चिरंजीवी, तू जागा चुकलासी!

    14-Feb-2025   
Total Views | 50

chiranjeevi
 
“मी जेव्हा घरी असतो, तेव्हा मला नेहमी वाटतं की, मी माझ्या नातवंडांमध्ये नसून, कोणत्या तरी महिलांच्या वसतिगृहात आहे. कधी कधी तर मी त्या महिला वसतिगृहाचा वॉर्डन असल्याची भावना निर्माण होते. कारण, आमचं संपूर्ण घरचं महिलांनी भरलेलं असतं. म्हणूनच किमान यावेळी तरी रामचरणला मुलगा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून आमचा वारसा पुढे चालू राहील. त्याला सुंदर मुली आहेत, पण मला भीती वाटते की, त्याला पुन्हा मुलगी होईल,” असे म्हणणारा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चिरंजीवी! ‘ब्रह्मआनंदम्’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या कार्यक्रमात चिरंजीवीने हे लिंगभेदी विचार मांडले आणि एकच वादंग उभा राहिला. खरं तर चिरंजीवीसारख्या समाजामध्ये आदर्शस्थानी मानल्या जाणार्‍या दिग्गज अभिनेत्याने अशी बेजबाबदार वक्तव्ये करण्यापूर्वी त्याचा समाजावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, याचे नैसर्गिक भान बाळगणे आवश्यकच. कारण, चिरंजीवी जर म्हणतोय की मला नात नको, नातू हवा, तर मग आम्हीही तसाच विचार केला, तर गैर काय, असा विचार चिरंजीवीच्या लाखो-करोडो चाहत्यांनी केला तर? शिकलेले आणि गडगंज श्रीमंत असलेले लोकही असा विचार करतात, मग आपण तर बिचारे गरीब-मध्यमवर्गीय. त्यांनाही मुली जड वाटतात, तर मग आपण मुली जन्माला घालून आणखीन कर्जबाजारी व्हायचे का? असा चुकीचा संदेशही चिरंजीवीच्या या असल्या उथळ वक्तव्यातून ध्वनित होऊ शकतो.
 
परिणामस्वरूप, कानीकपाळी जनजागृती करून अलीकडे कमी झालेले स्त्रीभ्रूणहत्येसारखे प्रकारही नाहक वाढीस लागू शकतात. पण, चिरंजीवीच्या पुरुषसत्ताक मनाला हा विचार क्षणभरही शिवला नसेल आणि बेधडकपणे त्याच्या मनातले ओठावरही आले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा तेथील जनमानसावरील प्रभाव वेगळा सांगायला नकोच. तिथे चिरंजीवीसारख्या दिग्गज अभिनेत्याला तर अगदी देवासमान पूजले जाते. त्याच्या चित्रपटांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेकाच्या हजारो लीटर धारा प्रवाहित होतात. मग जो प्रेक्षकवर्ग, जो समाज आपल्याला देवासमान मानतो, त्या प्रेक्षकांच्या मानसिकतेचा किमान विचार करण्याची नैतिक जबाबदारी या दाक्षिणात्य ‘सिनेदेवतां’ची नाही का? म्हणूनच तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळीतच सांगायचे तर चिरंजीवी, ‘तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी!’
 
वारसा कलाकर्तृत्वाचा...
  
 
‘मला आणखीन एक नात नको, तर वारसा चालवण्यासाठी नातू हवा,’ असे स्वत:ला दोन्ही कन्यारत्न असलेला चिरंजीवी अगदी सहज बोलून गेला. त्यामुळे माणूस कर्तृत्वाने, कीर्तीने आणि कलाकौशल्याने कितीही मोठा झाला, तरी त्याचे विचार बुरसटलेलेच असू शकतात, याचेच हे उत्तम उदाहरण. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी कशी संस्कृतीरक्षक आहे वगैरे याचे गोडवे नेहमी गायले जातात. पण, केवळ मोठ्या पडद्यावर (रिल) संस्कृतीदर्शन घडविले म्हणजे या सगळ्या नटनट्या त्यांच्या वास्तविक (रिअल) आयुष्यातही असेच सुसंस्कारी असतील, हा केवळ भ्रम ठरावा. त्याच पठडीतले चिरंजीवी यांचे विधान. त्यांना महिलांनी गजबजलेले घर हे लक्ष्मीच्या पावलांनी भरलेले घर नव्हे, तर महिलांचे चक्क वसतिगृह वाटते. चिरंजीवीला स्वत: दोन मुली असून, रामचरण हे त्याचे तिसरे अपत्य. रामचरणनेही आपल्या पित्याचा अभिनयाचा वारसा समर्थपणे पुढे नेला, तो अभिनयकौशल्याच्या जोरावरच! पण, मग अभिनयातील अथवा कलाक्षेत्रातील घराण्याचा वारसा हा पुरुषांनीच पुढे नेला, तरच त्याचे अस्तित्व टिकून राहते, हाही चिरंजीवीसारख्या दिग्गजाचा मोठा भ्रम म्हणावा लागेल. कारण, अभिनयक्षेत्रातही कित्येक मुलींनी त्यांच्या पित्याचा अभिनयाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेलाच की! वानगीदाखल सांगायचे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कमल हसन आणि त्यांच्या दोन्ही मुली-श्रुती आणि अकारा हसन, शत्रुघ्न सिन्हा-सोनाक्षी सिन्हा, हेमा मालिनीच्या मुली-इशा आणि अहाना, शक्ती कपूर-श्रद्धा कपूर, जितेंद्र-एकता कपूर, रणधीर कपूर-करिष्मा, करीना कपूर आणि अशी आणखीन किती तरी उदाहरणे देता येतील.
 
एवढेच काय तर दिनानाथ मंगेशकरांच्या संगीतवारशामध्येही हृदयनाथ मंगेशकरांसोबतच लतादीदी, आशाताई, मिनाताई आणि उषाताई यांनीही आपली वेगळी आणि तितकीच उत्तुंग ओळख प्रस्थापित केली. त्यामुळे चिरंजीवीने महिलांना कमी लेखण्याचा केलेला हा प्रयत्न सर्वस्वी निंदाजनकच. आपल्या अभिनयाचा वारसा, जसा आपल्या मुलाने चालवला, तसा मुलाचा वारसाही नातवाने चालवावा, अशी चिरंजीवी आजोबांची इच्छा. पण, हे झाले चिरंजीवीचे विचार. पण, आजच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या चिरंजीवीचा चिरंजीव रामचरणने बापासारखीच मानसिकता ठेवली नाही म्हणजे मिळवले!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत

आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत

जागतिक स्तरावरील सर्जनशील आशयनिर्माते, मनोरंजन विश्वातील नामांकित उद्योग कंपन्या, व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणारी मुंबईतील वेव्हज शिखर परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या निमित्ताने मुंबई भेटीवर असलेल्या विविध देशातील शिष्टमंडळाचे गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. चित्रनगरीत सुरू असलेले चित्रीकरण, विविध सेट्स यांना भेट देत त्यांनी चित्रिकरणाविषयी सविस्तर..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121