सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांना अडकविणे लोकशाहीसाठी घातक! प्रविण दरेकरांनी घेतली एसआयटी पथकाची भेट
21-Feb-2025
Total Views | 56
मुंबई : सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांना अडकविणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे वक्तव्य भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवार, २१ फेब्रुवारी रोजी केले.
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाची मुंबई पोलीस मुख्यालयात त्यांनी भेट घेतली आणि आपल्याकडे असलेले सर्व पुरावे सादर केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रविण दरेकर म्हणाले की, "माझ्याकडे असलेली उपलब्ध माहिती, वृत्तवाहिन्यांना आलेल्या बातम्या आणि माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे जेवढी माहिती होती ती मी समितीसमोर मांडली. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. सत्ता कुणाचीही असो पण अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करून नेत्यांना अडकवणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. आम्ही संविधान तसेच लोकशाहीचे रक्षण आणि आदर करणारे असल्याने सनदशीर मार्गाने या विषयात न्याय मागितला आहे. गृहविभागाने गांभीर्याने याची दखल घेत नगर पोलीस स्टेशन, ठाणे आयुक्तालय येथे ७४२/२२४ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी स्थापन झालेली एसआयटी सरकारला अहवाल देणार आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी मी पोलीस आयुक्तालयात गेलो होतो."