आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य आणि वैचारिकतेसाठी स्वतःचा ठसा उमटवणार्या, तळोजा येथील डॉ. वर्षा चौरे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
रामचंद्र यांनी मुलीला उच्चशिक्षणासाठी एकटीला शहरात पाठवले. यावर त्यांचा मित्र त्यांना म्हणाला, “तुझी मुलगी नाव काढेल. पण, असं नको व्हायला की, ती तुझं नाव घालवेल.” यावर रामचंद्र म्हणाले, “माझं लेकरू कधीच काही वाईट करणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे.” ‘माझं लेकरू कधीच काही वाईट करणार नाही,’ हा बाबांचा विश्वास, त्यांच्या कन्येने सार्थ केला. आज त्याच वर्षा म्हणजे, डॉ. वर्षा चौरे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा वारसा जगत आहेत आणि जागवत आहेत. साहित्यिक विचारवंत आणि नि:स्वार्थीसमाजसेवक म्हणून त्यांना समाजात आदराचे स्थान आहे. त्या ‘जनक्रांती संघ संघटने’च्या अध्यक्ष आहेत, तर ‘पद्मा’ म्हणजे, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन’च्या विश्वस्तही आहेत. ‘रेप फ्री महाराष्ट्र’ अर्थातच ‘बलात्कारमुक्त महाराष्ट्रा’साठी, त्या काम करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या विविध नामांकित संघटनांचे प्रतिनिधित्व करतात. त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहेत. ‘ग्लोबल मिनिस्ट्री अॅण्ड डिसप्लेशिप इन्स्टिट्यूट, युगांडा’तर्फे त्यांना ’डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली.
धनगर समाजाचे रामचंद्र चौरे आणि सुनिता हे दाम्पत्य, मूळचे उस्मानाबाद येथील इर्ला गावचे. त्यांची सुकन्या वर्षा. रामचंद्र आणि सुनिता हे शेतमजुरी करत असत. ९०च्या दशकात वर्षा यांचा जन्म झाला. जन्मानंतर तीन तास प्रयत्न करूनही, वर्षा रडल्या नाहीत की काही प्रतिसादही दिला नाही. डॉक्टरांना वाटले की बाळ दगावले. आईचे वडील, बाळाचे आजोबा गोरोबा पानढवळे यांनी डॉक्टरांची विनवणी केली, हट्ट केला की, वाट्टेल ते करा, पण लेकराला जगवा. शेवटी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि सात-आठ तासांनी बाळाने प्रतिसाद दिला. जन्मापासून पाच वर्षांपर्यत बाळाची तब्येत नरम-गरमच असायची. त्यावेळी आजोबा गोरोबा म्हणाले, “बाळीने जन्मापासूनच डॉक्टरांकडे जायला लावले आहे. ही भविष्यात डॉक्टरच होणार असे वाटते.” आजोबांचे शब्द त्या बालिकेच्या भविष्याचा जणू वेधच घेत होते.
वर्षा यांची आई सुनिता या अत्यंत धैर्यवान आणि कष्टाळू. स्त्री अबला नाही, तर सबला आहे, असे त्यांच्या वागण्यातून सहज प्रतीत होत असे. हाच आत्मविश्वास, तडफदारपणा वर्षामध्येही उतरला. वर्षा सहा महिन्यांच्या असतानाच, रामचंद्र हे शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. लेकीने उच्चशिक्षण घ्यावे, ही रामचंद्र यांची इच्छा होती. त्याप्रमाणे वर्षाही मन लावून शिकत होत्या. त्यांना वाचनाची आवड होती. वक्तृत्व, वादविवाद, निबंध स्पर्धेत त्या कायम अव्वल असत. बारावीनंतर त्यांनी नवी मुंबईमध्ये, दंतचिकित्सक शाखेत प्रवेश घेतला. शिकत असतानाच त्या अनेक सामाजिक समस्यांवर काम करू लागल्या.
२०१३ साली निर्भया हत्याकांड झाले. पुढे मुंबईमध्ये शक्तीमिल कंपाऊंड बलात्कार कांड झाले. वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असलेल्या वर्षा दुःखी झाल्या. कधी थांबतील हे बलात्कार? या प्रश्नाने अस्वस्थ होत त्यांनी, ‘रेप फ्री महाराष्ट्र’ या संकल्पनेवर काम करायला सुरुवात केली. या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुणांचे समुपदेशन, बलात्कार आणि विकृत मानसिकता यांवर जागृती करण्याचे काम सुरू केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शोषित-वंचित गरजू समाजाच्या आरोग्यसेवेसाठी काम करता यावे, म्हणून त्या ‘पद्मा’ म्हणजे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन’च्या विश्वस्तपदावर काम करू लागल्या. या असोसिएशनमध्ये, महाराष्ट्रातील धनगर समाजातील जवळजवळ ३५० डॉक्टर सहभागी आहेत. दुर्गम खेडोपाडी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करणे, सहकार्य करणे असे कार्य त्या करू लागल्या. समाजात वावरताना समाजाचे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आले. पण हे प्रश्न आंदोलन-मोर्चे वगैरे काढून संपणार नाहीत, असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळेच त्यांनी, ‘जनक्रांती संघ’ या संघटनेची स्थापना केली. लोकशाहीनुसार विधायक स्तरावर समन्वय साधत, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून, महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी आणि कर्तव्यहक्कदक्ष नागरिक त्यांच्यासोबत जोडले गेले.
‘कोरोना’ काळात जीवावर उदार होऊन त्यांनी जनसेवा केली. त्याशिवाय लोकांमध्ये जीवनप्रेरणा कायम राहावी, म्हणून त्यांनी एक आगळा-वेगळा उपक्रमही राबवला. यूट्युबच्या माध्यमातून त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारकर्तृत्वावर आधारित, व्हिडिओंची मालिका प्रसारित केली. लाखो लोकांनी त्यांच्या या उप्रकमाला प्रतिसाद दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर संशोधन करणार्या विचारवंत म्हणून त्यांना लौकिक मिळाला. वर्षा यांचा दृढ विश्वास आहे की, राजमाता अहिल्यादेवींची प्रेरणाच समाजाला तारू शकते. त्यामुळेच राजमातेच्या विचारकर्तृत्वाचा प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी त्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ हे पुस्तक लिहित आहेत. पुस्तकाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत राजमातेचे विचार पोहोचवावे, असा त्यांचा संकल्प आहे. तसेच, ’कर्तृत्वाची यशोगाथा पुण्यश्लोक राष्ट्रमाता’ या पुस्तकाचे संपादनही त्या करत आहेत. त्या म्हणतात, “माझे आईबाबा माझा समाज आणि मुख्यतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचारकार्य, हीच माझी प्रेरणा आहे. यापुढेही राजमातेचा आदर्श वारसा समाजात संवर्धित व्हावा, यासाठी आयुष्यभर काम करणार आहे.” डॉ. वर्षा आज खर्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा जागवत आहेत.