रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला, पण त्याचा शेवट अजूनही अंधारात आहे. हे युद्ध संपवण्याऐवजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्सकी स्वतःच्या सत्तेचा अहंकार जपत, युरोपला युद्धाच्या आगीत ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अमेरिका सौदी अरेबियामध्ये रशियाशी शांतता वाटाघाटी करण्याच्या विचारात असताना, झेलेन्सकीं मात्र थेट युरोपातील देशांनाच युद्धात उतरवण्यासाठीचे आवाहन करत आहेत. युरोपने जर वेळीच सावधगिरी बाळगली नाही, तर झेलेन्सकींच्या खुर्ची वाचवण्याच्या हट्टापायी, संपूर्ण युरोपच आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असेल. ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या देशांनी भावनेच्या भरात झेलेन्सकींच्या नादी लागू नये. एका हताश नेत्याच्या सत्ता हव्यासाने संपूर्ण युरोपचा नाश घडवला, अशीच या घटनेची इतिहास नोंद ठेवेल, हे नक्की!
झेलेन्सकीं यांनी गेली काही वर्षे अमेरिका आणि ‘नाटो’च्या जीवावर, युक्रेनचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही ‘नाटो’ने त्यांना पूर्ण सदस्यत्व देण्यास टाळाटाळ केली. वास्तविक, या युद्धाचे खरे लाभार्थी हे अमेरिकेतील व्यावसायिकच राहिलेले दिसतील. मात्र, या सगळ्यात अमेरिकेच्या नागरिकांचा हक्काचा प्रचंड पैसा वाया गेला. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकेने झेलेन्सकींचे लाड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, तसे आश्वासन देऊनच ट्रम्प यांनी सत्ता मिळवली. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे झेलेन्सकींच्या हताशेने कळस गाठला असून, त्यामुळेच झेलेन्सकींनी आता युरोपला युद्धाच्या आगीत लोटण्याचा खेळ सुरू केला आहे. युरोपने यात सजग राहून, व्यवहारिकता दाखवण्याची गरज आहे. मात्र, अशा वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीम स्टार्मर यांचे ‘आवश्यक असल्यास ब्रिटिश सैन्य युक्रेनमध्ये पाठवू’ हे विधान युरोपच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध संपूर्ण युरोपच्या भूमीवर घेऊन जाणे हा मूर्खपणाच! मात्र, खरा प्रश्न असा आहे की, जर अमेरिका स्वतः युद्धात उतरायला तयार नसेल, तर मग युरोप का स्वतःच्या नाशाला निमंत्रण देत आहे?
युरोपीय देश आधीच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ‘कोरोना’ महामारीनंतर आलेली मंदी, वाढती महागाई, ऊर्जासंकट आणि बेरोजगारी हे प्रश्न सोडवण्यात युरोपीय देशांना अजूनही यश आलेले नाही. त्यातच या युद्धामुळे नैसर्गिक वायू आणि तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने, युरोपच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला आहे. जर झेलेन्सकींच्या हट्टामुळे युरोप युद्धात सामील झाला, तर हीच परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जर युरोपने थेट युद्धात सहभाग घेतला, तर रशियाही थांबणार नाही. या सार्यामुळे आण्विक युद्धाचा धोकाही जगाला निर्माण होऊ शकतो. युक्रेन स्वतःची अर्थव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था सांभाळू शकत नाही आणि आता झेलेन्सकी आपल्या देशाचा भार संपूर्ण युरोपवर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. युरोपला त्यांचा हा कट ओळखून, वेळीच सावध झाले पाहिजे. ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या देशांनी झेलेन्सकींच्या भावनिक आणि आक्रमक आवाहनांना बळी पडण्यापेक्षा, शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाने, युरोपचा आधीच नाश केला होता. आता तिसर्या जागतिक युद्धाचा धोका पत्करणे म्हणजे युरोपसाठी आत्मघातच! युरोपातील राष्ट्राने यावेळी स्वतःच्या देशातील प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर ट्रम्प हे करू शकत असतील, तर युरोपलाही तोच मार्ग स्वीकारणे कठीण नाही. एका असंमजस आणि अमेरिकेच्या विखारी चालीचा प्यादा म्हणून युक्रेनच्या सत्तेवर आलेल्या नेत्यासाठी, संपूर्ण युरोपने आपला बळी द्यायचा का, हा प्रश्न आता प्रत्येक युरोपीय देशाने स्वतःला विचारला पाहिजे.
‘कोविड’ महामारीनंतर सुरू झालेल्या जागतिक युद्धांनी जगाला त्राहिमाम करून सोडले आहे. जागतिक पुरवठा साखळी आणि पर्यायाने जागतिक अर्थव्यवस्था यांच्यावरही विपरित परिणाम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध जागतिक व्यासपीठांवरून वारंवार स्पष्ट केले आहे की, संवाद आणि संयम हाच दीर्घकालीन शांततेचा मार्ग आहे. त्यामुळे युरोपने इतिहासातील चुका पुन्हा करू नयेत. अन्यथा, संपूर्ण युरोपला आपल्या अस्तित्वाची किंमत मोजावी लागेल, हे नक्की!