जगभरात कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही त्या देशातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांवरच अवलंबून असते. अशातच सर्वात महत्त्वाचे आहे, ते रस्त्यांचे जाळे. रस्ते नेटवर्क देशाच्या वाढीचा आणि समृद्धीचा एक आवश्यक भाग म्हणून काम करतात. हे रस्त्यांचे जाळे केवळ शहरी भागाला ग्रामीण भागाशी जोडत नाहीत, तर उद्योगांना त्यांचा कच्चा माल मिळवण्यासही सक्षम करतात. ब्रिटनमध्ये रोमन लोकांना त्यांचे साम्राज्य विकसित करण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता होती आणि आजही हेच रस्ते वापरले जातात. १८व्या आणि १९व्या शतकात, औद्योगिक क्रांतीमुळे वाहतुकीत लक्षणीय प्रगती झाली. ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये, प्रगत यंत्रसामग्री आणि उत्पादनाचा विकास झाला. त्यामुळे जगाच्या वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार करण्याची पद्धत बदलली. या औद्योगिक विकासाबरोबरच, जगाला सेवा देण्यासाठी वाहतुकीच्या अधिक प्रगत पद्धतीदेखील तयार केल्या गेल्या. औद्योगिक क्रांतीदरम्यान, पहिली सायकल बनवण्यात आली. पहिले महामार्ग शोधण्यात आले आणि पहिली चारचाकी देखील तयार करण्यात आली. आज जगातील सर्वात मोठे रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे अमेरिकेमध्ये आहे.
‘वर्ल्ड पॉप्युलेशन सर्वेक्षण’ अहवालानुसार, अमेरिकेमध्ये सुमारे ४.१ दशलक्ष मैल म्हणजेच, ६.६ दशलक्ष किमी रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. या विस्तृत प्रणालीमध्ये विशाल आंतरराज्य महामार्ग नेटवर्क, तसेच राज्य, काऊंटी आणि स्थानिक रस्ते समाविष्ट आहेत. जे देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागाला जोडलेले आहेत. अमेरिकेनंतर भारतात ६.४ दशलक्ष किमी रस्त्यांचे नेटवर्क आहे. यामध्ये चीन ३.२ दशलक्ष मैल म्हणजेच, ५.२ दशलक्ष किमीपेक्षा जास्त रस्ते नेटवर्कसह तिसर्या क्रमांकावर आहे. ब्राझील या देशात अंदाजे १.२ दशलक्ष मैल म्हणजेच, दोन दशलक्ष किमीसह चौथ्या क्रमांकावर आहे. रशिया, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश असूनही, सुमारे आठ लाख मैल अर्थात १.३ दशलक्ष किलोमीटर लांबीचे रस्ते तिकडे आहेत. याउलट, अनेक लहान बेटे असलेल्या राष्ट्रांमध्ये, सर्वात लहान रस्त्यांचे नेटवर्क आहे.
जगातील असंख्य बेट राष्ट्रांमध्ये सामान्यत: सर्वात लहान रस्ते नेटवर्क आहेत. तुवालुमध्ये दहा स्क्वेअर-मैल बेटावर फक्त पाच मैल, म्हणजे आठ किमीचे रस्ते आहेत. तर टोकेलाऊमध्ये,सहा मैल म्हणजे दहा किमी रस्त्यांचे नेटवर्क आहे. जिब्राल्टरमध्ये खंडातील सर्वात लहान नेटवर्क आहे. लहान द्वीपकल्पात १८ मैल (२९ किलोमीटर) रस्ता आहे. अनेक देश नवीन रस्ते प्रकल्प बांधत असताना, ही संख्या सतत बदलत आणि विकसित होत आहे, तर काही रस्त्यांची आता पुनर्बांधणीही करण्यात येत आहे.
याचसोबत राष्ट्रांची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणार्या रेल्वेने, शतकानुशतके मानवी प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रॅक आणि ट्रेनचे एक गुंतागुंतीचे जाळे जे देशातील कानाकोपर्यांना जोडणारे असते. ते दोन राज्यांतील अर्थव्यवस्था, संस्कृती आणि समाजांना आकार देते. इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेच्या २०२४ सालामधील आकडेवारीनुसार, जगातील शीर्ष दहा सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कचे वर्गीकरण केले. त्यानुसार, रस्ते जाळ्यासोबतच अमेरिकेमध्ये जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्कही विस्तारलेले आहे. ज्याची एकूण लांबी २ लाख, २० हजार, ४८० किलोमीटर आहे. हे जाळे खासगी आणि सार्वजनिक रेल्वे प्रणालीपासून तयार झाले आहे. ज्यामध्ये सात सर्वात मोठे रेल्वेमार्ग आहेत. ज्यांना ‘वर्ग ख’ रेल्वेमार्ग म्हणून ओळखले जाते. हे देशाच्या मालवाहतूक रेल्वे नेटवर्कच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यरत आहेत.अमेरिकेपाठोपाठ चीनकडे जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ज्याची लांबी १ लाख, २४ हजार किलोमीटरचे आहे. २०५० सालापर्यंत, चीनचे एकूण रेल्वे नेटवर्क २ लाख, ७० हजार किमीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
इ.स.पूर्व ४००० ते आजच्या आधुनिक तंत्रस्नेही वाहतूक सेवांपर्यंतचा, वाहतूक दळणवळण क्षेत्राचा झालेला विकास आणि इतिहास हा अत्यंत रोचक विषय आहे. यामध्ये दोन गावांमधील वाहतुकीसाठी प्राण्यांचा वापर, चाकाचा शोध ते पहिले रस्ते, रेल्वे, जहाज ते विमानांपर्यंत वाहतुकीच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांचा समावेश होतो. याच्या आधारे हे ठामपणे सांगता येते की, पायाभूत सुविधांची योग्य जोडणी देशाचा विकास, क्षमता आणि अर्थव्यवस्था वाढवते.