नकोशी तस्लीमा...

    17-Feb-2025   
Total Views | 27
 
Taslima Nasreen
 
पुस्तके म्हणजे माणसे जोडणारी गोष्ट. शब्दांच्या माध्यमातून कागदावर उमटलेली अभिव्यक्ती, माणसाला जगायला बळ देते. पुस्तकांची नवी अनुभूती माणसाला एका वेगळ्या जगाचे दर्शन घडवते. परंतु, यासाठी मुक्त वातावरणही तितकेच महत्त्वाचे. विचार करायला लावणार्‍या पुस्तकांवर अविचारी माणसांनी बंदी आणली की, हुकूमशाहीचा मार्ग मोकळा होतो.
 
बांगलादेशातसुद्धा सध्या काहीशी अशीच परिस्थिती उद्भवली आहे. सध्या बांगलादेशच्या ढाका येथे, ‘अमर एकुशे पुस्तक महोत्सव’ सुरू आहे. बांगलादेशामधील हा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव. जवळपास महिनाभर चालणार्‍या या महोत्सवात, लाखो पुस्तकांची विक्री होते. वेगवेगळ्या विचारांचे आदानप्रदान व्हावे, यासाठी सांस्कृतिक बैठकांचेसुद्धा आयोजन केले जाते. २०२४ साली पुस्तकांसाठी ९३७ स्टॉल उभारण्यात आले होते. या पुस्तक महोत्सवात, तीन हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
 
परंतु, या वर्षीचा ‘एकुशे पुस्तक महोत्सव’ एका अत्यंत धक्कादायक गोष्टीसाठी, लोकांच्या लक्षात राहणार आहे. इतरांप्रमाणेच यंदाही या महोत्सवात, सब्यासाची प्रकाशनाचा स्टॉल लागला होता. पुस्तकांची विक्रीही सुरू होती. अशातच काही लोकांना अशी माहिती मिळाली की, या प्रकाशनाच्या स्टॉलवर लेखिका तस्लीमा नसरीन यांची पुस्तके विकली जात आहेत. त्यामुळे स्टॉलमालक आणि त्या लोकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. इतक्यात मदरशात शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी, सब्यासाची प्रकाशनाच्या स्टॉलवर हल्ला करून, तोडफोड करण्यात आली. रागाचा पारा चढल्यामुळे, जमावाने प्रकाशक शताब्दी भव यांच्यावरसुद्धा हल्ला केला. तस्लीमा नसरीन यांची पुस्तके फेकून देण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षत आल्यावर बांगलादेशच्या पोलिसांनी हस्तक्षेप करून, शताब्दी भव यांना त्या आंदोलनकर्त्यांच्या तावडीतून सोडवले. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. परंतु, या हल्ल्यात प्रकाशनाच्या स्टॉलचे मात्र नुकसान झाले.
 
आपल्या ‘एक्स’ हॅन्डलवरून तस्लीमा नसरीन यांनी, या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “आज काही धार्मिक कट्टरपंथीयांकडून बांगलादेशातील पुस्तक महोत्सवात सब्यासाची प्रकाशनाच्या स्टॉलवर हल्ला करण्यात आला. त्यांचा गुन्हा एवढाच की, त्यांनी माझे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक महोत्सवातील अधिकारी आणि पोलिसांनीही माझी पुस्तके स्टॉलवरून हटवण्याचे आदेश दिले. पुस्तके हटवल्यानंतर, कट्टरपंथीयांनी स्टॉलची तोडफोड केली. बांगलादेशातील सरकार या कट्टरपंथीयांना पाठीशी घालत आहे,” अशी टीका तस्लीमा नसरीन यांनी केली.
 
तस्लीमा नसरीन या मुळच्या बांगलादेशी लेखिका. १९८० सालच्या दशकापासून, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९९३ साली बंगाली भाषेत प्रकाशित झालेल्या ‘लज्जा’ या कादंबरीमुळे, तस्लीमा नसरीन यांचे नाव साहित्यिक वर्तुळात गाजू लागले. बांगलादेशमधील धार्मिक कट्टरतेवर भाष्य करणारी ही कादंबरी, जगभरात चर्चेचा विषय ठरली. आपल्या धर्माचा शब्द अंतिम मानणार्‍या कट्टरपंथीयांनी, तस्लीमा यांच्या विरोधात फतवा काढला. त्यांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांना आपल्या जीवाची किंमत मोजावी लागणार होती. अखेर त्यांना त्यांच्या जन्मभूमीतून हद्दपार करण्यात आले.
 
‘लज्जा’ या कादंबरीमध्ये रेखाटलेले चित्र, आज बांगलादेशाचे प्रतिबिंब आहे. उठावानंतर पंतप्रधान शेख हसीना आपला देश सोडून पळून गेल्या. यानंतर मोहम्मद युनूस यांनी सत्तासुत्रे संभाळली. त्यांच्या नीतीमुळे कट्टरपंथीयांना अधिकच बळ मिळाले. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशातील बहुसंख्य समाजाचे, अल्पसंख्याक हिंदू समाजावर राजरोसपणे अत्याचार सुरू आहेत. झुंडशाही आणि आंदोलने यालाच लोकशाही समजणार्‍या काही धर्मांधांनी तर, शेख हसिना यांच्या पलायनामुळे बांगलादेशात क्रांती झाली अशी स्वत:ची समजूत करून घेतली आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आणि त्या आगीत वर्तमान होरपळते, तर भविष्य राख होते. या सार्‍याचे वास्तव, तस्लीमा नसरीन यांनी फार पूर्वीच मांडले होते. म्हणूनच, त्यांची अभिव्यक्ती कट्टरपंथीयांसाठी त्रासदायक होती. तस्लीमा नसरीन आज बांगलादेशातील एका गटातील लोकांना नकोशी वाटते. तस्लीमांच्या विचारांचा प्रतिवाद करण्यापेक्षा, त्यांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न पुन्हा पुन्हा केला जातो. परंतु, हे करतानाच, तस्लीमा नसरीन यांची अभिव्यक्ती किती खरी होती, याचीच प्रचिती वेळोवेळी येत राहते.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121