नुकतीच म्हणजे दि. ३ फेब्रुवारी रोजी भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाची शंभरी गाठली. सन १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावल्यापासून ते आधुनिक विद्युतीकरणापर्यंत रेल्वे वाहतुकीने देशाच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आजवरच्या प्रवासात मुंबईचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबईकर आणि मुंबई लोकल हे नाते तर सर्वश्रुत. त्यामुळे भारतीय रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील मुंबई लोकलच्या प्रगतीचा आढावा घेणारा लेख...
दररोज ८० लाख प्रवाशांची वाहतूक करणार्या मुंबईच्या जीवनवाहिनीने अर्थात लोकल ट्रेनने काळानुरूप कास बदलली. तसेच, मुंबईच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातही लोकलची भूमिका अनन्यसाधारण अशीच. देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईतील लोकल ट्रेन ही देशातील सर्वांत जुनी उपनगरीय रेल्वे व्यवस्था. जेव्हा देशभरातून लोक रोजगाराच्या शोधात मुंबईत दाखल होऊ लागले, तेव्हा त्यांच्या वाहतुकीसाठी एक नवीन व्यवस्था उभारण्यात आली. बोरीबंदर ते माहीम दरम्यानची रेल्वे दि. १८ एप्रिल १८५३ रोजी पहिल्यांदा धावली. मुंबईतील पहिली कापड गिरणी, बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड विव्हिंग कंपनी १८५४ साली ताडदेव येथे उघडण्यात आली. त्या काळात रेल्वेचा वापर केवळ या व्यापारापुरता मर्यादित होता. परंतु, गिरणीच्या बांधकामाबरोबरच उद्योगधंदे वाढीस लागले आणि परिणामी लोक रेल्वेने प्रवास करू लागले. मध्य रेल्वेवर पहिले सीझन तिकीट १८५४ साली जारी करण्यात आले. एकंदरीतच मुंबईकरांची धावपळही साधारण तेव्हापासूनच सुरू झाली. पश्चिम रेल्वेची पहिली लोकल ट्रेन दि. १२ एप्रिल १८६७ रोजी विरार आणि बॅकबे स्थानकांदरम्यान धावली. विरारहून सकाळी ०६.४५ वाजता आणि बॅकबेहून संध्याकाळी ०५.३० वाजता सुटणार्या अशा त्यावेळी दोन गाड्या होत्या.
चार डब्यांची पहिली लोकल
सुरुवातीच्या काळात, या सर्व लोकल ट्रेन वाफेच्या इंजिनवर चालणार्या होत्या. त्यामुळे साहजिकच या ट्रेनची प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही जास्त नव्हती. कालांतराने, व्यवसाय वाढला आणि लोकांची संख्याही वाढली. यावेळी शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक ही मुख्यत्वे ट्राम आणि ‘बेस्ट’वर अवलंबून होती. परंतु, वाढत्या गर्दीसमोर या व्यवस्था अपुर्याच होत्या. याच आवश्यकता आणि अद्ययावतीकरणाच्या ओघात मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत ‘ईएमयू’ म्हणजेच इलेक्ट्रिक ट्रेनचे युग अवतरले. दि. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी, मुंबईचे तत्कालीन राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांनी पहिल्या चार डब्यांच्या ‘ईएमयू’ला हिरवा झेंडा दाखवला. पहिली सेवा हार्बर मार्गावरील तत्कालीन व्हिटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत चालवली जात होती. सहा किमी लांबीच्या मार्गावर धावणार्या या पहिल्या विद्युत रेल्वेने वाहतुकीमध्ये एक नवीन पर्व आणले. त्याकाळी ‘१.५ केव्ही डीसी ओव्हरहेड वायर प्रणाली’चा वापर करण्यात आला. या रेल्वेने ८० किमी प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता दाखवली. त्यात ब्रिटिशकालीन लोकलमध्ये चार डबे होते. त्यासोबतच या लोकल रेल्वेचे डबे लाकडी आणि लोखंडी मिश्रित बनवण्यात आले होते. पश्चिम रेल्वेवर पहिली इलेक्ट्रिक ट्रेन (एचण) १९२८ साली कुलाबा आणि अंधेरी दरम्यान धावली. १९२५ साली हार्बर मार्गावर चार डब्यांची ट्रेन धावत होती.
१९६१ ते २०१२ (१,५०० व्होल्ट डीसी)
मात्र, विद्युत लोकल ताफ्यात येताच लोकलची प्रवासीसंख्याही वाढली. केवळ दोन वर्षांत १९२७ साली मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गिकेवर ट्रेनमधील डब्यांची संख्या आठ झाली. दि. २८ एप्रिल १९५२ रोजी पश्चिम रेल्वेवर सहा डब्यांचा एक नवीन रेक सुरू करण्यात आला आणि १९५८ मध्ये ही ट्रेन नऊ डब्यांची झाली. १९६३ मध्ये मध्य रेल्वेवर पहिली नऊ डब्यांची ट्रेन धावली. १९६१-६२ मध्ये ‘जेसॉप अॅण्ड कंपनी’ने बनवलेल्या लोकल ताफ्यात आल्या. ज्यामध्ये इंग्लिश इलेक्ट्रिकने (ईआर) ट्रॅक्शन गियर पुरवले होते. या डब्यांना लहान खिडक्या होत्या आणि ‘उषा’ने बनवलेले नॉन-ऑसिलेटिंग पंखे होते. जे गर्दीच्या वेळीही प्रवास सुलभ करत होते. मात्र, हे डबे ड्रायव्हिंगच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी होते. ‘ड्रायव्हिंग ट्रेलर’मध्ये सर्किट ब्रेकर, दोन प्रकारचे बेल सर्किट, चांगल्या क्षमतेचे एअर कॉम्प्रेसर आणि एकूण नऊ डब्बे होते, तर तीन मोटर कोच होते. १९९० मध्ये १२ डब्यांच्या गाड्याही ताफ्यात आल्या. दि. २१ नोव्हेंबर २००९ रोजी पश्चिम रेल्वेवर पहिली १५ डब्यांची लोकल धावली. तर सन २०१२ मध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १५ डब्यांची लोकल सुरू झाली.
२०१२ ते आजतागायत... (२५ केव्ही एसी ट्रॅक्शन)
चेन्नईतील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (खउऋ) येथे जागतिक बँकेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-२’ अंतर्गत बॉम्बार्डियर इलेक्ट्रिकलसह नवीन ईएमयू एप्रिल २०१४ मध्ये मुंबईत येण्यास सुरुवात झाली. या पहिल्या गाड्यांचे उद्घाटन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वेवरील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे केले. मात्र, या गाड्यांमध्ये स्वयंचलित स्लाइडिंग दरवाज्यांच्या मागणीमुळे दोन वर्षांचा विलंब झाला. सन २०१७ मध्ये ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, ‘मेधा’ यांनी पहिला भारतीय बनावटीचा २५ केव्ही ट्रॅक्शन रेक (डबा) बनवला. या नऊ डब्यांच्या गाड्यांची क्षमता २ हजार, ६२८ आहे, तर १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता ३ हजार, ५०४ आहे. २०१३ मध्ये लोकल सेवेत रेल्वेवर नवीन १२ डब्यांच्या लोकल सादर करण्यात आल्या. उपनगरीय सेवेत प्रवाशांसाठी पहिला वातानुकूलित रेक चेन्नईमधील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’-‘भेल ईएमयू’ने ५० कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधला होता आणि दि. ५ एप्रिल २०१६ रोजी मुंबईत दाखल झाला, तर दि. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी, मुंबई उपनगरीय रेल्वेचा सर्वोत्कृष्ट डबा असणारी रेल्वे ‘आयसीएफ’द्वारेदेखील निर्मित केली गेली, जी पहिल्यांदा पश्चिम रेल्वे मार्गावर धावली.
दि. २५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेमध्ये पहिल्या एसी ईएमयूला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुंबईतील पहिली एसी लोकल ट्रेन डिसेंबर २०१७ मध्ये सुरू झाली आणि पहिल्या पाच महिन्यांतच दहा लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील चौथा वातानुकूलित रेक आणि मध्य रेल्वेसाठी पहिला रेक ठाणे ते पनवेल/वाशी या ट्रान्स-हार्बर मार्गावर दि. ३० जानेवारी २०२० रोजीपासून सुरू करण्यात आला. तीन वर्षांच्या कालावधीनंतर, ‘मेधा’ने बनवलेली पहिली १२ डब्यांची पूर्णपणे व्हेस्टिब्युल्ड एसी लोकल ट्रेन दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आली. ’चणढझ-खखख’ आणि ’चणढझ-खखखअ’ प्रकल्पांतर्गत, पश्चिम रेल्वेने अधिक एसी लोकल ट्रेन खरेदी करण्याचा आणि संपूर्ण ताफ्याचे कोलकाता मेट्रोप्रमाणे एसीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक नवीन ‘मेधा’ रेक सुरू करण्यात आला. आजतागायत दोन्ही मार्गांवर ‘भेल’ आणि ‘मेगा’ लोकल डबे असणार्या अशी ट्रेन अविरतपणे धावत आहेत.
वाफेच्या इंजिनावर चालणारी उपनगरीय रेल्वेसेवा ते आज विद्युतीकरणामुळे सुसाट वेगात धावणार्या लोकल केवळ प्रवाशांची ने-आण करत नाहीत, तर लाखो मुंबईकरांच्या स्वप्नांच्या दिशेने जाणारा मार्गदेखील गतिमान करतात. मुंबई लोकलसह भारतीय रेल्वेने ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेनसह अद्ययावत आणि सर्वसामान्यांना परवडणारा लक्झरी प्रवास देण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. इतकेच नाही, तर ही ‘वंदे भारत’ काश्मीर खोर्यातूनही आता सुसाट धावते आहे. अद्ययावत असा सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वेचा खर्या अर्थाने आज सुवर्णकाळ सुरू झाला आहे.
लोकलच्या वक्तशीरपणासह आरामदायी प्रवासाचा अनुभव
मी सरळसेवा भरतीतून निवड होऊन भारतीय रेल्वे सेवेत दाखल झाले. मी पश्चिम रेल्वेवरील पहिली महिला मोटरमन आहे. २००९ मध्ये पश्चिम रेल्वेवर माझी नियुक्ती करण्यात आली. मोटरमनची भरती दोन पद्धतीने होते. मी ‘आरआरबी’ परीक्षा देऊन आले. मी जेव्हा सेवेत रुजू झाले, तेव्हा डीसी गाड्याही ताफ्यात धावत होत्या, ज्या १५०० केव्हीवर धावत होत्या. त्यावेळी गाड्यांचा वेग हा ८० किमी प्रतितास होता. मात्र, जेव्हापासून २५ केव्ही वर ट्रान्सफर झाल्यापासून गाड्यांचा वेग वाढला आहे. आता ११० किमी प्रतितास वेगाने गाड्या धावतात. गाड्यांचा वेग वाढल्याने फेर्यांची संख्याही वाढली आहे. डीसी गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांमध्ये फेल्युअर खूप कमी आहे. यामुळे गाड्यांचा वक्तशीरपणाही वाढला आहे. प्रवाशांचा अनुभवही सुधारला आहे. डब्यांमधील व्हेंटिलेशनही सुधारले आहे.
- प्रीती कुमारी, पहिली महिला मोटरवूमन, पश्चिम रेल्वे
रेल्वे मार्गांवरील विद्युतीकरणाच्या प्रगतीची टाईमलाईन
मध्य रेल्वे
१९२५ - हार्बर मार्गावर ४ डबे
१९२७ - मुख्य आणि हार्बर मार्गावर ८ डबे
१९६३ - मुख्य आणि हार्बर मार्गावर ९ डबे
१९८६ - मुख्य मार्गावर १२ डबे
१९८७ - कर्जतच्या दिशेने १२ डबे
२००८ - कसाराच्या दिशेकडे १२ डबे
२०१० - ट्रान्सहार्बर मार्गावर १२ डबे
२०११ - सर्व मुख्य मार्गांवर १२ डबे लोकल सेवा
२०१२ - मुख्य मार्गिकेवर १५ डबे
२०१६ - हार्बर मार्गावर सर्व १२ डबे
२०२० - मुख्य मार्गावर एसी लोकल
पश्चिम रेल्वे
१९२८- पहिली डीसी - इंपोर्टेड
१९६१- ९ डबे- जोसेफ अॅण्ड कंपनी
१९८६- १२ डबे
२००१- १२ डबे- रेट्रोफाईड अल्स्टोम
२००७- सिमलेस एसी-डीसी
२०१२-रेस्ट्रीफाईड २५ व्हीके एसी लोकल
२०१५-बॉम्बार्डियर इलेक्ट्रिकल लोकल
२०१७-भेल एसी लोकल
२०२२-मेधा व्हेस्टिब्युल्ड
२०२३-मेधा व्हेस्टिब्युल्ड
२०२१ - हार्बर मार्गावर एसी लोकल