भविष्यात भास्कर जाधवांचे मार्गदर्शन मिळणार असेल तर स्वागत! मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
15-Feb-2025
Total Views |
रत्नागिरी : भविष्यात आम्हाला भास्कर जाधवांचे मार्गदर्शन मिळणार असेल तर स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली होती.
यावर माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ आमदार आहेत. त्यांच्यात संघटन कौशल्य आहे. ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल, तर आम्ही स्वागत करू. त्यांनी काय विचार करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू, ते वरिष्ठ आहेत. त्यांचा आवाका, भाषणशैली, वक्तृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत या सगळ्याचा उपयोग करून घेण्यास काही लोक कमी पडले असतील. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचा आभार दौरा आयोजित करण्यात आला असून यावेळी उबाठा गटातील अनेक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. भविष्यात काँग्रेस पक्षातील नेतेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील असे चित्र आहे. परंतू, यात ऑपरेशन टायगर यापेक्षाही अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पाहता त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच बाळासाहेबांचा विचार पुढे नेऊ शकते, हे उबाठा गटाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे साहेबांचे नेतृत्व स्विकारण्याची तयारी केली आहे. याचे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचे आहे," असेही त्यांनी सांगितले.