नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील भाजपच्या आमदार रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी गुरुवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच आताच्या घडीला मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या त्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत.
शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी १९९८ मध्ये दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान दिवगंत काँग्रेस नेत्या शीला दिक्षीत यांना मिळाला होता. त्यानंतर दिवगंत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. २०२४ मध्ये आपच्या आतिशी मार्लेना यांनाही काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली.
मुख्यमंत्रीपदाचा कधीही विचार केला नव्हता : रेखा गुप्ता
रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "मी कधीच विचार केला नव्हता की मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईन. त्यामुळे आमच्याकडून लोकांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. तसेच माझ्यासारख्या साध्या कुटुंबातून आलेल्या मुलीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानते", असे त्या म्हणाल्या.