मुंबई, दि.१९ : विशेष प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी या भारतातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षम बंदर प्राधिकरणाने मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी पूर्वीच्या नॅशनल मरीन ड्रेजिंग कंपनी म्हणजेच पीजेएससीसोबत महत्त्वपूर्ण सहयोग स्थापन करून वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लि.च्या बांधकामासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार वाढवण बंदराला जागतिक स्तरावरील पहिल्या १० बंदरांपैकी एक बनविण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे. हा करार जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे सीएमडी उन्मेष शरद वाघ आणि यासर झघलौल यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात झाला.
या सामंजस्य करारानुसार, एनएमडीसी ग्रुप पीजेएससीने वाढवण बंदराच्या ड्रेजिंग, रिक्लेमेशन आणि शोअर प्रोटेक्शनद्वारे वाढवण किनारपट्टीच्या लँड ऑफशोअरच्या विकासासाठी अंदाजे २१,००० कोटींची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या सामंजस्य कराराद्वारे, एनएमडीसी ग्रुप पीजेएससी भारताच्या सागरी विकासासाठी आपली दृढ वचनबद्धता दर्शवित आहे. एनएमडीसी ग्रुप पीजेएससीचे मुख्यालय अबू धाबी,युएई येथे आहे. ही कंपनी अभियांत्रिकी, सागरी ड्रेजिंग, खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात नामांकित आहे.
या सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित करताना जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्हीपीपीएलचे सीएमडी उन्मेष शरद वाघ म्हणाले, “जेएनपीए आणि एनएमडीसी ग्रुपपीजेएससी यांच्यातील सामंजस्य करार वाढवण बंदर जागतिक दर्जाचे सागरी केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे सहकार्य भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी बंदर प्रकल्पांपैकी एकासाठी जागतिक कौशल्य, त्याचा धोरणात्मक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करते. नियोजित वेळेच्या आधीच प्रगतीसह आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी, भविष्यातील व्यापार मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि भारताची बंदर क्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध आहोत",
यापूर्वी, केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत वाढवणं बंदर प्रकल्पासाठी अनेक सामंजस्य करारांवर सह्या करण्यात आल्या आहेत.