नवी दिल्ली : (Earthquake in Delhi NCR) देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू हा दिल्लीतीलच धौलाकुवा भाग होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील धौलाकुवा हा भागातील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एजुकेशनच्या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता ही ४.० रिश्टर स्केल एवढी होती.
भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. मात्र, भूकंपाच्या तीव्रतेमुळे ढगांच्या गडगडाटाप्रमाणे आवाज झाला, त्यामुळे नागरिकाची झोप उडून काही काळ भीतीचे वातवरण होते. यावेळी नागरिक घराबाहेर जमल्याचेही दिसून आले. मात्र, भूकंपाचा धक्का अवघी तीन ते चार मिनिटेच होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन यावेळी केले. पंतप्रधान मोदी ‘एक्स’वर म्हणाले, "दिल्ली व आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सर्वांनी शांत राहण्याचे व सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे, तसेच संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन मी करतो. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत."
रिश्टर स्केलवर तीव्रता कमी, मात्र धक्का मोठा
दिल्लीत झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर कमी होती, मात्र त्याचा जाणवलेला धक्का मोठा होता. त्याविषयी भारताच्या ११ व्या राष्ट्रपतींची माजी सल्लागार, कलाम सेंटर व होमी लॅबचे संस्थापक श्रीजन पाल सिंह यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर माहिती दिली आहे. त्यानुसार, भूकंपाचे केंद्रस्थान हे दिल्लीतच होते, त्यामुळे रिश्टर स्केलवर तीव्रता कमी असूनही दिल्लीकरांना त्याचा धक्का जास्त जाणवला.
दिल्लीचा समावेश भूकंपप्रवण झोन ४ मध्ये
भारताला चार भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये विभागण्यात आले आहे - झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५. यापैकी झोन ५ हा सर्वात धोकादायक क्षेत्र आहे, जेथे मोठ्या भकंपांचा धोका असतो. तर, झोन २ हा सर्वात कमी धोकादायक मानला जातो. दिल्लीचा विचार केला तर ते झोन ४ मध्ये येते. याचा अर्थ असा की येथे भूकंपाचा धोका आहे. भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने, दिल्ली आणि त्याच्या आसपासचा परिसर सर्वात संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे.
त्याचप्रमाणे भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार, दिल्ली हिमालयाच्या जवळ आहे. हिमालयाच्या जवळ असल्याने, दिल्लीला 'भूकंपप्रवण क्षेत्र' मानले जाते. हिमालयाची निर्मिती भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टकरीमुळे झाली आहे. त्यामुळे. दिल्लीमध्ये अनेक फॉल्ट लाईन्स आहेत, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर भेगा आहेत. जेव्हा या फॉल्ट लाईन्सवर ताण जमा होतो तेव्हा भूकंप होऊ शकतो.