वॉशिंग्टन डी.सी. : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ च्या सुमारास त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. . प्रदीर्घ बैठकीनंतर मोदी व ट्रम्प यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान, बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना एक खास गिफ्ट दिले आहे.
“मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट!"
ट्रम्प यांनी स्वत:चे फोटोबुक ‘अवर जर्नी टुगेदर’ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिले आहे. या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ, त्यातील महत्त्वाच्या घटना यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुस्तकाची काही पानं उलगडून त्या दोघांचे फोटोही दाखवले. या फोटोबुकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर २०१९ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमातील तसेच ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातल्या त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ‘नमस्ते ट्रम्प’ रॅलीतील फोटोदेखील समाविष्ट करण्यात आले होते. या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या हाताने मोदींसाठी संदेशदेखील लिहिला आहे. यात “मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट”, असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
या भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये झालेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाच्या मुद्द्यापासून अमेरिकेतून भारतात परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांच्या मुद्द्यापर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. ट्रम्प यांनी भारताला F-35 फायटर जेट देण्याची घोषणा केली. तसेच तेल आणि ऊर्जा पुरवठा करण्यावर सहमती दर्शवली आहे.