मुंबई, दि. १५ : विशेष प्रतिनिधी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ शनिवार, दि.१५ रोजी पहिल्यांदाच हजारो धारावीकरांनी एकत्र येत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी उपस्थितांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि काम जलद गतीने व्हावे यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. धारावीतील टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक अशी सकाळी ११:३० वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत साधारण ५०० ते १००० धारावीकर सहभागी झाल्याचे आयोजनाकांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी धारावीतील विविध विभागांमध्ये सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे या प्रकल्पाच्या विरोधात काही मोजक्या आंदोलकांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले. मात्र या आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश आंदोलक हे बाहेरील असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच धारावी मधील मूळ नागरिक या आंदोलनात सहभागी होत नाहीत कारण आता धारावीकरांना विकास हवा आहे. जे राजकीय पक्ष आंदोलन करून हा प्रकल्प बंद पडू इच्छित आहेत त्यांनी धारवीकरांसाठी इतकी वर्षे काय केले? असा प्रश्नही उपस्थित केला. महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा) कार्यालयाबाहेर या मोर्चाची सांगता झाली. सोमवार, दि.१७ रोजी या मोर्चातील शिष्टमंडळ धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत. दी साऊथ इंडियन नाडार महाजन संघम, प्रगती महिला सेवा मंडळ यांसह अन्य संस्थांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
लक्षवेधी घोषणा
'गरिबी और गंदगी से दूर,धारावी का विकास जरूर' , 'धारावी का विकास, अभी नहीं - तो कभी नहीं' , 'घर घर में बोले नारी, अब धारावी के सुधार की बारी', 'मेरे बच्चो का पक्का घर, मेरा सपना' अशा विविध संदेशांचे फलक देखील मोर्चात सामील झालेल्या धारावीकरांच्या हाती होते. रहिवाशांनी या मोर्चाच्या माध्यमातून आपले हक्काचे घर, मूलभूत पायाभूत सुविधा, अद्ययावत आरोग्य सुविधा, दर्जेदार शैक्षणिक संस्था, रोजगाराच्या संधी यासाठी आवाज उठवला.
"धारावीत सर्व्हेक्षण होते आहे. धारावीतील गरिबात गरीब माणसाचे जीवनात या प्रकल्पामुळे बदल होणार आहे. आज धारावीकर चांगल्या घरात जाणार आहे. यामुळे काही लोकांना त्रास होतोय. धारावीतील गरीब माणूस या गटारातून बाहेर निघूच नये अशी यांची इच्छा आहे. आज एनएनडीपीएलच्यामाध्यमातून धारावीत सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाचे आम्ही समर्थन करत आहोत."
- धारावीकर
"देशाची आर्थिक राजधानी उभी करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या कामगार आणि कष्टकऱ्यांची धारावी आहे. आजवर गप्प बसून पुनर्विकासाचा तमाशा बघणाऱ्या धारावीकरांना आता जाग आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प रोखणाऱ्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई केली नाही, तर धारावीची जनता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल"
- संजय गुप्ता, स्थानिक रहिवासी
आज हजारो धारावीकर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ रॅलीत सहभागी झाले होते. धारावीतील विविध महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत प्रकल्पाच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत सर्व धारावीकर सहभागी होते. धारावी बचाव आंदोलन जे म्हणत आहेत की धारावी बाहेरून लोकांना आणले होते. मात्र त्यांच्या आरोपांत तथ्य नाही. रॅलीत सहभागी सर्व धारावीकर नागरिकच होते.
- सुगुणा राजन, धारावीकर
"गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या नव्या हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत आहोत. या नव्या घरांमध्ये स्वच्छतागृह आणि इतर सुविधा असतील. मात्र काही राजकारणी विशेषतः गायकवाड भगिनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धारावी पुनर्विकासाला विरोध करत आहेत. अशा सर्व लोकांना धारावीकरांच्या मनातली भावना जाहीरपणे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमच्या हक्कांच्या घरासाठी आम्ही शासनाच्या मागे ठामपणे उभे राहून हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, याची मला खात्री आहे"
- एम नाडेश्वरन, स्थानिक रहिवासी