राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच मराठी आणि महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठीला अभिजात दर्जा देणे हे माझे भाग्यच !
21-Feb-2025
Total Views | 22
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहेत. संघामुळेच मराठी आणि महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विज्ञान भवनातील शानदार कार्यक्रमात केले.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तालकटोरा स्टेडियम अर्थात छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत 23 फेब्रुवारी पर्यंत हा सारस्वतांचा सोहळा रंगणार आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञानभवनात झाले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत मराठी भाषेतून भाषणाची सुरुवात केली. "ज्ञानोबा तुकोबांच्या मराठीत मी देशाच्या राजधानीत अभिवादन करतो" या वाक्यांनी पंतप्रधानांनी उपस्थित मराठीजनांची मने जिंकली. यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कालखंडात होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण झाली आहेत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीची 300 वर्षे झाली आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेल्या भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ठळक उल्लेख केला. ते म्हणाले, १०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज एका महान मराठी भाषिकाने पेरले. आज ते वटवृक्षाच्या रूपात आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत, भारताची महान आणि पारंपारिक संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक संस्कृतीयज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून राबवत आहे. मी भाग्यवान आहे की रा. स्व. संघाने माझ्यासारख्या लाखो लोकांना देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली आहे. आणि संघामुळेच मला मराठी भाषा आणि मराठी परंपरेशी जोडण्याची संधी मिळाली. या काळात, काही महिन्यांपूर्वी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. देशात आणि जगात १२ कोटींहून अधिक मराठी भाषिक आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी करोडो मराठी भाषिक दशकांपासून वाट पाहत होते. मला हे काम पूर्ण करण्याची संधी मिळाली; मी हे माझ्या आयुष्यातील एक मोठे सौभाग्य मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ काळात मराठी भाषेने परकीय आक्रमकांपासून मुक्ती मिळवण्याच्या संघर्षाला बळ दिले असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांसारख्या मराठा वीरांनी आक्रमकांचा पराभव केला त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यलढ्यात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या सेनानींनी इंग्रजांची झोप उडवली. त्यांच्या योगदानात मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा होता. केसरी आणि मराठा सारखी वर्तमानपत्रे, कवी गोविंदग्रज यांच्या शक्तिशाली कविता, राम गणेश गडकरी यांची नाटके, मराठी साहित्यातून निर्माण झालेला देशभक्तीचा प्रवाह, यामुळे संपूर्ण देशातील स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा मिळत होती, असे पंतप्रधान म्हणाले.
समाजातील शोषित आणि वंचित घटकांसाठी सामाजिक मुक्तीची दारे उघडण्याचे काम मराठी भाषा आणि मराठी साहित्याने केल्याचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक महान समाजसुधारकांनी मराठी भाषेत नवीन युगाचे विचार रुजवण्याचे काम केले. मराठी भाषेने आपल्याला देशात खूप समृद्ध दलित साहित्य दिले आहे. आधुनिक विचारसरणीमुळे मराठी साहित्यात विज्ञानकथाही लिहिल्या गेल्या आहेत. भूतकाळातही महाराष्ट्रातील लोकांनी आयुर्वेद, विज्ञान आणि तर्कशास्त्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या संस्कृतीमुळेच महाराष्ट्राने नेहमीच नवीन कल्पना आणि प्रतिभेला आमंत्रित केले आहे आणि महाराष्ट्राने खूप प्रगती केली आहे. आपली मुंबई केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
' छावा ' चा उल्लेख आणि शिवशंभू छत्रपतींचा जयघोष
छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेरणादायी आयुष्य मांडणाऱ्या छावा चित्रपटाचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, जेव्हा मुंबईचा उल्लेख केला जातो तेव्हा चित्रपटांशिवाय साहित्याची किंवा मुंबईची चर्चा पूर्ण होणार नाही! मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांनाही ही उंची महाराष्ट्र आणि मुंबईने दिली आहे. आणि आजकाल 'छावा' खूप गाजत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय या स्वरूपात करून देण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या या वाक्यावर उपस्थितांनी शिवशंभु छत्रपतींचा जयघोष केला आणि त्यामुळे अवघे विज्ञान भवन दुमदुमले.
भक्ती, शक्ती आणि युक्ती म्हणजेच मराठी
मराठीत शौर्य आणि धाडस आहे.
मराठी भाषेत सौंदर्य आणि संवेदनशीलता आहे.
समता आहे आणि सुसंवाद आहे,
त्यात अध्यात्माचे सूर आहेत आणि आधुनिकतेच्या लहरी देखील आहेत
मराठीत भक्ती, शक्ती आणि ज्ञान आहे.
संतांचा गौरव
जेव्हा भारताला आध्यात्मिक उर्जेची गरज होती, तेव्हा महाराष्ट्रातील महान संतांनी ऋषींचे ज्ञान मराठी भाषेत उपलब्ध करून दिले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, गोरा कुंभार आणि बहिणाबाई या महाराष्ट्रातील अनेक संतांनी भक्ती चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषेत समाजाला एक नवीन दिशा दाखवली. आधुनिक काळातही, गजानन दिगंबर माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा प्रभाव आपल्या सर्वांना माहित आहे.
शंभरावे संमेलन विशेष व्हावे
२०२७ मध्ये होणारे शंभरावे अखिल भारतीय संमेलन हे विशेष व्हावे, असा मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले, साहित्य संमेलनाच्या या परंपरेला २०२७ मध्ये १५० वर्षे पूर्ण होतील. आणि त्यानंतर १०० वे साहित्य संमेलन होईल. त्याची तयारी आतापासूनच सुरू करा. आजकाल अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी साहित्याची सेवा करत आहेत. तुम्ही त्यांना एक व्यासपीठ देऊ शकता. अधिकाधिक लोकांना मराठी शिकता यावे यासाठी, तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि भाषिनी सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तरुणांमध्ये मराठी भाषा आणि साहित्यावर स्पर्धा देखील आयोजित केल्या जाऊ शकतात. तुमचे प्रयत्न आणि मराठी साहित्यातील प्रेरणा १४० कोटी देशवासीयांना विकसित भारतासाठी नवी ऊर्जा, नवी चेतना आणि नवी प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे.