नंदुरबार : (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या पाच मिनिटांमध्ये बनावट हुबेहुब कागदपत्रं तयार करुन मिळत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबारमधील तळोदा आणि धडगाव या शहरांत १०० रुपयांमध्ये जातीचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला बनवून दिला जात आहे. या भागात बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे.
सायबर कॅफेच्या नावाखाली अनेक ठग आपली दुकाने चालवत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. आरोपी हे विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळवून देण्याचे आमिष दाखवत कॉम्पुटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहूब प्रमाणपत्र तयार करून देत आहेत. या अश्या बनावट कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. सायबर कॅफेमध्ये १०० ते ५०० रुपयांमध्ये अशी बनावट कागदपत्रे ५ मिनिटांत तयार केली जात आहेत. या बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले आहे.