स्वानंदाची परीक्षा

    21-Feb-2025
Total Views | 25

role of parents and students during exams
 
आजपासून इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा! एव्हाना सर्व विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारीही पूर्ण झाली असेल. तेव्हा, एकूणच या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावे, पालकांची भूमिका काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
विद्यार्थी मित्रहो, दहावीची परीक्षा तुमच्या आयुष्यातील तशी पहिली परीक्षा नाही. तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या परीक्षांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामोरे गेलेले आहात. शाळेत दाखल झाल्यानंतर शाळेत प्रतिवर्षी होणार्‍या परीक्षा, अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धा परीक्षा इ. शालेय, शालेयतर उपक्रम स्पर्धांमधून यशापयशाचा अनुभव तुम्ही घेतलाच आहे. त्यातून तुम्ही स्वतःला समृद्धही केले आहे. मग दहावीची परीक्षा इतकी महत्त्वाची का? तिचा ताण का बरं घ्यावा? हीच परीक्षा स्वतःच्या आनंदासाठी व जीवनातील एक नवा अनुभव म्हणून, त्या परीक्षेचा छान आस्वाद घेत देऊ शकतोच ना. खरंतर दहावीची परीक्षा स्वतःच्या भविष्यासाठी वाट दाखविणारी एक पथदर्शक आहे. स्वतःची वाट शोधण्याची निर्णायक प्रक्रिया. ही प्रक्रिया स्वानंद घेत पार केली, तर नक्कीच यश मिळवून आपण सर्वांना आनंदी करू शकतो. हीच भावना मनात ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन व काही छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब विद्यार्थी व पालक यांनी परीक्षा काळात करा. जेणेकरून सहजच परीक्षेचा आनंद घेता येईल.
 
विद्यार्थ्यांची भूमिका
 
विद्यार्थीमित्रहो, आपण वर्षभर प्रत्येक विषयाचा अभ्यास केलेलाच आहे. कदाचित काहींचा कमी जास्त प्रमाणात अभ्यास झाला असेल. परंतु, परीक्षेत उत्तीर्ण होण्यापासून ते १०० गुण मिळविण्यापर्यंत प्रयत्न करणारे विद्यार्थी असतात. त्यामुळे,
 
१) कोणत्याही मित्रमैत्रिणीशी स्वतःची तुलना करू नका. ‘मी किती करू शकतो’ याचा विचार करा व स्वतःचे १०० टक्के प्रयत्न द्या.
 
२) प्रत्येक विषयाची उजळणी, सराव करताना सकारात्मक विचार व उद्दिष्ट ठेवा.
 
३) मन शांत ठेवा. सकाळी व संध्याकाळी दहा मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करत ध्यान करा, जेणेकरून अभ्यासात एकाग्रता साधता येईल.
 
४) रोज सकाळी उठल्यावर दहा मिनिटे व्यायाम करा. ज्यामुळे परीक्षेला जाताना ताजेतवाने वाटेल.
 
५) शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य राखण्यासाठी सात्विक आहार व झोप नियमित वेळेवर घ्या.
 
६) ताण आल्यासारखे वाटल्यास घरातल्या व्यक्तींशी संवाद साधा. यामुळे भावनिक स्वास्थ्य राखण्यास मदत होईल.
 
७) विद्यार्थीमित्रहो, तुमच्या प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये किमान एक दिवसाची सुट्टी बोर्डाने दिली आहे. विषयानुरूप या सुट्टया चार ते सात दिवसांपर्यंतही आहेत. समजा, वर्षभर जरी काही विषयांच्या अभ्यासात तुमच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल, तरी या मिळालेल्या दिवसांचा वापर सुवर्णसंधी म्हणून अचूक रितीने, नियोजनबद्ध केल्यास तुमची परीक्षा सोपी होऊन जाईल. यासाठी हवे तर शिक्षकांची व पालकांची मदत घ्या.
 
८) दुसर्‍यावर विसंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा.
 
९) स्वतःला मित्रमैत्रिणींशी अनावश्यक गप्पा, मोबाईल व समाजमाध्यमांच्या प्रलोभनांपासून दूर ठेवा.
 
परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी
 
  • परीक्षेला जाताना घरातून वेळेवर निघा व केंद्रावर अर्धातास अगोदर पोहोचा.
  • आपले प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मुख्याध्यापकांच्या मूळ सही व शिक्याचेच जवळ ठेवा.
  • लिखाणासाठी निळा किंवा काळा बॉलपेन वापरा. एखादा अधिकचा पेन जवळ असू द्या.
  • शक्यतो पारदर्शक लिखानाचा पॅड वापरा.
  • परीक्षा कक्षात प्रवेश केल्यानंतर आपला बैठक क्रमांक बघूनच बसा. काही शंका आल्यास, गोंधळ झाल्यास पर्यवेक्षकांना विचारा.
  • उत्तरपत्रिका हातात मिळाल्यावर पहिल्या पानावरची माहिती प्रवेश पत्रानुसारच भरा. नंतर मागील पानावर दिलेल्या सूचना मनापासून वाचा. प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत शांत बसा.
  • प्रश्नपत्रिका मिळाल्यावर प्रथम प्रश्नपत्रिकेवरील सूचना वाचा. दिलेल्या सूचनांनुसार उत्तरपत्रिका लिहा. विषयानुरूप प्रश्नपत्रिकेवरील सूचना वेगवेगळ्या असतात.
  • प्रत्येक प्रश्न वाचून त्याचे आकलन करून उत्तर लिहा. आवश्यक सर्व प्रश्न सोडवा व संपूर्ण पेपर पूर्ण लिहिण्याचा वेळेत प्रयत्न करा.
  • शेवटी दहा मिनिटांमध्ये उत्तरपत्रिका वाचा. बारकोड, होलोक्राप्ट लावले की नाही, याची पडताळणी करा. मगच उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे सोपवा.
  • या सर्व प्रक्रियेत तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचे मनोमन प्रत्येक पेपरच्या दिवशी धन्यवाद माना व परीक्षा दालनाबाहेर पडा.
  • आजचा पेपर कसा गेला यांवर जास्त विचार न करता पुढच्या विषयाचा जोमाने अभ्यास करा. सकारात्मक मानसिकता, शिस्त व बोर्डाचे नियम पाळल्यास परीक्षा आनंददायी अनुभव देऊन जाईल, हे नक्कीच.
 
पालकांची भूमिका
 
कोणत्याही परीक्षा कालावधीत पालकांची भूमिका पाल्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
 
१) पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतरांशी न करता त्याला कशाची गरज आहे, हे ओळखून त्याला सकारात्मक पाठिंबा द्यावा.
 
२) मुलांच्या छोट्या छोट्या हालचालींवर लक्ष ठेवावे. कधी कधी मुलांना अति अभ्यास किंवा अभ्यास नीट लक्षात न आल्यानेही गोंधळल्यासारखी परिस्थिती होते. अशावेळी मुलं अस्वस्थ होतात.
 
३) परीक्षा कालावधीत पालकांनी मुलांशी अभ्यासाव्यतिरिक्त संवाद, गप्पागोष्टी कराव्या.
 
४) झोपण्यापूर्वी मुलांना थोडा फेरफटका मारायला घेऊन जावे व आम्ही तुझ्यासोबत आहोत, हा आत्मविश्वास निर्माण करावा.
 
५) परीक्षा देऊन आल्यावर त्याच विषयावर चर्चा न करता, पुढच्या अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे.
 
६) पालकांनी परीक्षेच्या वेळी मुलांच्या बॅगमध्ये तसेच, कपड्यांमध्ये कॉपी मटेरियल नाही ना, याकडेही लक्ष पुरवावे. आजकाल मिनी झेरॉक्सचा वापर कॉपी प्रकारात सहज होताना दिसतो. भरपूर खिसे असलेल्या पॅन्ट किंवा शर्ट, कुर्ती न घातल्यास उत्तम. हेदेखील गैरमार्गाचेच स्रोत आहेत. विद्यार्थ्यांचा तर वेळ जातोच. परंतु, केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षा यंत्रणांचाही वेळ खर्च होतो.
 
७) डिजिटल घड्याळ, फोन देण्याचे टाळल्यास उत्तमच होईल. या व अशा गोष्टींचा सहज सरळपणे दैनंदिन जीवनचर्येत वापर केल्यास मुलांची परीक्षेबद्दल विश्वासार्हता वाढेल आणि त्यांची ही वाट सुलभ होईल. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! यशस्वी भव! आनंदाची ही वाट सुखाची मम स्वानंदाच्या परीक्षेची.
 
संगीता पाखले
 
(लेखिका श्री. के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली (पूर्व) मुख्याध्यापिका आहेत.)
 
९९३०२७८८९६
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..