांच्या सातत्याने मजबूत होत असलेल्या स्थितीचा सहज अंदाज निश्चितच लावता येईल.
रवांडाचे राष्ट्रपती पॉल कागमे यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान त्यांनी युद्धविरामाच्या गरजेवर तूर्तास सहमती दर्शविली आहे. परंतु, गोमामधून माघार घेण्याच्या मागणीकडे झुकण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. आठ सदस्यीय पूर्व आफ्रिकन समुदाय, ज्यामध्ये काँगो आणि रवांडा हे दोन्ही सदस्य आहेत, ते या प्रकरणी आपत्कालीन शिखर परिषद घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या शिखर परिषदेतून आता काय हाती येते आहे, हेच पाहणे उचित ठरेल.