येत्या २८ फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिराचा पडदा उघडणार! मंत्री आशिष शेलार
18-Feb-2025
Total Views | 68
मुंबई : येत्या २८ फेब्रुवारी पासून रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुन्हा नव्याने नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याआधी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "रवींद्र नाट्यमंदिर आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून २८ फेब्रुवारी पासून पुन्हा नव्याने नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ६ वाजता या संकुलांचे उद्घाटन होईल. या भव्य आणि सुशोभित असलेल्या नाट्यगृह आणि अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकरांना येण्याचे निमंत्रण मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
"पु. ल. देशपांडे कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमीच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत. या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची सोय आहे, त्याचप्रमाणे उपजत कला गुण असलेल्या कलाकारांना त्यांचे कला बळ मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासोबतच कला सादरीकरण, कलाशिक्षण, कलाआस्वादन, कलासंवर्धन आणि कलाविषयक रोजगार निर्मिती अशा अनेक सुविधा अकादमीत एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याठिकाणी लवकरच कलाक्षेत्रातील २० वेगवेगळे प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरु होणार असून नवोदित कलाकारांना याचा फायदा होणार आहे," असेही त्यांनी सांगितले.
नवीन नाट्यगृहामध्ये काय विशेष?
मंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्यानुसार, या संकुलातील रवींद्र नाट्यमंदिरात २ लघु नाट्यगृह, ५ प्रदर्शन दालने तसेच १५ तालीम दालने यांच्यामुळे कलाकारांची कायमच मोठी सोय झाली आहे. आता ही दोन्ही नाट्यगृहे नव्या रूपात, अत्याधुनिक सोयी-सुविधांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याठिकाणी नाटक आणि मराठी चित्रपट या दोन्हींसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था आणि अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. तसेच भव्य खुला रंगमंच, आभासी चित्रीकरण कक्ष, ध्वनी संकलन कक्ष, ध्वनिमुद्रण आणि ध्वनी रोपण कक्ष अशा काही अतिरिक्त नविन सुविधांसह अकादमी संकुल सज्ज झाले आहे.