मी आहे जगज्जीवनी निरंतर

    20-Feb-2025
Total Views | 48

shri gajanan maharaj
 
 
आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येकजण, त्यांच्याकडे आकर्षित झाला. असे वेधवंती व्यक्तित्व लाभलेले हे दोघेही संतपुरुष जनमानसांत अत्यंत प्रिय आहेत. लोकात त्यांच्याविषयी अतीव प्रेमादराची भावना आहे.
 
दोघेही वेगवेगळ्या कालखंडात प्रभावी व्यक्तित्त्वाने नावारुपाला आले. समर्थ रामदासांचा जन्म चैत्र शु. ९ इ. स. १६०८ मध्ये झाला. श्री गजानन महाराजांचा जन्म केव्हा कुठे झाला, हे कोणाला माहीत नाही. रामदासांच्या जन्मानंतर २७० वर्षांनी, दि. २३ फेब्रुवारी १८७८ला गजानन महाराज शेगावात पातुरकरांच्या घरासमोर प्रथम दिसल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी महाराजांचे वय १६ ते १७ वर्षांचे असावे, असे पोथीतील वर्णनावरून वाटते. या दोघाही महान विभूतींचे भक्तिमार्गातील, हिंदू संस्कृतीतील कार्यकर्तृत्व मोलाचे आहे. कालदृष्ट्या समर्थ रामदास बरेच अगोदरचे असले, तरी दोघांच्या कृतीतील, विचारांमधील साम्य तपासायला हरकत नाही. समर्थ रामदासस्वामींच्या चरित्रावर, कार्यकर्तृत्वावर, विचारधारेवर आज बरेचसे टीका वाङ्मय उपलब्ध आहे. अभ्यासकांनी समर्थांचे देवकारण, धर्मकारण, राजकारण, हिंदू धर्म, संस्कृतीरक्षण यावर चिकित्सापूर्ण मीमांसा केली आहे. रामदासांनी तत्कालीन जुलमी मुस्लीम राजवटीच्या विरोधात जाऊन, हिंदू धर्म व संस्कृती वाचवण्यासाठी समर्थ संप्रदायाची स्थापना केली. अनेक ठिकाणी अकराशेच्या वर मठस्थापना करून त्यावर महंतांना नेमून, रामोपासना सांगून स्वामिनिष्ठ, वीर, भक्त हनुमानाच्या उपासनेला सर्वत्र पोहोचवले. स्वामींचे तत्त्वज्ञान, विचार त्यांचा राघवाचा पंथ, भक्तिमार्ग, अध्यात्मात व प्रपंचात पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिला, यात शंका नाही. रामदांसाच्या काळानंतर हिंदूधर्म, संस्कृती, रामभक्ती करणार्‍या संतांवर समर्थविचारधारेचा प्रभाव राहिला.
 
शेगावचे श्री संत गजानन महाराज यांच्या चरित्रावर, कार्यपद्धतीवर फारसे टीका वाङ्मय निर्माण झाले नाही. समर्थांनी शिष्यांसाठी दासबोध, मनाचे श्लोक सांगितले. तशी आध्यात्मिक प्रवचने गजानन महाराजांनी दिली नाहीत. महाराजांचा सारा भर कृतिशीलतेवर होता. भक्तांवर चांगले संस्कार व्हावे, हे ते आपल्या कृतीतून अथवा फक्त त्याच भक्ताला समजेल, अशा अल्प शब्दांत सांगत. इतरांना ते बोल समजत नसत. गजानन महाराजांच्या चरित्राचा, विचारांचा, भक्तिप्रेमाचा भाग समजून घ्यायचा, तर दासगणू महाराजांनी पद्यात लिहिलेला ‘श्री गजानन विजय’ हा ग्रंथ पाहावा. दासगणूंच्या प्रासादिक वाणीतून निर्माण झालेल्या या ग्रंथात, लोक गजानन महाराजांची पोथी म्हणतात. पोथीत सांगितलेल्या फलश्रुतीप्रमाणे भाविक त्या ग्रंथाची पारायणे करून, आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात. इ. स. १९३८च्या दरम्यान, दासगणू महाराजांनी मंदिरातील कागदपत्रांच्या आधारे समाधीसमोर बसून हा ग्रंथ लिहिला. तो विश्वासार्ह आहे. त्यासाठी दासगणूंनी कसलेही मानधन घेतले नाही. ‘गजानन विजय’ ग्रंथात महाराजांचे, त्यांच्या शिष्यांचे अनेक प्रसंग वर्णन केले आहेत. महाराजांच्या लीला त्यात आहेत. त्यातून महाराजांच्या विचारांची ओळख पटते, महाराजांचे गुण समजतात. महाराज त्रिकालज्ञ होते. मानवजातीवर त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. परमात्म्याविषयी श्रद्धा उत्पन्न करून, लोक धर्माचरणाला लावले. परब्रह्माचा साक्षात्कार झाल्याने, महाराज इंद्रियातीत होते. वेद त्यांना मुखोद्गत होते. त्यांना योगसिद्धी प्राप्त होत्या, हे त्यांच्या चरित्रातून, लीलांतून दिसून येते. या सार्‍या सिद्धींचा उपयोग महाराजांनी सदाचरणवाढीसाठी, ईश्वरश्रद्धेसाठी, एकोप्यासाठी, लोकांच्या व्यथा कमी करण्यासाठी केला. भोंदूगिरीला, भ्रष्टाचाराला हद्दपार केले. आजही ही परंपरा, शेगाव संस्थानच्या मठात चालू असल्याचे पाहायला मिळते. तेथील स्वच्छ, भक्तिमय वातावरणाने तेथे जाणार्‍या प्रत्येक भक्ताला समाधान मिळते.
 
समर्थ रामदासांनी इतरांच्या सेवेत जाणारा शूर मराठ्यांचा ओघ थांबवून, त्यांनी हिंदवी स्वराज्याकडे वळवले. त्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्रधर्म वाढवावा।’ अशी हाक दिली आणि राजकीय सामाजिक कार्यासाठी, समाजाला एक दिशा दिली. हिंदू धर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मण प्रतिपालन + स्वराज्य + एकीकरण = महाराष्ट्रधर्म (वि. का. राजवाडे) हा महाराष्ट्रधर्म हिंदुस्थानभर न्यायला, वाढवायला रामदासांनी सांगितले. तसेच गजानन महाराजांनी शेगावातील लोकांची आपापसात भांडून जी शक्ती वाया जात होती, ती थांबवली. महाराजांनी गावातील पाटील-देशमुखांचे वैर संपवून, गावातील दुफळी मिटवली. त्या शक्तीचा विनियोग विधायक कार्यासाठी केला. समर्थांनी जुलमी मुसलमानी सत्तेला विरोध केला. ‘बुडाला औरंग्या पापी। म्लेंच्छ संहार जाहला।’ असेही ते म्हणाले. तरी त्यांच्या मनात इस्लाम अनुयायांविषयी द्वेष-मत्सर नव्हता. स्वामींचा आक्षेप त्यांच्या विध्वंसक कार्यावर, मूर्तिभंजनावर होता. स्वामींचे काही मुस्लीम शिष्यही होते. त्यांपैकी दोघांच्या कबरी सज्जनगडावर आहेत. गजानन महाराजांनीही मुस्लीम संत महताबशा साई याला सन्मानाने वागवून, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला व त्याला पंजाबात पाठवून दिले. ही हकिकत ‘गजानन विजय’ ग्रंथाच्या १७व्या अध्यायात तपशीलवार दिली आहे. संतांच्या ठिकाणी विश्वकल्याणाची दृष्टी असते, तेथे धार्मिक बंधने आड येत नाहीत.
 
औरंगजेबाच्या कपटी कारवायांना बळी पडल्याने, शिवाजी महाराजांना आग्य्राला कैद होण्याचा प्रसंग आला. ही बातमी महाराष्ट्रासाठी भयंकर होती. अशा वेळी समर्थ रामदासस्वामींनी बुंदेलखंड येथे जाऊन, तेथील देवीची आराधना केली. आग्रा तेथून जवळ आहे. समर्थ बुंदेलखंडला आठ दिवस राहिले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. त्या काळात आग्र्याच्या जवळ राहून, समर्थांनी महाराजांच्या सुटकेसाठी दैवी आणि भौतिक प्रयत्न केले. इकडे गजानन महाराजांच्या काळात, लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला इंग्रजांनी भरला. टिळकांचे भक्त त्यासाठी मुंबईला धावू लागले. टिळकभक्तांपैकी एक कोल्हटकर मुहार शेगावला उतरले. तथापि, टिळकांवरील खटल्याची बातमी समजताच, गजानन महाराज ध्यानावस्थेत गेले. महाराज तीन दिवसांनी समाधी अवस्थेतून बाहेर आले, कोल्हटकर तोपर्यंत मठातच होते. महाराज फक्त एवढेच म्हणाले, “सरकार न्याय पाळणार नाही, टिळक दूर जातोय. पण त्याच्या हातून महान कार्य होणार आहे.” याचा अर्थ ध्यानावस्थेत तीन दिवस, महाराजांच्या अंतर्मनात टिळक खटल्याचा विचार चालू होता. टिळकांना शिक्षा होऊन सहा वर्षे, मंडाले येथील तुरुंगात पाठवले. तेथे ’गीतारहस्य’ ग्रंथ जन्मला, हे सर्वांना ठाऊक आहे. ती नियतीची योजना होती, हे महाराजांनी जाणले होते.
 
गजानन महाराज शेगावी प्रकट होण्याअगोदर सज्जनगडावर होते, असे बोलले जाते. पण, त्याचा काही पुरावा नाही. तथापि, समर्थांचे निष्ठावान भक्त बाळकृष्ण बुवा यांना, महाराजांनी समर्थांच्या रुपात दर्शन दिल्याची कथा ‘गजानन विजय’ ग्रंथात आली आहे. बाळकृष्णबुवा नावाचे समर्थांचे निस्सीम भक्त बाळापूरला राहात. दरवर्षी सुमारे ५०० किमी पायी प्रवास करून, ते रामदासनवमीला सज्जनगडावर येत. वयाची ६० वर्षे झाल्यावर रामदास त्यांच्या स्वप्नात जाऊन म्हणाले, “तू आता थकला आहेस, घरी उत्सव साजरा कर. मीच तेथे येतो.” या स्वप्नाने, बाळकृष्णवुवा उत्साहाने कामाला लागले. आत दासनवमीच्या पूजेची तयारी चालू असताना, गजानन महाराज दारात उभे राहून मनाचे श्लोक म्हणू लागले. बाळकृष्णबुवा धावत बाहेर आले, तर साक्षात रामदासस्वामी दारात उभे! त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. पुन्हा पाहतात तो त्यांना गजानन महाराज दिसले. पूजा पूर्ण झाली. रात्री बाळकृष्णबुवांना स्वप्न पडले. स्वप्नात रामदास स्वामी म्हणाले, “अरे तू शरीररूपी वस्त्रास का महत्त्व देतोस? मी आणि गजानन महाराज यांच्यात भेद नाही, आत्मरूपाने भी म्हणजेच गजानन महाराज.”(अध्याय ९वा) देहरूपी वस्त्राचा त्याग करताना समर्थ म्हणाले होते, “माझी काया आणि वाणी। गेली म्हणाल अंतःकरणी। परी मी आहे जगज्जीवनी निरंतर।’ या दोन्ही स्वयंभू आत्मस्वरुपांना शतशः प्रणाम!
 
जय रघुवीर समर्थ। जय गजानन।
 
 
सुरेश जाखडी
 
७७३८७७८३२२
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121