गांधीनगर, दि.१९ : वृत्तसंस्था गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी व्यापारी संकुल उभारत त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा युक्त असलेले "बसपोर्ट" निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ केला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते.
राज्याचे परिवहन मंत्री गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार आणि अधिकारी असे शिष्टमंडळ देखील या दौऱ्यात सहभागी आहे. या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली.गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती . इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का ? याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.
यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणालीची माहिती, बसस्थानकावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा संबंधित माहिती अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाने दिली. गुजरात प्रशासनाने बसस्थानकावर थोड्यावेळ विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना कमी किंमतीमध्ये 'प्रवासी विश्रांतीगृह' उपलब्ध करून दिले आहे, या सुविधेचे मंत्री सरनाईक यांनी कौतुक केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली.