'येमेनी' घुसखोर, ९ वर्ष मदरशात आसरा; अमेरिकेच्या धरतीवर भारतही कठोर भूमिका घेणार?
18-Feb-2025
Total Views | 73
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Yemen Migrants Nandurbar News) अवैध घुसखोरी हा राज्यस्तरावरच नाही तर राष्ट्रस्तरावरचा गंभीर मुद्दा ठरतो आहे. हे अवैध घुसखोरी करणारे केवळ बांगलादेश आणि पाकिस्तानातूनच येतात असे नाही, तर येमेनमधून सुद्धा येत असल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील एका घटनेमुळे निदर्शनास आले आहे. या येमेनी घुसखोरांना मदशांमध्ये आश्रय आणि संरक्षण मिळत असल्याची माहिती पुढे उघडकीस आली.
येमेनमध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा युद्ध पेटलं होतं तेव्हापासून येमेनमधील इस्लामिक नागरिक भारतात येऊ लागले. अर्थातच ते भारतात बेकायदेशीरपणे आले होते. नंदुरबार या जनजाती जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे 'जामिया इस्लामिया ईशातूल उलूम' या संस्थेच्या मदतीने गेली नऊ वर्षे बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आले. इथल्या मदरशावर कारवाई झाल्यामुळे ही बाब उघड झाली, परंतु देशभरात असे लाखो मदरसे आहेत, जे अश्याप्रकारे अवैध घुसखोरांना आसरा देत आहेत. जी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे.
अक्कलकुवात सापडलेला अवैध घुसखोर खालिद इब्राहिम सालेह अल खदामी व त्याची बेगम खदेजा यांना भारतातील वास्तव्यात दोन मुली झाल्या. त्यापैकी एका मुलीचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारा अक्कलकुवा ग्रामपंचायतीतला जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी भारतीय नागरिकत्वाचे पुरावे त्यांनी गोळा केल्याचे दिसून आले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर विषय असल्यामुळे, खालीद इब्राहिम आणि त्यांना आश्रय देणाऱ्या जामिया इस्लामिया या संस्थेची आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली.
हे परदेशी घुसखोर विद्यार्थी व्हिसा, व्यापारी व्हिसा, मेडिकल व्हिसा, प्रवासी व्हिसा इत्यादीच्या नावाखाली भारतात पोहोचतात. परंतु व्हिसा कालबाह्य झाल्यानंतरही वर्षानुवर्षे इथेच राहतात. प्रामुख्याने इस्लामिक संघटनांच्या मदतीने आपले बस्तान बसवतात. भारतीय मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करतात. या मुली बहुतेकवेळा लव्ह जिहादची शिकार झालेल्या हिंदू, जनजातीय मुली असतात. जेव्हा या लोकांना पकडले जाते, तेव्हा या महिला ‘माझ्या नवऱ्याला बेकायदेशीरपणे पकडून नेले आहे’, अशी उलट तक्रारही नोंदवतात.
या घुसखोरांना लवकरात लवकर आपले बस्तान बसवायचे असल्यामुळे ते गुन्हेगारी विश्वाततले स्लीपर सेल म्हणून काम करतात. अनेक गुन्हेगारीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी त्यांचा जवळचा संबंध असण्यात शंका नाही. कारण गेल्या अनेक वर्षांत अवैधपणे भारतात राहणाऱ्या येमेनी नागरिकांना अंमली पदार्थांची विक्री करताना आणि वाहतूक करताना पकडले होते मात्र ते घुसखोर आहे, हे उघड झाले नव्हते.
सरकारी आकडेवारीनुसार २०१९ ते डिसेंबर २०२१पर्यंत व्हिसा एक्सपायर होऊनही अवैधपणे भारतात राहणाऱ्या परदेशी लोकांची एकूण संख्या ३,९३,४३१ इतकी प्रचंड आहे. प्रत्यक्ष घुसखोरी करून भारतात आलेल्यांची संख्या ५ कोटी असल्याचं म्हटलं जातं. सर्व प्रकारच्या भारतीय नागरी सुविधा ते अगदी मनसोक्तपणे उपभोगत असतात. भारताशी आणि इथल्या समाजाशी कसलीही बांधिलकी आणि आस्था नसल्यामुळे इथे सर्व प्रकारचे गुन्हे हे घुसखोर सर्रास करतात. हे घुसखोर त्यांचे पत्ते वारंवार बदलतात. अनधिकृत वसाहतींमध्ये राहतात, त्यामुळे प्रशासनाला त्यांना शोधून काढणे कठीण जाते. परदेशी नागरिकांविरोधात शोध नोटिस देखील जारी केल्या जातात. परंतु पुरेशी जागृती नसल्यामुळे याला यश मिळत नाही. आता अमेरिकेने परकीय अवैध नागरिकांविरोधात घेतलेल्या कठोर कारवाईमुळे भारतासारखे देशही मोठ्या प्रमाणात अश्या कठोर देशांतर्गत सरकारी कारवाया करू शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.