लावणीचा नवा शिलेदार!

    19-Feb-2025   
Total Views | 28
 
pawan tatkare
 
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्‍या आणि लावणी साकारणार्‍या पवन तटकरे याच्याविषयी...
 
रंगमंचावर काळोख पसरला आहे. अचानक ढोलकीचे बोल कानी ऐकू येतात. रंगमंच प्रकाशमान होतो आणि नऊवारी साडीतला ‘पुरुष’ अखेर प्रेक्षकांच्या नजरेस पडतो. त्याच्या पायातले घुंगरू ताल धरू लागतात. त्याचा देह, त्याचे मन नृत्याशी एकरूप होऊन जाते. समोर जमलेला रसिक बेधुंद होऊन, त्याच्या नृत्याला दाद देत असतात. अखेर लावणी संपते आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरूच राहतो. आपल्या ठसकेबाज लावणीने, प्रेक्षकांची मने जिंकणारा हा तरुण म्हणजे पवन तटकरे.
कौतुकाचे वर्षाव होतात. तरुण, तरुणी सेल्फी घेण्यासाठी जवळ गर्दी करतात. प्रेक्षकांच्या प्रेमाचे संचित घेऊन, पवन बाहेर पडतो आणि अंतर्मुख होतो. त्याचा पुढचा प्रवास त्याला खुणावत राहतो. लोककलेचा वारसा आणि वरदहस्त लाभलेल्या घरात, पवन तटकरे याचा जन्म झाला. ज्येष्ठ कलावंत गोविंद राघो तटकरे यांचा नातू पवन तटकरे. लोककला आणि लोकसंस्कृती, महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा अविभाज्य भाग आहे. मराठी संस्कृतीच्या समृद्धीचे मूळ हे, याच लोकसंस्कृतीमध्ये दडले आहे. ही लोककला टिकली पाहिजे, त्याची ओळख सामान्य नागरिकांना व्हायला हवी, पुढच्या पिढीपर्यंत ही लोककला पोहोचली पाहिजे, यासाठी झटणारे लोक कमीच. परंतु, पवन तटकरे हे नाव या शिलेदारांमध्ये समाविष्ट करावे लागेल.
 
वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पवनचा ओढा लावणीकडे होता. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्याने नृत्याचे प्राथमिक धडे गिरवले. नकळत्या वयातच भविष्यातील वाटचालीवर शिक्कामोर्तब झाले होते. शाळकरी वयातच पवनच्या नृत्यकलेचा पाया रचला जात होता. रूढार्थाने पवनला कुठल्यातरी नृत्यकलेमध्ये फक्त प्राविण्य मिळवायचे नव्हते, तर पवनला लावणी समजून घ्यायची होती. या कलाप्रकारतले अंतरंग, त्याची खोली हे सारे आत्मसात करायचे होते. आपल्या अंगभूत कलागुणांसोबतच, पवनने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास शिकण्याचा होता, सावरण्याचा होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वत:ला घडवण्याचा होता. सगळ्यांप्रमाणे त्याची सुद्धा शिक्षणाची वारी सुरू होती. वयाच्या एका टप्प्यावर उदरनिर्वाहासाठी, जीवनाची दिशा ओळखून काम करावे लागते. विज्ञान शाखेत प्रवेश घेत पवनने, त्याच रस्त्यावर चालायला सुरुवात केली. मात्र, फार काळ पवन लावणीपासून दूर राहू शकला नाही. आपले अस्तित्व लावणीशिवाय शून्य आहे, याची प्रचिती पवनला आली. अखेर आपल्या आईवडिलांना विश्वासात घेऊन त्याने, लावणी हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे सांगितले.
 
कलेसाठी आपले जीवन वाहून घेणार्‍या कलावंतांसमोर, आव्हानांचे डोंगर उभे असतात आणि याचीच चिंता पालकांना पोखरत होती. मात्र, पवनला त्याच्या कलेवर विश्वास होता. त्याच्या याच सामर्थ्याच्या जोरावर त्याने, आपल्या कामाला सुरुवात केली. दादरच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, अल्पावधीतच त्याच्या वेगळेपणाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. नऊवारी साडी नेसून लावणी सादर करणार्‍या पवनला बघण्यासाठी महाविद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी गर्दी करू लागले. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पवनने आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला. एक कलाकर म्हणून स्वत:चे सामाजिक भान जपत त्याने, आपली कला लोकहितासाठीसुद्धा वापरली. ‘राष्ट्रीय सेवा योजना’ अर्थाच ‘एनएसएस’च्या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये त्याने सक्रिय सहभाग नोंदवला. तरुण वयातच सामाजिक संस्थेबरोबर काम करत पवनने आपले वेगळेपण सिद्ध केले. शिक्षण घेत असतानाच पवनने ‘संगीतबारी’ या विषयावर प्रबंध लिहिला. लावणी म्हणजे केवळ तमाशा नसून, तिचे पारंपरिक नेमके रूप, तिचे वेगळेपण, तिचे जतन नेमके कसे केले जाते, याबद्दलची माहिती पवनने दिली.
 
मध्यंतरी ‘कोविड’च्या काळात, अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप्सवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. या व्हिडिओमध्ये एक मुलगा, एका स्पर्धेत लावणी करत होता. त्याच्या नृत्याचे सगळ्यांनी कौतुक केले. हा व्हिडिओ, पवनच्याच एका स्पर्धेतल्या नृत्याचा होता. पवनने स्वत:चे युट्युब चॅनल सुरू केले. अल्पावधीतच हजारो प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद लाभला. नृत्याचे विविध प्रकार हाताळत तो आपल्या कलेमधील नावीन्य जपतो. गुरू दिपाली विचारे यांच्या मार्गदर्शनात, पवन आता कथ्थक शिकतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नृत्य दिग्दर्शनाचे कामसुद्धा पवन करत आहे. यशाची पुढची पायरी गाठत ‘पवन तटकरे अकादमी ऑफ डान्स’ची स्थापनाही त्याने केली. लावणीचे सर्वांगीण शिक्षण या अकादमीच्या माध्यमातून, पवन विद्यार्थांना देत असतो. पवनचा नृत्याविष्कार बघून, भारावून जाणारे असंख्य लोक आहेत. पण, त्याने केले म्हणजे मी सुद्धा हे करू शकतो, असा विश्वास बाळगत लावणी शिकणारी मुले, मुलीसुद्धा आहेत. आपल्या यशाचे श्रेय सहजतेने आईवडिलांच्या पदरात टाकताना पवन म्हणतो की, “आईवडिलांनी एकदा आपल्यावर विश्वास ठेवला ना की, अवघड गोष्टीसुद्धा सोप्या होतात. त्यांचे बळ हीच माझी ऊर्जा आहे.” लावणीचे वर्तमान आणि भविष्यावर भाष्य करताना पवन म्हणतो की, “लावणी आणि एकूणच लोककलेचे भविष्य उज्ज्वल आहे. लावणी करणार्‍या विद्यार्थ्यांचा आज सन्मान केला जातो, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. नृत्य कलेच्या कुठल्याही एका विशिष्ट साच्यात अडकून न राहता, युवा पिढीला वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वाने लोककलेचा वारसा जतन करणार्‍या आणि पुढे नेणार्‍या, पवनला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

'आयटीआयच्या' विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121